आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू काश्मीरमध्ये अवघ्या 12 तासांत दोन बिगर काश्मिरींची हत्या झाली. यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, काश्मिरींची परिस्थिती खूप गंभीर आहे, आज पुन्हा 1990 सारखी परिस्थिती झाली आहे. 370 हटवल्यानंतरही काश्मिरी जनतेच्या परिस्थितीत कोणतीही सुधारणा नाही.
दुसऱ्या पक्षाच्या काळात हे झालं असतं तर भाजपनं गोंधळ घातला असता
राऊत पुढे म्हणाले, "आजही 2 जणांची हत्या झाली, जे हिंदू होते. सरकारकडून कोणतीही सुरक्षा नाही, जर हे एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या कार्यकाळात झालं असतं, तर भाजपनं काश्मिरी पंडितांच्या नावावर मोठा गोंधळ घातला असता. पण आता दिवसाढवळ्या हत्या होत आहे, ही परिस्थिती चांगली नाही."
काश्मीर फाइल्स 2 काढावा
राऊत पुढे म्हणाले की, मंदिरांपेक्षा, मशिदींपेक्षा काश्मिरी पंडित, तिथले हिंदू-मुस्लिम नागरिक यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. मोहन भागवत बरोबर बोलले. आज जे पलायन सुरू आहे, आज ज्या हत्या सुरू आहेत, त्यावर काश्मीर फाइल्स 2 चित्रपट काढावा. आणि या हत्यांना, पलायनाला जबाबदार कोण आहे त्या लोकांना समोर आणावं. मी मोहन भागवत यांच्या विधानाचं स्वागत करतो. हे दररोजचे वाद संपून जातील.
घोडेबाजार टाळण्यासाठी मविआ नेते फडणवीसांना भेटणार
महाविकास आघाडीचे नेते फडणवीसांना भेटायला जाणार या प्रश्नावर राऊत म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीचं राज्यात जे वातावरण आहे, त्यामुळे राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे नेते विरोधी पक्षनेत्यांना भेटत असतील, तर ही चांगली बाब आहे. फडणवीस हे मॅच्युअर नेते आहेत. घोडेबाजार नावाचा जो शब्द आहे, तो अत्यंत वाईट पद्धतीने महाराष्ट्रात सुरू झाल्याचं मला दिसत आहे. राजकारणात जो पैसा येतो तो कुठून येतो याचा तपास ईडीने करायला हवा. आमदार विकत घेण्यासाठी जी प्रलोभने दाखवली जात आहेत, त्यामागचे सूत्रधार कोण आहेत, याचा महाराष्ट्राच्या जनतेनं विचार करणे गरजेचे आहे. केंद्रीय यंत्रणांनी तपास करणं गरजेचं आहे. अर्थात, राज्याच्या हितासाठी, घोडेबाजार टाळण्यासाठी महाविकास आघाडीने एक पाऊल पुढे टाकत फडणवीसांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे, असंही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.