आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आ. सदा सरवणकरांवर गुन्हा दाखल:शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर पोलिसांची कारवाई; दादर पोलिस ठाण्यापुढे शिवसैनिकांचा ठिय्या

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभादेवी परिसरात काल रात्री ठाकरे गट व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. अखेर याप्रकरणी पोलिसांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते खा. अरविंद सावंत यांनी दिली.

दरम्यान, हाणामारीप्रकरणी 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले असून 5 शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. यानंतर या 5 जणांची जामीनावर सुटका झाली असून त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर शिवसेना नेते खा. अरविंद सावंत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री अनिल परब यांनी दादर पोलिसस्टेशनमध्ये धाव घेतली व शिवसैनिकांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी विनंती पोलिसांना केली होती.

तसेच, हाणामारीदरम्यान आ. सदा सरवणकर यांनी गोळीबार केला असा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करा, तोपर्यंत पोलिस स्टेशनसमोरून हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसेना नेते, व कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

शिवसैनिकांवरील गुन्हे खोटे

पोलिसांच्या भेटीनंतर खा. अरविंद सावंत म्हणाले, काल रात्री हाणामारी झाल्यानंतर याप्रकरणी तक्रार देण्यासाठी आमचे विभाग प्रमुख महेश सावंत तक्रार करण्यासाठी दादर पोलिसांकडे आले होते. मात्र, त्यांच्यावरच चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. शिंदे गटाच्या सदा सरवणकरांनी बंदुकीतून गोळीबार केला, अशी तक्रार असूनही पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नाही. शेवटी आम्ही तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आमच्या तक्रारीची नोंद घेतली.

शिवसैनिकांचे ठिय्या आंदोलन

शिवसैनिकांना अटक झाल्याचे समजताच शिवसेना आक्रमक झाली आहे. दादर पोलिस स्टेशनसमोर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. जोपर्यंत अटकेत असलेल्या शिवसैनिकांची सुटका पोलिस करत नाहीत, तोपर्यंत पोलिस स्टेशनसमोरून हटणार नसल्याचे आंदोलक शिवसैनिकांनी म्हटले आहे.

चोराच्या उलट्या बोंबा

खा. अरविंद सावंत म्हणाले, प्रभादेवीतील गुंडांनी फेसबुक आणि इतर माध्यमांतून शिवसेनेला अर्वाच्य शिव्या दिल्या. म्हणूनच आमचे विभागप्रमुख महेश सावंत तक्रार दाखल करण्यासाठी सकाळी गेले होते. यादरम्यान त्यांना नाक्यावर येऊन दाखवा, असे आव्हान शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केले. तेव्हा चक्क सदा सरवणकरांनी फायरींग केली. हाच प्रकार त्यांनी पोलिस स्टेशनमध्येही केला. याची तक्रार करण्यासाठी आमची माणसं गेली. मात्र, चोराच्या उलट्या बोंबा या प्रमाणे आमच्याच कार्यकर्त्यांवर चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.

राज्यकर्त्यांचीच गुंडगिरी

खा. सावंत म्हणाले, केवळ मुंबईच नव्हे तर राज्यभरात शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रकार घडत आहे. ठाकरे सरकारने गुंडाचा बंदोबस्त केला होता. मात्र, आता राज्यकर्तेच गुंडगिरी करत आहेत. एक लोकप्रतिनिधी म्हणतो, चुन चुन के मारेंगे. दुसरा म्हणतो, तंगड्या तोडू. अमरावतीत एक लोकप्रतिनिधी पोलिसांनी गैरवर्तन करते. आता तर गोळीबार करण्याचाच प्रकार समोर येत आहे. यावरून हे राज्य कुठे चाललय हे समजेल.

...तर शिवसेना रस्त्यावर उतरेल

खा. सावंत म्हणाले, सदा सरवणकर यांच्यार आर्म्स अ‌ॅक्टअंतर्गत कारवाई होत नाही, तोपर्यंत पोलिस स्टेशनसमोरून आम्ही हटणार नाही. शिवसैनिकांवरील खोटा गुन्हे मागे न घेतल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल. तेव्हाच खरी शिवसेना कोण हे कळेल, असा इशारा सावंत यांनी दिला. तसेच, उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात राज्यात शांतता होती. गुंडगिरीचे राज्य नव्हते, असेही सावंत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...