आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची भाजपवर रोखठोक टीका:'जेथे भाजपचे राज्य नाही तेथे अधर्म असा प्रोपोगंडा सुरू, त्या राज्यांत पॉलिटिकल एजंट म्हणून राज्यपाल नेमायचा अन्...' , संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रातील सरकार स्थापनेत अडसर ठरलेले, शरद पवारांपासून संजय राऊत यांच्यापर्यंत सगळय़ांना ‘निपट डालो’ हा नवा अजेंडा राबवायचा.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी राज्य सरकार आणि विरोधीपक्षात तणाव पाहायला मिळत आहे. दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यातही याविषयावरुन शाब्दित युद्ध झाल्याचे पाहायला मिळाले. या मुद्द्यावरुन आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राज्यपालांचा उल्लेख त्यांनी पॉलिटिकल एजंट असा केला करत भाजपला टोला लगावला आहे.

'अधर्म कोठे? जेथे भाजपचे राज्य नाही तेथे अधर्म सुरू आहे असा प्रोपोगंडा सुरूच आहे व जे भाजपला हवे असलेल्या धर्माचे राज्य आणण्यास विरोध करतील त्यांना लगेच निपटवून टाकायला हवे असे काही प्रमुख लोकांना वाटते. प. बंगालात एका भाजपा पदाधिकाऱयाची हत्या झाली हे दुर्दैव पण त्याविरोधांत हजारो भाजप कार्यकर्त्यांना जमवून कोलकात्यातील मंत्रालयावर चाल करण्यात आली. यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व त्याचा राजकीय फायदा विधानसभा निवडणुकांत घेता येईल हे भाजपचे राजकीय धोरण ठीक, पण प. बंगाल हा हिंदुस्थानचाच एक भाग आहे हे केंद्राला विसरता येणार नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकारही डोळय़ांत खुपते व सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय त्यांना देशविरोधी वाटतो. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार डिसेंबरपर्यंत बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लादली जाईल, असे भविष्य श्री. प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवून ठेवले. त्याआधी प्रमुख नेत्यांना ‘निपट डालो’ हे धोरण अमलात आणायचे. मुळात दिल्लीतील राज्यकर्त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे, एखाद्या राज्यात भाजपविरोधी सरकार स्थापन होणे हे काही घटनाविरोधी नाही, पण जेथे आपल्या विरोधी सरकारे आहेत त्या राज्यांत पॉलिटिकल एजंट म्हणून राज्यपाल नेमायचा व राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य अस्थिर करायचे हे धोरण चांगल्या राज्यकर्त्यास शोभत नाही.'

प. बंगालात राज्यपाल धनखर हे ममता बॅनर्जींविरोधात रोज नवी आघाडी उभारत आहेत. ममता बॅनर्जीही लढाईत मागे हटत नाहीत. दिल्लीत केजरीवाल विरुद्ध राज्यपाल झगडा आहेच. पंजाबातील लढवय्या शीख समाज अंगावर उसळला तर गडबड होईल म्हणून तेथे कुणाची हिंमत होत नाही. महाराष्ट्रात राज्यपालांनी प्रयत्न करूनही ‘ठाकरे सरकार’ स्थिर आहे. राजस्थानात अशोक गेहलोत यांचे सरकार अस्थिर करण्याचे सर्व प्रयत्न फसले हे सत्य आहे. महाराष्ट्रापेक्षा गंभीर प्रश्न गुजरात, हरयाणासारख्या राज्यांत निर्माण झाले. गुजरातमध्येही सोमनाथ, अक्षरधामसारखी मंदिरे बंद आहेत; पण महाराष्ट्रात मंदिरे बंद म्हणून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना खोडसाळ पत्र लिहिले. शेवटी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ‘ठाकरे’ आहेत याचा विसर त्यांना पडला व पुढचे महाभारत घडले. एकछत्री अंमल गाजवण्यासाठी जे आडवे येतील त्यांना मिळेल त्या हत्याराने दूर करा. हे एक आणीबाणीसदृश्य धोरण राबवले जात आहे. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेत अडसर ठरलेले, शरद पवारांपासून संजय राऊत यांच्यापर्यंत सगळय़ांना ‘निपट डालो’ हा नवा अजेंडा राबवायचा. सुशांत प्रकरणात शिवसेनेच्या युवा नेत्यांना निपटण्याचे प्रयत्न झाले ते त्यांच्यावरच उलटले. काही झाले तरी सत्ता हवी व त्यासाठी कोणत्याही थराला जायचे. सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडी यांचा वापर करायचा. हे तर रशिया, चीनपेक्षा भयंकर चालले आहे. बिहार निवडणुकीनंतर नितीश कुमार यांनाच निपटले जाईल अशी स्थिती आहे. बिहारात चिराग पासवान यांच्या पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवायचे ठरवले त्यामागे सूत्र हेच आहे.

बातम्या आणखी आहेत...