आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पोलिस खात्यातील बदल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीत निर्माण झालेला तणाव सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर बऱ्यापैकी निवळला.
नगर जिल्ह्यातील पारनेरच्या पाच नगरसेवकांना फोडून राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यामुळे संतापलेल्या शिवसेनेने रविवारी ठाणे जिल्ह्यात भाजपशी हातमिळवणी करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धोबीपछाड दिली. त्यापाठोपाठ मुंबईतील पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांवरून तणावात आणखी भर पडल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘मातोश्री’वर सोमवारी धाव घेत सारवासारव करावी लागली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या पारनेरच्या ५ नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत पाठवण्याचे राष्ट्रवादीने मान्य केल्याचा दावा सूत्रांनी केला.
अजित पवारांच्या उपस्थितीत पाच नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्याचे उट्टे शिवसेनेने ठाणे जिल्ह्यातील पंचायत समितीच्या निवडीत रविवारी फेडले. भिवंडी, अंबरनाथ, कल्याण पंचायत समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत चक्क भाजपशी हातमिळवणी करत महाराष्ट्र विकास आघाडीला धोबीपछाड दिली. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव यांची तातडीने भेट घेतली.
यापुढे दोन्ही पक्षांच्या ‘सहमती’ने बदल्या
> मुंबईतील पोलिस उपायुक्तांच्या बदल्यावर या वेळी पवार आणि उद्धव यांच्यात चर्चा झाली. भविष्यात गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी चर्चा करून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय झाला. यासंदर्भात आणखी एक बैठक होणार असून त्यामध्ये ज्या मुंबईतील बदल्यांना स्थगिती दिली आहे तसेच ज्या बदल्या करायच्या बाकी आहेत त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
> आघाडी सरकार स्थापन करतेवेळी गृह मंत्रालय राष्ट्रवादीला मिळाले, पण मुंबई परिसरातील पोलिस प्रशासनाचे काम मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने होईल यावर एकमत झाले हाेते. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी दोन किमी परिसरात खरेदी करण्याचा नियम किंवा १० उपायुक्तांच्या बदल्या राष्ट्रवादीच्या संमतीविना केल्या होत्या, असे शिवसेनेतील एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले.
शिवसेना-भाजप हातमिळवणीने पवार सतर्क
शिवसेनेत अजूनही एक गट भाजपच्या प्रेमात आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसची साथ सोडून भाजपबरोबर जावे, अशी त्याची मनीषा आहे. पारनेर प्रकरणावरून ठाणे जिल्ह्यात शिवसेनेने भाजपबरोबर जाण्याच्या घेतलेल्या निर्णयाने शरद पवार यांनी धोका ओळखला. त्यामुळेच तणाव कमी करण्यासाठी पवार यांनी सोमवारी ‘मातोश्री’वर धाव घेतल्याचे सांगण्यात येते.
> शिवसेना-राष्ट्रवादी नेत्यांमधील बैठकीला ठाणे जिल्ह्याचे शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हजर होते. तत्पूर्वी, उद्धव यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना आमचे पाच नगरसेवक परत करा, असा निरोप दिला होता. उद्धव यांच्या या मागणीला शरद पवार यांनी बैठकीत होकार दिल्याचा दावा शिवसेनेतील सूत्रांनी केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.