आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण:‘ईडी’पिडामुळे शिवसेना धास्तावली, रवींद्र वायकर, रश्मी ठाकरे यांनाही नोटीस येण्याची चिंता

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीचे सूत्रधार, शिवसेनेचे थिंक टँक व राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला आलेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) नोटिसीमुळे शिवसेनेत धास्ती निर्माण झाली आहे. ही नोटीस आघाडी सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नाचा भाग असल्याचे मानले जात आहे. शिवसेनेच्या इतर नेत्यांना नोटीस पाठवली जाण्याची भीती व्यक्त केली जात असून मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना नोटीस येईल की काय, यासंदर्भात पक्षात चिंता आहे.

सोमवारी दुपारी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडी नोटिसीसंदर्भात भूमिका मांडली. ही पत्रकार परिषद दादरच्या शिवसेना भवनात घेण्यात आली. या वेळी महिला आघाडीच्या वतीने भाजप व मोदी सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. तसेच यापूर्वी ईडी नोटीस प्राप्त झालेले आमदार प्रताप सरनाईक, खासदार अरविंद सावंत आणि राऊत यांचे धाकटे बंधू आमदार सुनील राऊत उपस्थित होते. मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयासमोरच शिवसैनिकांनी ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असे बॅनर लावले. पोलिस ते काढण्यासाठी आले असता स्थानिक शिवसैनिकांनी पोलिसांना मज्जाव केला. बॅनर काढण्याची जबाबदारी पोलिसांची नसून महापालिकेची आहे, असे शिवसैनिक म्हणाले. दरम्यान, संजय राऊत यांनी आज सकाळी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दोन वेळा भेट घेतली. वर्षा निवासस्थानी राऊत यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार होते.

अलिबागमधील जमीन व्यवहारामुळे पंचाईत
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. त्याची माहिती २०१६ मध्ये राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल करताना राऊत यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे. हा सर्व व्यवहार पारदर्शक असल्यामुळे शिवसेना नेते निर्धास्त आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदीचे संयुक्त व्यवहार केले होते. त्याप्रकरणी ईडी नोटीस बजावू शकते, अशी भीती शिवसेना नेत्यांना सतावते आहे.

बातम्या आणखी आहेत...