आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रतिक्रिया:मंदिर उघडण्यासाठी आधी भाजप आंदोलन करते मग वंचित बहुजन आघाडी तेच करतात! प्रकाश आंबेडकरांची पावले हिंदुत्वाच्या दिशेने चालत असतील तर स्वागतच; शिवसेनेची मुखपत्रातून प्रतिक्रिया

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वंचित बहुजन आघाडीचे पंढरपूर आंदोलन आणि भाजपचा घंटानाद हा तर केवळ योगा-योग ना! -शिवसेना

प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची पावले हिंदुत्वाच्या दिशेने जात असतील तर त्याचे स्वागत आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेने मंगळवारी अग्रलेखातून दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूर मंदिरात 15 कार्यकर्त्यांसह जाऊन दर्शन घेतले. त्यांच्या नेतृत्वात सोमवारी झालेल्या या आंदोलनावर शिवसेनेने आपले मुखपत्र सामनातून शंका व्यक्त केली आहे. भाजपने काही दिवसांपासून मंदिर सुरू करण्यासाठी घंटानाद आंदोलन केले. हे सुरू असतानाच अचानक प्रकाश आंबेडकर सुद्धा मंदिर उघडण्यासाठी पंढरपूर आंदोलन करतात असे बोलताना शिवसेनेने वंचित आणि भाजपच्या कथित हातमिळवणीचा संशय व्यक्त केला आहे.

नामदेव पायरीच्या दर्शनाचे चमत्कार

सामनातील मंगळवारच्या अग्रलेखानुसार, “प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात नामदेव पायरीचेही दर्शन घेतले. नामदेवांच्या चरित्रामध्ये अनेक लोकविलक्षण चमत्कारांचा उल्लेख आहे. तसा एक विलक्षण चमत्कार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरात माऊलींचे दर्शन घेऊन केला. कपाळाला बुक्का, चंदन लावून आंबेडकर मंदिरात गेले. एक प्रकारे त्यांनी भगवी पताकाच खांद्यावर घेतली. आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची पावले हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर त्यांच्या नव्या दिंडीयात्रेचे स्वागतच करावे लागेल.”

डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रालाच आव्हान दिले

“गर्दीत एकमेकांच्या संपर्कात आल्यावर कोरोना होतो हा गैरसमज यानिमित्ताने संपवायचा आहे, असे पंढरपुरात सांगण्यात आले. असे सांगणे म्हणजे संपूर्ण डॉक्टर क्षेत्राला आणि जागतिक संघटनेलाच आव्हान आहे. आंबेडकर बौद्ध धर्माचे उपासक आहेत, पण राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे ते नेतृत्व करतात. जे देश बौद्धधर्मीय आहेत त्या देशांमध्येही बौद्ध प्रार्थनास्थळांमध्ये लोकांना प्रवेश नाही अशी स्थिती आहे.” असेही संजय राऊत म्हणाले.

वंचितचे आंदोलन आणि भाजपचा घंटानाद योगा-योग

“मंदिरासंदर्भात प्रकाश आंबडेकर यांनी केलेल्या आंदोलनाचा संबंध भाजपच्या घंटानादाशी जोडला जातो. हा निव्वळ योगायोग समजायला हवा. आंबेडकर आणि भाजपचे आतून साटेलोटे आहे, असा आरोप नेहमी केला जातो. त्यात काही तथ्य असावे असे वाटत नाही. लोक दहा तोंडांनी बोलतात आणि शंभर कानांनी ऐकतात त्याला इलाज नाही.” असा टोला शिवसेनेने लगावला आहे.