आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेच्या अजय चौधरी यांच्या गटनेतेपदावरील निवडीला एकनाथ शिंदे यांनी ठराव मंजूर करून आव्हान दिले आहे. त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (प्रभारी अध्यक्ष) यांना पत्र पाठवले आहे. भारत गोगावले यांची याबाबत त्यांनी ३४ आमदारांच्या सह्या असलेले पत्र काढले आहे. मात्र, या पत्राला अद्याप मंजुरी देण्यात आली नाही. दरम्यान, सत्तेसाठी हिंदुत्वाच्या तत्त्वाला तिलांजली देत पक्षप्रमुखांनी दोन्ही काँग्रेसशी हातमिळवणी केल्याची टीकाही त्यांनी केली.
शिवसेना विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीतील ठराव एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्रामध्ये अध्यक्ष झिरवाळ यांना पाठवले - आम्ही १४ व्या विधानसभेतील शिवसेना पक्षाच्या विधिमंडळ गटाचे सदस्य आहोत. आम्ही ३१ आॅक्टोबर २०१९ ला शिवसेना विधिमंडळ दलाचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची एकमताने निवड केली होती. २०१९ मधील १४ व्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात निवडणूकपूर्व युती झाली होती. - सरकार-प्रशासनातील भ्रष्टाचार, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (आता तुरुंगात) यांच्याकडून पोलिस नियुक्त्यांतील गैरव्यवहार, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (हेही आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत संबंधांमुळे कैदेत आहेत) यांच्यावरून शिवसेनेत प्रचंड नाराजी होती. - सरकारमध्ये असलेल्या परस्परविरोधी विचारसरणीच्या पक्षांकडून आमच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड छळ झाला. शिवसेनेच्या केडरचे खच्चीकरण करण्यासाठी ते सरकारी कार्यालये व यंत्रणांचा वापर करत आहेत. - शिवसेनेच्या विरुद्ध विचारसरणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्यास शिवसेनेच्या केडरचा प्रचंड विरोध होता. प्रखर विचारसरणी आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष म्हणून ओळख असलेल्या शिवसेनेच्या तत्त्वांशी तडजोड करण्यात आली. - महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी पक्षनेतृत्वाने पक्षाच्या तत्त्वांशी तडजोड करत परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या पक्षांसोबत गेल्या अडीच वर्षांपासून हातमिळवणी केली अाहे. - आमचे नेते बाळासाहेब ठाकरे प्रखर राष्ट्रवादी होते. या भ्रष्ट सरकारमध्ये सहभागी असल्याने आमच्यावर सातत्याने टीकेचे झोड उठत आहे. या पार्श्वभूूमीवर विधिमंडळ दलाची आज बैठक होऊन खालील ठराव मंजूर करण्यात आला. ३१ आॅक्टाेबर २०१९ रोजी सेना विधिमंडळ दलाच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती, ती यापुढेही कायम असेल याची आम्ही खात्री देतो.
- हिंदुत्वाशी तडजोड न करता महाराष्ट्रातील जनतेला स्वच्छ आणि प्रामाणिक सरकार देणे हे आमच्या पक्षाचे दिवंगत प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण होते. मात्र विरोधी विचारसरणीच्या पक्षांसोबत सत्तास्थापनेच्या पहिल्याच दिवशी त्याला सुरुंग लागला.
गोगावले शिंदे गटाचे प्रतोद
शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.