आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सगळेच आनंद दिघे नसतात, काही शिंदे असतात!:​​​​​​​शिवसेनेवरच दावा सांगण्याचा उद्दामपणा भाजपच्या पाठिंब्यातूनच, शिवसेनेचा आरोप

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेतून बंड करत शिंदेंसह 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. यावर आज शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. सगळेच आनंद दिघे नसतात! काही शिंदे असतात असे म्हणतानाच शिवसेनेवरच दावा सांगण्याचा उद्दामपणा, भाजपच्या पाठिंब्यातून आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तर लोकांना दमदाटी करत प्रवेश करायला लावत असल्याचे सांगतानाच काँग्रेससोबत बोलणी केल्याचा आरोपही शिंदेंवर करण्यात आला आहे.

नेमके काय केली टीका?

सण-उत्सवांच्या मोसमात महाराष्ट्राचे वातावरण आणि राजकारण कमालीचे गढूळ झाले आहे. शिवसेनेत मोठी फूट पाडून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. इथपर्यंत ठीक, पण त्यांनी सरळ शिवसेनेवरच दावा सांगितला. हे डोके शिंदे यांचे नाही. त्यामागे भारतीय जनता पक्षाचे मोठे कारस्थान आहे. छगन भुजबळ, नारायण राणे व राज ठाकरे यांनी बंड केले किंवा पक्ष सोडला, पण शिवसेनेवरच दावा सांगण्याचा उद्दामपणा यापैकी कोणीच केला नव्हता. हा उद्दामपणा भाजपच्या पाठिंब्यातून निर्माण झाला. आमचीच शिवसेना व आमचाच दसरा मेळावा. महाराष्ट्रात उभी फूट पाडण्यासाठी शिंदे यांनी आज हयात नसलेल्या स्व. आनंद दिघे यांचा आधार घेतला. दिघे यांची आठवण शिंदे यांना 21 वर्षांनंतर झाली. दिघे यांच्या आपण किती निकट होतो हे दाखविण्यासाठी शिंदे यांनी काही कोटी खर्च करून ‘धर्मवीर’ सिनेमा काढला.

सिनेमावर खर्च झाला त्यापेक्षा जास्त खर्च सिनेमाच्या म्हणजे स्वतःच्या प्रसिद्धीवर केला. हा सिनेमा आनंद दिघे यांच्यावर होता की शिंद्यांवर, असा प्रश्न हा सिनेमा पाहून अनेकांना पडला. कारण या सिनेमाचे प्रयोग सुरू असतानाच शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या पाठीत खंजीर खुपसला व शिवसेना फोडली. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून टीव्हीवर या सिनेमाचा भडीमार सुरू आहे तो फक्त शिंदे यांच्या प्रसिद्धीसाठी. या चित्रपटाद्वारे दिघे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हेच एक अद्भुत व्यक्तिमत्त्व असल्याचे दाखविण्यात आले. चित्रपटातील अनेक प्रसंग म्हणजे कथोकल्पित, कल्पनाविलास यांचे टोक आहे. या चित्रपटानंतर शिंदे यांनी आनंद दिघे यांची ढाल पुढे करून शिवसेना फोडली!

दहशत निर्माण करताय

ठाणे-पालघर-डोंबिवलीमधील जे शिवसैनिक शिंदेंबरोबर जायला तयार नाहीत त्यांचे घर, व्यवसाय, उद्योगांवर बुलडोझर फिरवून दहशत निर्माण केली जात आहे. हा दिघे यांचा वारसा म्हणता येईल काय? दिघे यांनी सच्च्या शिवसैनिकावर आपल्या राजकीय स्वार्थासाठी अन्याय केल्याचे उदाहरण दिसत नाही.

काँग्रेसशी बोलणी चालते का?

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनीही आता एकनाथ शिंदे हे सत्तेसाठी किती उतावीळ झाले होते याचा स्फोट केला आहे. ‘‘भाजप-शिवसेना ‘युती’चे सरकार असताना व फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे एक शिष्टमंडळ काँग्रेस नेत्यांना भेटले व नव्या सरकार स्थापनेचा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता (2014). त्या शिष्टमंडळात स्वतः एकनाथ शिंदे होते’’, असे चव्हाण यांनी सांगितले. म्हणजे तेव्हा शिंदे यांनी काँग्रेसबरोबर जाण्यास विरोध केला नव्हता व काँग्रेसबरोबर गेल्याने ‘ठाकरे-दिघे’ यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा वारसा मोडून पडेल असे त्यांना वाटले नव्हते. त्याच काळात त्यांनी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी संधान बांधले होते व 15 ते 20 आमदारांसह ‘येतो’, गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपद द्या ही चर्चा त्यांनी सुरू केली होती, असे ठामपणे सांगणारे आहेत. त्याला आजही प्रत्यक्षदर्शी आहेत.

ईडी’ पीडित आमदार शिवसैनिक?

शिंदे आज शिवसेनेला आव्हान देण्याची भाषा करतात. आनंद दिघे यांचा हा सगळय़ात मोठा अपमान आहे. शिंदे हे खरंच हिमतीचे असतील तर त्यांनी स्वतःचा नवा पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखवावी. ‘‘तुम्ही फुटा. न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडून हवे ते निकाल मिळवून देतो’’, या दिल्लीतील महाशक्तीच्या आश्वासनानंतरच शिंदे व त्यांचे 40 मिंधे यांनी फुटण्याचे धाडस दाखवले. शिंदे यांच्या बरोबर जे ‘आमदार’ आहेत त्यातले किती खरे शिवसैनिक आहेत? या बनावट लोकांच्या पाठिंब्यावर ते माझीच शिवसेना खरी असा दावा करतात हे हास्यास्पद आहे. अब्दुल सत्तार, उदय सामंत, सरनाईक, शहाजी पाटील, तानाजी सावंत, शिवाय ‘ईडी’ पीडित इतर आमदार यांना कोणी शिवसैनिक म्हणायला धजावेल काय? अशा बाजारबुणग्यांनीच इतिहास काळात मराठा साम्राज्य लयास नेले. हे बाजारबुणगेच मोगलांना फितूर झाले व त्यांनीच संभाजीराजांचा वध घडवून आणला. आनंद दिघ्यांच्या भोवती अशा बाजारबुणग्यांचे कोंडाळे कधीच दिसले नाही.

बातम्या आणखी आहेत...