आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे भाजपच्या वर्मावर बोट:'BJP'चा सर्वात मोठा पचका विदर्भात, सुशिक्षित-शहाण्या मतदाराने फडणवीस-मिंधेंना नाकारले

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचा सर्वात मोठा पचका विदर्भात झाला आहे. नागपूर शिक्षक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघ हे भाजपचे बालेकिल्ले होते. या दोन्ही मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. राज्यातील पाच विधान परिषद निवडणुकांचे निकाल म्हणजे महाराष्ट्राची मन की बात आहे. असे म्हणत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपच्या नेमक्या वर्मावर बोट ठेवत जोरदार टीका करण्यात आली आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. या पाच जागांपैकी तीन जागांवर महाविकास आघाडी एका जागेवर काँग्रेसच्या बंडखोराचा आणि एका जागेवर भाजपचा विजय झाला आहे. या निवडणुकीत सुशिक्षितांनी भाजपला नाकारल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. सामनातून नेमके हेच हेरुन टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

खोटारडेपणास ब्रेक लागणारे निकाल

सामनात म्हटले आहे, पाचपैकी फक्त एक जागा भाजपास मिळाली. भाजपचा व त्यांच्या मिंधे गटाचा सपशेल पराभव झाला. फडणवीस-मिंधे सरकारच्या खोटारडेपणास ब्रेक लागणारे हे निकाल आहेत. नागपूर शिक्षक, अमरावती पदवीधर, औरंगाबाद शिक्षक, नाशिक पदवीधर, कोकण शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुका पार पडल्या.

म्हात्रे मूळचे भाजपचे नाही

सामनात म्हटले आहे, पदवीधर शिक्षक म्हणजे संपूर्ण सुशिक्षित मतदार अशा निवडणुकीतून आपले प्रतिनिधी विधिमंडळात निवडून पाठवतो. पैकी कोकण मतदारसंघात (शिक्षक) भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे हे विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांचा पराभव करून निवडून आले. कोकणातील शिक्षक मतदारांनी यावेळी वेगळा निकाल दिला. संपूर्ण महाराष्ट्रात भाजप-मिंधे गटाची पिछेहाट होत असताना कोकणात हा एकमेव विजय त्यांना मिळाला. यात भाजपपेक्षा शिक्षक उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे कर्तृत्व जास्त. म्हात्रे हे काही मूळचे भाजपचे नाहीत.

मतदारांनी घाम फोडला

सामनात पुढे म्हटले आहे, अमरावतीचे भाजपचे उमेदवार रणजीत पाटील तर दोन वेळा निवडून आले होते. ते देवेंद्र फडणवीस यांचे खासमखास होते. त्यांना जिंकण्याची 1000 टक्के खात्री होती. पण त्यांना अमरावतीतील मतदारांनी घाम फोडला आणि घरीच बसवले.

ही भाजपची मक्तेदारी नाही

सामनात म्हटले आहे, अमरावतीत जे घडले तेच नागपुरात घडले. देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात भाजपला पराभव पत्करावा लागला. याचा अर्थ विदर्भातील सुशिक्षित मतदार शहाणा झाला असून त्याने भाजपला पूर्णपणे नाकारले आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ ही भाजपची मक्तेदारी राहिली नाही हे या निकालाने स्पष्ट झालं आहे, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे ताजे जनमानस

सामनात म्हटले आहे, नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला, फडणवीस यांचे वर्चस्व असलेला जिल्हा. तरीही भाजपचा पराभव झाला. हाती सत्ता, पोलिस, पैशाचे बळ असूनही पदवीधर भाजपला बधले नाहीत. त्यांनी भाजपचा पचकाच केला. पदवीधर आणि शिक्षकांनी दिलेला कौल हे महाराष्ट्राचे ताजे जनमानस आहे, असे सांगतानाच भाजप आणि मिंधे गटाला अजून अनेक धक्के पचवायचे आहेत.

तांबे हे काँग्रेसचेच

सामनातून काँग्रेसलाही खडे बोल सुनावण्यात आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे सत्यजित तांबे हे भाचे. त्यामुळे मामांची कोंडी झाली. झाकली मूठ तशीच ठेवून तांबे हे काँग्रेसचेच उमेदवार असा पवित्रा काँग्रेसने घ्यायला हवा होता.

बातम्या आणखी आहेत...