आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभा निकालावर राऊतांची प्रतिक्रिया:हरभरे टाकल्यावर घोडे कुठेही जातात, ज्यांनी आम्हाला मत दिलं नाही त्यांची नावं आमच्याकडे

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील 6 राज्यसभा जागांसाठीचे निकाल जाहीर झाले. मतमोजणीस झालेल्या विलंबामुळे निकाल लांबला होता. यात भाजपने 3 जागा, तर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. या निकालावरून आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या निकालावरून राज्यात भाजपने घोडेबाजार भरवल्याची टीका केली आहे.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज्यसभेची निवडणुकीची प्रक्रिया ही फारच किचकट आहे. ज्या कारणासाठी आमचं म्हणजे शिवसेनेचं एक मत बाद केलं, त्याच प्रकारची चूक समोरच्यांनी (भाजप) केली होती, पण त्यांचं मत बाद नाही झालं. कुणाला पडलेलं मत बाद झालं हे शोधायला सात तास लागले. या देशातील केंद्रीय यंत्रणा या सत्ताधारी पक्षासाठी कशा प्रकारे काम करतात हे आम्ही काल डोळ्याने पाहत होतो.

निवडणूक यंत्रणेचाही सत्ताधाऱ्यांकडून वापर?

राऊत पुढे म्हणाले की, कुठे ईडी, कुठे सीबीआय वापरली जाते, आणि कुठे अशा प्रकारे निवडणूक यंत्रणा वापरली जाते का, अशा प्रकारची शंका आता येऊ लागली आहे. त्यांनी फार मोठा देदीप्यमान विजय मिळवला असं नाही. 33 मते पहिल्या पसंतीची मते आम्हाला, तर 27 पहिल्या पसंतीची मते महाडिकांना मिळाली. तसं म्हटलं तर 33 आणि 27 मध्ये फरक आहे. पण निवडणूक प्रक्रियेत पहिल्या-दुसऱ्या पसंतीच्या मतांवरून गणित ठरत असते. काही घोडे बाजारात असतात, जास्त बोली लागली किंवा इतर काही कारणे असतील, त्यामुळे 6 मते आम्हाला मिळाली नाहीत. असे लोकं कुणाचेही नसतात. पण महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना असेल, बच्चू कडू असतील, गडाख असतील आमचे एकही मत फुटले नाही.

ज्यांनी आम्हाला मत दिलं नाही, त्यांची नावं आमच्याकडे

आम्ही कोणत्याही व्यवहारात पडलो नाही, आम्ही व्यापार केला नाही, तरीही आम्हाला 33 मते मिळाली यातच आमचा विजय आहे. अर्थात ज्यांनी आम्हाला मतं दिली नाहीत, त्यांची आमच्याकडे नावं आहेत, एवढंच मी सांगेन, असा इशाराही राऊतांनी दिला. हितेंद्र ठाकूरांची 3 मते, संजय मामा शिंदे, श्यामसुंदर शिंदे आणि देवेंद्र भुयार यांनी मविआला मते दिली नसल्याचे संजय राऊत यांनी पत्रकारांसमोर सांगितले.

सुहास कांदेंचं मत बाद का झालं? हा संशोधनाचा विषय

आम्ही मलिक आणि देशमुखांच्या मतांचा विचार करत नाही, सुहास कांदे यांचं मत का बाद झालं? हा एक संशोधनाचा विषय आहे. ज्या कारणासाठी कांदे यांचं मत बाद झालं, त्याच कारणासाठी सुधीर मुनगंटीवारांच्या मताला आक्षेप घेतला. प्रत्यक्ष मतदान करत असताना कोणत्याही प्रकारचं धार्मिक प्रदर्शन करायचं नसतं हे माहिती असूनही अमरावतीचे एक शहाणे जे काही उद्योग करत होते, त्यावरून त्यांचंसुद्धा मत घटनेनुसार बाद व्हायला हवं होतं. पण फक्त आमचं मत बाद करण्यासाठी पहाटेपर्यंत त्यांचा जो उपक्रम सुरू होता, त्याला आमच्या शुभेच्छा, असा टोलाही त्यांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...