आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविकास आघाडीत मतभेद:राज्यसभेत पोळल्याने शिवसेनेने झटकले ‘हात’, विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला ताप

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीत चांगलेच पोळल्याने शिवसेनेने विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीत आघाडीचा धर्म बाजूला ठेवत ‘हात’ झटकले आहेत. ‘ज्याने त्याने आपले पाहावे’ असा निरोप शिवसेनेकडून गेल्यामुळे काँग्रेसची दुसरी जागा धोक्यात आली आहे.

गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक होत असल्याने शिवसेनेच्या नाराजीचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता असून काँग्रेस उमेदवार भाई जगताप यांची उमेदवारी काँग्रेससाठी ‘ताप’दायक ठरू शकते.

आघाडीच्या या अंतर्गत साठमारीत छोटे पक्ष आणि अपक्षांच्या पाठबळावर भाजपचा ५ वा उमेदवार निवडून येण्याची अधिक शक्यता आहे. विधान परिषदेच्या १० जागांची निवडणूक सोमवार, २० जून रोजी होत आहे.यासाठी एकूण १५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात भाजपचे ५, तर काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ असे ६ उमेदवार आहेत. रयत क्रांती पक्षाचे सदाभाऊ खोत यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. मात्र ते निवडणूक रिंगणातून माघार घेण्याची शक्यता आहे.

सोमवार, १३ जून रोजी उमेदवारी अर्ज माघारीचा अंतिम दिवस आहे. विजयी उमेदवारास विधानसभा आमदारांची २७ मते आवश्यक आहेत. शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २ व काँग्रेसचा एक व भाजपचे ४ उमेदवार सहज निवडून येतील. काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवारास १७ मते कमी पडतात. अपक्ष व छोट्या पक्षांच्या बळावर भाजपने ५ वा उमेदवार दिला आहे.

काँग्रेससमोर मुंबई पालिकेचे गणित

सप्टेंबरमध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीचे गणित डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांना दुसऱ्या जागेची उमेदवारी दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे जगतापांना शिवसेना मदत करण्याची शक्यता नाही. राज्यसभेत चांगलेच तोंड पोळल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीत ‘ज्याने त्याने आपापले पाहावे किंवा उमेदवारी मागे घ्यावी’ अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

पुढे काय ?

मतदान गुप्त असल्याने क्राॅस व्होटिंग होणार हे अटळ आहे. आघाडी सरकारला विश्वासदर्शक ठरावावेळी १७० सदस्यांचा पाठिंबा होता. विधान परिषद निवडणुकीत पहिल्या क्रमांकाची १७० मते आघाडीला मिळाली नाही तर सरकारने पाठिंबा गमावला असल्याचा आरोप भाजप करेल.

राज्यसभेतील दगाफटका शिवसेनेच्या जिव्हारी
काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात कडवी लढत होणार आहे. विधान परिषदेचे मतदान गुप्त पद्धतीने आहे. त्यामुळे छोटे पक्ष, अपक्ष आणि पक्षांतर्गत नाराज आमदारांकडूनही काँग्रेस उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना सर्वच्या सर्व ४४ मते मिळाली होती. संजय पवार यांना काँग्रेसची पहिल्या पसंतीची मते मिळाली नाहीत. आघाडीतील मित्रपक्षाकडूनच दगाफटका झाल्याने या निवडणुकीत शिवसेना काठावरून गंमत पाहणार असल्याचे समजते.

भाई जगताप- प्रसाद लाड बलाबल

काँग्रेसचे भाई जगताप कामगार नेते आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार प्रसाद लाड वार्षिक उलाढाल १२०० कोटी असणाऱ्या क्रिस्टल कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात लाड कुटुंबीयांची चल-अचल संपती १४५ कोटी, तर जगताप कुटुंबीयांची ४५ कोटी दाखवली आहे.

विधानसभा आखाडा : २८५ आमदार
मतांचा कोटा : २७
शिवसेना ५५ मते+ २ उमेदवार = १ मत अतिरिक्त
राष्ट्रवादी : ५१ मते+ २ उमेदवार = ३ मतांची गरज

काँग्रेस : ४४ मते +२ उमेदवार = १० मतांची गरज भाजप : १०६ मते + ५ उमेदवार = २९ मतांची गरज

इतर : २९ मते

प्रमुख उमेदवार : आमशा पाडवी, सचिन अहिर (शिवसेना), एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर (राष्ट्रवादी), चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप (काँग्रेस) प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे व प्रसाद लाड (भाजप), सदाभाऊ खोत (अपक्ष).

बातम्या आणखी आहेत...