आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची विरोधकांवर टीका:दिल्लीत जाऊन घंटानाद करण्याची हिंमत दाखवा, भाजपला सल्ला; तर 2 दहीहंड्या फोडून कोरोना पळत असेल तर टास्क फोर्सनंही विचार करावा, मनसेला कोपरखळी

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुखणे पोटाला आणि प्लॅस्टर पायाला त्यातलाच हा प्रकार

राज्यातील निर्बंधांवरुन सध्या विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. दहीहंडीवरील निर्बंधांचा विरोध करत मनसेने मुंबई, ठाण्यात दहीहंडी साजरी करण्याचा प्रयत्न केला. तर भाजपकडून मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केले जात आहे. अण्णा हजारेंनीही मंदिरे न उघडल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावरुन आता शिवसेनेने विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. सामना अग्रलेखातून त्यांनी भाजपसह मनसेलाही सुनावले आहे.

दिल्लीत जाऊन घंटानाद करा
'तिसरी लाट जास्त धोकादायक आहे. दहीहंडी व गणेशोत्सवात सावधानता बाळगा, असं केंद्र सरकारनंच ठाकरे सरकारला ‘लेखी’ कळवलंय. आता तुम्ही दिल्लीतल्या तुमच्या माय-बापांचेही ऐकणार नाहीत का? महाराष्ट्रात ‘घंटा’ बडवताय कशाला? गर्दीवर, सणांवर निर्बंध आणा अशा केंद्राच्याच सूचना आहेत. मग दिल्लीत जाऊन घंटानाद करण्याची हिंमत दाखवत का नाही? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

दुखणे पोटाला आणि प्लॅस्टर पायाल
महाराष्ट्रातून शिष्टमंडळ घेऊन दिल्लीस जावे व पंतप्रधान, गृहमंत्र्यांना भेटावे. त्यांच्या दारात मंदिर उघडण्यासाठी जागर करावा, पण यांची बोंबाबोंब महाराष्ट्रात सुरु आहे, दुखणे पोटाला आणि प्लॅस्टर पायाला त्यातलाच हा प्रकार. केंद्र सरकारने निर्बंधांबाबत पाठवलेल्या खलित्याची होळी करायची की, सुरनळी यावरही विरोधकांकडून मार्गदर्शन व्हावे. असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

भाजपसह अण्णा हजारेंनाही टोला
105 आमदार असलेल्या प्रमुख विरोधी पक्ष भाजप मंदिरे उघडण्यासाठी घोळके जमवून घंटानाद करु लागला आहे. सगळे काही उघडले, मंदिरे का उघडत नाहीत? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. राळेगणातून अण्णा हजारेंनीही भाजपच्या सुरात सूर मिसळून मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन पुकारण्याची तुतारी फुंकली आहे. बेमुदत उपोषणाचा इशारा अण्णांनी दिल्यामुळं बहुधा आपले देवही गोंधळले असतील. असा टोला शिवसेनेने अण्णा हजारेंना लगावला आहे.

विरोधकांचं डोकं ठिकाणावर असेल तर...
'ठाकरे सरकार हे हिंदूविरोधी असल्याचा प्रचार केला जातोय. सण, उत्सवांच्या बाबत ठाकरे सरकार कोरडं आहे. देवदेवळांचं सरकारला काहीच पडलेलं नाही, अशा प्रचारी पिचकाऱ्या मारल्या जात आहेत. पण त्या पिचकाऱ्या विरोधकांवरच उलटणार आहेत. विरोधकांचं डोकं ठिकाणावर असेल तर त्यांनी आपल्या राज्यातील जनतेचा विचार आधी केला पाहिजे. माणूस जगला नाही, तर मंदिरं कायमचीच ओस पडतील असं भयानक चित्र करोनामुळे जगभरात निर्माण झालं आहे.' असे शिवसेनेने म्हटले आहे.

विरोधकांना मूर्खपणाचं फुरसं चावल्यामुळं...
'लढाई करोनाच्या विरोधात हवी, पण विरोधकांना मूर्खपणाचं फुरसं चावल्यामुळं त्यांची लढाई सरकारविरोधात आहे. अर्थात विरोधकांना फुरसं चावलं म्हणून सरकारनं स्वतःचा तोल ढळू देता कामा नये. कारण राज्यातील कोट्यवधी लोकांच्या जिवाचा विचार करून सरकारला पावले उचलायची आहेत,' असे शिवसेनेने म्हटले.

रस्त्यांवर हंड्या फोडत स्वतःचंच हसं करून घेतलं
'निर्बंध झुगारून दहीहंडी साजरी करण्याचं शौर्य महाराष्ट्रातल्या काही फुटकळ विरोधी पक्षांनी बजावलं आहे. हे पक्ष आज पूर्णपणे अस्तित्वहीन आणि निपचित झाले आहेत. लोकांनी त्यांना निवडणुकांत वारंवार जमीनदोस्त केले, पण विरोधासाठी विरोध या एकमेव अजेंड्यावर विरोधी पक्ष दोन-चार लोकांना एकत्र करून रस्त्यांवर हंड्या फोडत स्वतःचंच हसं करून घेत होता,' मनसेविरोधात शिवसेने टोलेबाजी केली आहे.

...तर टास्क फोर्सनेही विचार करावा
दोन दहीहंड्या फोडून कोरोना पळत असेल तर सर्वोच्च न्यायालायने नेमलेल्या टास्क फोर्सने त्याचाही विचार करावा. केंद्र सरकारने निर्बधांबाबत पाठवलेल्या खलित्याची होळी करायची की, सुरनळी,त्यावरही विरोधकांकडून मार्गदर्शन व्हावे. असेही शिवसेनेने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...