आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमळाबाईच्या मराठी दांडियाने शिवसेना इंचभरही हलणार नाही:सेनेचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; आमचा दांडिया अस्सल मर्दानी

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचा दांडिया अस्सल मर्दानीच असतो. शिवसेनेच्या शाखा म्हणजे चोवीस तास लोकांसाठी उघडी असलेली जनमंदिरेच आहेत. तितकीच ती न्यायाची मंदिरे आहेत. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची केलेली ही रचना आजही मजबूत पायावर उभी आहे. ती कमळाबाईच्या मराठी दांडियाने इंचभरही हलणार नाही अशा शब्दात शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपा आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

पुढे शिवसेनेने म्हटले आहे की, शिवसेना शिल्लक आहे म्हणून मऱ्हाठी शिल्लक आहे. हिंदुत्व बचावले आहे. शिवसेनेवर पाठीमागून घातकी वार करणाऱ्यांना याच शिवसेनेने स्वाभिमानाने जगायला शिकविले. गर्वाने ‘मराठी’पणाची कवचकुंडले दिली, पण आज तेच लोक शिवसेनेवर उलटले आहेत. स्वकीयांशी लढणे हे महाराष्ट्राचे व मराठ्यांचे दुर्भाग्य काय आजचे आहे? मुंबईवरील संकटाचा प्रत्येक घाव शिवसेनेने छातीवर झेलला आहे.

प्रयोग भरपूर केले

भाजपने मिशन मुंबईसाठी कंबर कसली असून, त्याचा देखील समाचार शिवसेनेने घेतला आहे. मुंबई महापालिकेवरील ‘भगवा झेंडा’ खाली खेचण्यासाठी भाजपच्या कमळाबाई अनेक युक्त्या आणि क्लृप्त्या करीत आहे. एका बाजूला मराठी लोकांत फूट पाडायची तर दुसऱ्या बाजूला शाकाहार, मांसाहार असे विषय घेऊन इतर प्रांतीय, समाजाला वेगळे करायचे असे त्यांचे एकंदरीत धोरण आहे. शिवसेना म्हणजे मराठी एकजुटीची वज्रमूठ, हिंदुत्वाचा बुलंद हुंकार. वारे इकडे तिकडे कितीही फिरले तरी मराठी एकजुटीचे मन कधीच भरकटले नाही. गेल्या 50 वर्षांत कमळाबाईने हे असले ‘दांडिये’ प्रयोग भरपूर केले, पण त्यांना यश आले नाही, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

भाजपचा हा भ्रम

लालबाग, परळ, शिवडी या शतप्रतिशत भगव्या प्रदेशात कमळाबाईने खास मराठी दांडियाचे आयोजन करून मराठी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालवला आहे. गणपती उत्सवानंतर नवरात्री उत्सवात भाजप आपल्या राजकीय टिपऱ्या अशा प्रकारे घुमवत आहे. अर्थात असे ‘दांडिये’ घुमवून मराठी माणसांची एकजूट फोडता येईल हा त्यांचा भ्रम आहे.

समजू नये काय?

पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना शिवसेने म्हटले आहे की, मुंबईतील मराठी माणसांची एकजूट म्हणजे ‘मिंधे’ गटात सामील झालेल्या आमदारांची कमअस्सल अवलाद नाही. लालबाग, परळ, माझगाव, शिवडी, दादर, भायखळा इतकेच काय, गिरगावपासून दहिसर-मुलुंडपर्यंतचा मुंबईतील प्रदेश सतत शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला व त्यात मराठीजनांबरोबर हिंदी, गुजराती, जैन, मारवाडी, मुस्लिम, दाक्षिणात्य असे ‘मुंबैकर’ बांधवही समर्थनार्थ उभे राहिले. हे भाजपच्या दांडियेकरांना इतक्या वर्षांत समजू नये काय?

महाराष्ट्रावर दुहीची आफत

मुळात फक्त ‘दांडिये’ करून मुंबईवर शिवसेनेचे राज्य टिकले नाही. शिवसेनेने सामान्य जनतेचे प्रश्न सोडवले. गरबा काय किंवा दांडिया काय, नवरात्रीतला एक पवित्र आणि सांस्कृतिक मनोमीलनचा सोहळा आहे. तरुण, आबालवृद्ध असे सगळेच त्यात सहभागी होतात. मात्र अशा पवित्र उत्सवातही राजकारणाच्या फोडाफोडीचे विष पेरणारे हे लोक महाराष्ट्रावर दुहीची आफत आणत आहेत.

नवे नवे उद्योग सुरू

काही दिवसांपूर्वी कमळाबाईच्या प्रेरणेने मुंबईत ‘मराठी कट्टा’ नामक एक अजब प्रकार सुरू झाला. त्याचे पुढे काय झाले हे कोणीच सांगू शकत नाही. मराठी कट्टे काय किंवा हे मराठी दांडिये काय शिवसेनेला विरोध करण्यासाठीच सगळे उपद्व्याप सुरू झाले आहेत. दिल्लीश्वरांना मुंबईवरून भगवा हटवायचाच आहे व त्यासाठी त्यांचे हे नवे नवे उद्योग सुरू झाले आहेत, असे म्हणत शिवसेनेचे भाजपवर टीका केली.