आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय जनता पक्षाचे नेते इतक्या बेतालपणे का बोलत आहेत? कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांचे तळतळाट व शाप त्यांना लागलेत का? असा सवाल शिवसेनेच्या मुखपत्रातून विचारण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात महापुरुषांच्या बदनामीचा ‘जिहाद’ सरकारने पुकारला आहे काय? असा सवालही शिवसेनेकडून करण्यात आलाय.
गेली अनेक दिवस राज्यातील राजकीय वातावरण नेत्यांच्या राजकीय वक्तव्यामुळे तापले आहे.याच मुद्द्यावरुन शिवसेनेकडून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. तर लव्ह जिहादविरुद्ध कायदा महाराष्ट्र सरकार बनवत आहे. त्याआधी शिवराय, फुले, आंबेडकरांच्या विरोधात वळवळणाऱ्या जिभांना आवर घालणारा कायदा करा अशी मागणी ही शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
नेमके काय आहे अग्रलेखात?
महाराष्ट्रात कटुतेचा स्फोट झाला आहे व या वातावरणास भारतीय जनता पक्षच जबाबदार आहे. महाराष्ट्रातले वातावरण इतके गढूळ आणि विषारी कधीच झाले नव्हते. महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी येथे शाईफेक करण्यात आली. अशा घटनांचे समर्थन करता येणार नाही, पण शेवटी जे पेरले तेच उगवताना दिसत आहे. पाटील यांनी डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासंदर्भात एक विधान केले. त्यातून हा शाईफेकीचा स्फोट झाला, पण महाराष्ट्रातील एक वर्ग वेगळेच सांगतो आहे. मिंधे गटाचे आमदार गुवाहाटी येथे कामाख्या देवीची वेगळ्या पद्धतीने पूजाअर्चा करून आले. तेथे तंत्र, मंत्र, करणी वगैरे प्रकार केले जात असल्याची वदंता आहे. मिंधे गटाच्या लोकांनी मंदिरात जाऊन नक्की काय केले ते त्यांनाच माहीत, पण तेव्हापासून महाराष्ट्रातील भाजप मंत्री व पुढाऱ्यांची डोकी साफ भरकटून गेली आहेत. ते वेड्यासारखे बरळू लागले आहेत. मिंधे गटाने नक्की कोणाच्या विरोधात जारण-मारण केले असा प्रश्न त्यामुळे महाराष्ट्राला पडला आहे.
मंत्री सरळ धमकी देतात
भाजपचे राज्यपाल व मंत्र्यांनी आधी छत्रपती शिवरायांचा अपमान केला. ते वातावरण तापलेले असतानाच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भडका उडाला. ‘त्या काळात सरकार अनुदान देत नसतानाही डॉ. आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी लोकांकडे भीक मागून शाळा उभारल्या. आता मात्र संस्थाचालक शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात, असे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या महापुरुषांनी ‘भीक’ मागितली हे पाटलांचे विधान आता वादाचे कारण ठरले आहे. महाराष्ट्र सरकारचे मंत्री त्यांच्या वाचाळकीमुळे रोजच स्वतःचे हसे करून घेत आहेत व महाराष्ट्राचीही बदनामी करीत आहेत. मिंधे गटाचे मंत्री शंभू देसाई यांनी संजय राऊत यांना सरळ धमकी दिली की, ‘तुम्ही परखड बोलणे थांबवले नाही, तर पुन्हा तुरुंगात टाकू.’
शंभूराज देसाई का गर्जत नाहीत?
शंभूराज देसाई यांनी ही दमबाजी चंद्रकांत पाटील, शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल, भाजपचे आमदार यांच्यासारख्यांना केली पाहिजे. आंबेडकर, फुले, कर्मवीर पाटील यांना भिकारी म्हणणाऱ्यांना व शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना तुरुंगात पाठवू, असे हे शंभूराज देसाई का गर्जत नाहीत? हा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते इतक्या बेतालपणे का बोलत आहेत? कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांचे तळतळाट व शाप त्यांना लागलेत का? नपेक्षा शिकल्या-सवरलेल्या माणसांच्या डोक्यावर असा परिणाम झालाच नसता. चंद्रकांत पाटील हे तर राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आहेत. शिक्षणमंत्री म्हणून त्यांना भिकेचे डोहाळे लागले आहेत व तेच त्यांच्या मुखातून बाहेर पडत आहे. पाटील यांच्या विधानाचे पडसाद बहुजन समाजात उमटू लागले आहेत. ते पिंपरीतील घटनेवरून दिसले. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, कर्मवीर पाटील यांनी ‘लोकवर्गणी’तून संस्था उभ्या केल्या. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बाबत सांगायचे तर, बहुजन समाजाला इतरांच्या बरोबरीने स्थान मिळाले पाहिजे, जाती-जमातीचे भूत गाडले गेले पाहिजे या विचाराने त्यांनी सातारच्या माळरानावर ज्ञानयज्ञ उभा केला व जगभरात नेला.
ईश्वरपूरमधील (इस्लामपूर) एका शाळेत एक दलित मुलगा बाहेर बसलेला भाऊरावांनी पाहिला. ‘अस्पृश्य मुलाला वर्गात घेता येणार नाही.’ हे शिक्षकांचे उत्तर ऐकून संतप्त झालेले भाऊराव त्या मुलाला घेऊन घरी आले व तुझ्यासाठी वेगळी शाळा मी काढीन, असे आश्वासन देऊन त्यांनी त्या मुलाची तात्पुरती व्यवस्था कोल्हापूरच्या ‘मिस क्लार्क हॉस्टेल’मध्ये केली. रयत शिक्षण संस्थेचा हा उगम ठरला व 1924 मध्ये एका हरिजन विद्यार्थ्याला बरोबर घेऊन भाऊराव पाटलांनी साताऱ्यात छत्रपती शाहू बोर्डिंगची स्थापना केली. रयत शिक्षण संस्थेची ही मुहूर्तमेढ ठरली. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा निघाली पाहिजे या ईर्षेने जवळ जवळ 550 शाळा त्यांनी सुरू केल्या. सातारचे विद्यार्थी बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले. त्यांची सोय व्हावी म्हणून खुद्द लंडनला महात्मा गांधी वसतिगृह काढले.
गरिबीमुळे व जातीच्या अडचणीमुळे
शिक्षण मिळाले नाही ही गोष्ट त्यांनी शिल्लक ठेवली नाही. पुन्हा देणग्या मिळतील त्यांची नावे द्यायची असा देखावा कधी केला नाही. त्यामुळे कर्मवीरांनी संस्था चालवण्यासाठी भीक मागितली हे बोलणे बरोबर नाही. तसेच महात्मा फुले यांच्या संदर्भात प्रा. हरी नरके यांनी चांगली माहिती समोर आणली आहे. ते सांगतात, ‘‘फुले, आंबेडकर, कर्मवीर हे स्वाभिमानी होते. त्यांनी कधीही कोणाकडेही भीक मागितली नाही. फुले पक्षाघाताने आजारी होते तेव्हा उपचारासाठीही पैसे नव्हते, पण त्यांनी त्यासाठी कोणाकडे मदतीची याचना केली नाही. बाबासाहेबांना ‘बुद्ध ऍण्ड हिज धम्म’ हा ग्रंथ छापायचा होता. त्यांच्याकडे पैसे नव्हते, पण त्यांनी कोणापुढे हात पसरले नाहीत. कर्मवीरांनी पत्नीचे दागिने विकले, पण पैशाअभावी मुलांचे शिक्षण थांबू दिले नाही.
पदरमोड करून शाळा चालवल्या
जोतिराव, सावित्रीबाई आणि त्यांचे सहकारी पदरमोड करून शाळा चालवीत असत. बाबासाहेबांनी गरीबांच्या शिक्षणासाठी खूप खस्ता खाल्ल्या. बाबासाहेब हे तर स्वाभिमानाचा एक धगधगता ज्वालामुखीच होते, असे आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे ते खरेच आहे. महाराष्ट्राच्या विद्यमान उच्च शिक्षणमंत्र्यांचा अभ्यास कच्चा असल्यानेच त्यांनी महापुरुषांनी शाळा चालविण्यासाठी भीक मागितली असे म्हटले.
राजकारण लाचारी व भिकेच्या कुबड्यांवर उभे
सातारच्या महाराजांनी धनिणीची बाग शाहू बोर्डिंगला दिली. तेव्हा नामकरण समारंभाला 1927 साली खुद्द महात्मा गांधी आले होते. ‘शाहू महाराजांनी किती देणगी दिली म्हणून तुम्ही त्यांचे नाव या संस्थेला दिले,’ असे गांधीजींनी त्यांना विचारले. यावर भाऊराव उत्तरले, ‘‘शाहू महाराजांनी मला फक्त रयत सेवकाचे अंतःकरण दिले आहे.’’ हा सर्व इतिहास आजचे मंत्री विसरले. कारण आजचे राजकारण लाचारी व भिकेच्या कुबड्यांवर उभे आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता दिलगिरी व्यक्त करून माघार घेतली. तरीही शाईफेकीचा हल्ला त्यांच्यावर झाला. महाराष्ट्रात महापुरुषांच्या बदनामीचा ‘जिहाद’ सरकारने पुकारला आहे काय? ‘लव्ह जिहाद’विरुद्ध कायदा महाराष्ट्र सरकार बनवत आहे. त्याआधी शिवराय, फुले, आंबेडकरांच्या विरोधात वळवळणाऱ्या जिभांना आवर घालणारा कायदा करा!
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.