आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Shiv Sena Will Be Formed With The Help Of The Remaining Shiv Sainiks Commentary Of Chief Minister Thackeray In The Meeting Of Corporators

शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव:जो शिवसैनिक उरेल त्याच्या साथीने शिवसेना उभी करेल- उद्धव ठाकरेंची लढण्याची जिद्द

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''शिवसेना तलवार आहे, म्यान केली तर गंजते आणि बाहेर काढली तर तळपते. शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव आहे. ज्यांना सोडून जायचे त्यांनी जावे; पण जेही शिवसैनिक राहतील त्यांच्या साथीने मी पुन्हा शिवसेना उभी करेल आपल्यासोबत गद्दार नको अशी ठोस भूमिका राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनी आज घेतली.

शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीनंतर राज्यातील नगरसेवकांची बैठक व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे त्यांनी आज रात्री घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घालीत लढत राहणार असल्याचेही संकेत दिले.

शिवसेना मर्दाची सेना

ठाकरे म्हणाले, शिवसेना ही मर्दांची सेना आहे, हे नुसते बोलत नाही तर आम्ही आव्हान देत पुढे गेलो हा इतिहास आहे. आताचा प्रसंग थोडा वेगळाही आहे आणि वेगळाही नाही. शिवसेनेच्या वर्धापन दिनी म्हटले होते की, गद्दारांची औलाद नको तेच आज आपल्यासमोर आले आहेत.

आपल्याच लोकांनी घात केला

ठाकरे म्हणाले की, सगळे सांगत होते की, राष्ट्रवादी, काँग्रेस दगा देईल; पण आज सांगायचे झाले तर तेच आज माझ्या अडचणीच्या काळात सोबत आहेत, पाठीत पून्हा एकदा खंजिर कुणी खूपसला तर आपल्याच माणसांनी असे शल्य व्यक्त करीत त्यांनी शिवसैनिकांनी, रक्ताचे पाणी शिवसैनिकांनी केले हे विसरता कामा नये असेही स्पष्ट केले.

नगरसेवकांचे आभार

ठाकरे म्हणाले, पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणणे हे तूमचे काम आहे, नगरसेवकांतही आमदार होण्याची ताकद होती, तरीही तूमची योग्यता असतानाही आम्ही त्यांना आमदार केले पण तुम्ही नाराज झाला नाहीत त्याबद्दल तूमचे आभार मानतो असेही ते नगरसेवकांना उद्देशून म्हणाले.

भाजपकडून कुटुंबाची अन् मातोश्रीची बदनामी

भाजपवर शरसंधान साधताना ठाकरे म्हणाले की, भाजपने आपल्याशी विश्वासघातकीपणा केला, दिलेली वचने नाकारली. द्वेषापायी भाजपने आपल्यावर तपास यंत्रणा मागे लावली ही असली मैत्री नसते. मातोश्रींची, कुुटुंबियांची बदनामी भाजप करीत आहे असेही ते म्हणाले.

मी आत्ताही राजीनामा देण्यास तयार

ठाकरे म्हणाले की, बंडखोरांत स्पष्टता होत नाही तोपर्यंत काय करायचे हे ठरवणार होतो पण ते सूरतला गेले. नंतर गुवाहटीला गेले, एवढे एकनिष्ठच होता तर आमदारांना माझ्याकडे का आणले नाही असा माझा सवाल आहे. मुख्यमंत्रीपदाचा मोह नाही , उद्याही नसेल, मी पक्ष चालवायला नालायक आहे असे लोकांना वाटत असेल तर शिवसेनाप्रमुखांनी जाताना सांगितलेला शब्द सोडा पण तुम्ही म्हणत असाल तर मी आत्ताच राजीनामा देतो. माझ्यापेक्षा जास्त चांगले काम करणाऱ्यांना मी पद देतो.

भाजपला हिंदुत्वात भागीदार नको होता

ठाकरे यांनी भाजपवर टीका केली की, हिंदुत्वात भाजपला भागीदार नको, हिंदु मतांत विभागणी नको म्हणून त्यांनी शिवसेना संपवण्याचा घाट घातला. शिवसेनेला संपवून भाजपला वाढवायचे ही त्यांची निती आहे, त्यांच्याशी बाळासाहेब युती करुन गेले पण जे काही चांगले झाले ते आज भाजपही उपभोगतच आहे.

बंडखोरांचे मला काॅल

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आजही काही बंडखोर आमदार खूश नाही. मला ते काॅल करीत आहेत. आज आपल्या हातात काही असेल नसेल उद्याची निवडणूक बंडखोरांची नाही. चढ-उतार येत राहतात. अडीच वर्षात मी मुख्यमंत्री म्हणून मी सुख काय भोगले तर काहीही नाही. आनंद म्हणून मला काहीही मिळाले नाही. शिवसेनेने मोकळेपणा दिला, मी कुणाच्याही खात्यात ढवळाढवळ केली नाही. स्वातंत्र्य दिले भाजपमध्ये तसे स्वातंत्र्य नाही असेही ते म्हणाले.

शिवसेना कुणाची?

शिवसेना बाळासाहेबांची आहे आणि माझ्यापुढे त्यांचे नाव आहे. मीच माझ्या शिवसेनेवर का वार करू असा सवालही त्यांनी व्यक्त केला. कोणत्याही परिस्थिती उद्धव ठाकरे एकटे पडतील असा भाजपचा डाव आहे, निवडून आलेल्याना ते घेऊन गेले पण निवडून येणाऱ्यांना घेऊन जाऊ शकत नाही असेही ठाकरे म्हणाले.

भाजप हिंदु मते फोडत आहे

ठाकरे म्हणाले की, हिंदु मते फोडण्याचे पाप भाजप करीत आहे. शिवसेनेच्या पाठीत भाजपने वार केला. भाजप म्हणते की, शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली पण ते खोटे आहे, अपप्रचार आहे.

शिवसैनिक 'वर्षा'मध्ये असेल!

वर्षा सोडली म्हणजे मी मोह सोडला. जिद्द सोडली नाही. वर्षा बंगल्यात शिवसैनिक जाणार मी नाही असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिवसेना विजयी होईपर्यंत मी थांबणार नाही असे सांगा बस्स मला काहीही नको असेही ते नगरसेवकांना उद्देशून म्हणाले.

माझे वैभव शिवसैनिक

तुमच्याच भरवशावर मी पाऊले टाकणार आहे, ज्यांना जायचे त्यांना जाऊद्या. जे गेले त्यातील बरेच पळालेले आहेत. फसवून जाऊ नका उघडपणे जा. जो शिवसैनिक राहील त्यासोबत मी पुन्हा शिवसेना उभी करणार आहे. माझे वैभव शिवसैनिक आहेत असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...