आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना देशभर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार, संजय राऊत यांची माहिती

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना देशभर लढवणार असल्याचे पक्ष प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले. आदित्य यांच्या नेतृत्वाबाबत राऊत यांनी जाहीरपणे वक्तव्य केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणामुळे पक्षनेतृत्वाबाबत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी शिवसेनेत आदित्य यांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचे संकेत यातून प्राप्त होत आहेत.

आदित्य ठाकरे आणि राऊत हे नुकतेच गोवा विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपवून मुंबईत परतले आहेत. त्या पार्श्वभूमीवर रविवारी पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी सांगितले की, आता लवकरच आदित्य उत्तर प्रदेशच्या मोहिमेवरही निघणार आहेत. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव सरकार स्थापन करतील असा दावा करतानाच शिवसेना आदित्य यांच्या नेतृत्वाखाली सर्व शक्तीनिशी येत्या लोकसभा निवडणुकीत उतरेल, अशी घोषणाही त्यांनी केली.

पक्षातील नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याची तयारी
- मानेवरील शस्त्रक्रियेनंतर उद्धव ठाकरे पूर्वीच्या जोमाने अद्यापही सक्रिय नाहीत.
- नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी आदित्य यांच्यावर जबाबदारी टाकण्याचे संकेत
- आदित्य यांच्याकडे धुरा देऊन पक्षनेतृत्वासाठी आतापासूनच तयारी
- पक्षात ज्येष्ठ व बुजुर्ग नेते असले तरीही शिवसैनिकांना सर्वमान्य होईल असा चेहरा नाही.

आदित्य यांची बगल : लोकसभा निवडणुकीच्या नेतृत्वाविषयी आदित्य यांना रविवारी नागपुरात विचारले असता त्यांनी थेट भाष्य करणे टाळले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि सेना नेते व शिवसैनिकांच्या सहकार्याने लोकसभेच्या निवडणुका लढवू,असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...