आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेना वर्धापन दिन:प्रत्येक वेळी निवडणुकीत तेच-तेच चेहरे, शिवसेनेत वाढतोय साचलेपणा, ‘द कझिन्स ठाकरे’ पुस्तकाचे लेखक धवल कुलकर्णी यांचे मत

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेना @ 54; गेल्या ५० वर्षांत शिवसेनेचे ‘काँग्रेसीकरण’ झाले - कुलकर्णी
  • सर्वोच्च नेता, राज्यात सर्वोच्च सत्तास्थानी असताना पहिलाच वर्धापन दिन

स्थापना : १९ जून १९६६

संस्थापक - शिवसेनाप्रमुख : बाळासाहेब ठाकरे

पक्षप्रमुख : उद्धव ठाकरे

विद्यमान बलाबल :

> लोकसभा : १८ खासदार, राज्यसभा - ३ सदस्य

>विधानसभा : ५६ आमदार, विधान परिषद - १५ सदस्य

शिवसेनेत संघटना म्हणून साचलेपण आले आहे. विधानसभा, विधान परिषदेसारख्या निवडणुकांमध्ये तेच-तेच चेहरे दिले जातात. गेल्या ५० वर्षांत शिवसेनेचे ‘काँग्रेसीकरण’ झाले आहे, असे निरीक्षण शिवसेनेचे अभ्यासक आणि ‘द कझिन्स ठाकरे’ या पुस्तकाचे लेखक धवल कुलकर्णी यांनी नोंदवले आहे. त्याचबरोबर गेल्या ५३ वर्षांत वर्धापनदिनी संघटनेचा सर्वोच्च नेता, राज्याच्या सर्वोच्च स्थानी विराजमान असण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी आपली कार्यशैली बदलण्याची गरज असल्याचे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

शिवसेना शुक्रवारी आपला ५४ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्यानिमित्त शिवसेनेवर बोलताना कुलकर्णी म्हणाले, ‘जेथे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत, तेथे राष्ट्रवादीची सत्ता चालते. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या कार्यकर्त्यांची कामे मार्गी लावण्यात पुढाकार घेतात. शिवसेनेच्या आमदारांना तसा पाठिंबा नाही. परिणामी शिवसेनेचे अनेक आमदार नाराज आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुका जवळ येतील तसा आघाडीतील वाद विकोपाला जाऊ शकताे.’

शिवसेना सोशल इंजिनिअरिंगमध्ये पिछाडीवर आहे. राजू शेट्टींसारखा मोहरा सेनेने स्वत:डे ठेवायला हवा होता. तुलनेत भाजपने गोपीचंद पडळकर, रमेश कराड यांना परिषदेवर घेऊन बाजी मारली. शिवसेनेत साचलेपण आहे. विधान परिषद, विधानसभा, जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी तेच-तेच चेहरे दिले जातात. ५० वर्षांत शिवसेनेचे काँग्रेसीकरण झाले आहे, असा त्यांचा दावा आहे.

मराठी काॅस्मो युवकांना जोडण्याचे आदित्य ठाकरे यांचे प्रयत्न आहेत. पण पक्ष व संघटनेत युवकांना विशेष वाव नाही. त्यामुळेच मनसेला पाठिंबा मिळतो. मुंबई, ठाणे परिसरात मराठी टक्का घसरतो आहे. म्हणून शिवसेनेने सामाजिक पाया विस्तारण्याची गरज आहे.

पुरोगामी पक्षांबरोबर हिंदुत्ववादी शिवसेनेचा संसार कसा, हा प्रश्न निरर्थक आहे. मराठी माणसांचा कैवार अन् कम्युनिस्ट विरोध यावरच तर शिवसेना वाढली. हिंदुत्व अन् शिवसेनेचा संबध नाही. आघाड्या करण्यातही सेनेचा हात कुणी धरणार नाही. प्रजा समाजवादी, रिपाइं, मुस्लिम लीग, सिंडिकेट काँग्रेस, इंदिरा काँग्रेस, शरद पवार, जाॅर्ज फर्नांडिस आणि शेवटी भाजप अशा भिन्नभिन्न विचारसरणींबरोबर शिवसेनेने आजपर्यंत संसार केल्याचा दाखला ते देतात.

आघाडीतील संघर्ष विकाेपाला जाणार :

सध्या महाराष्ट्र विकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांचे अनेक मतदारसंघांवर दावे-प्रतिदावे आहेत. तेथील आजी-माजी आमदारांत सध्या कुरबुरी असून विधानसभा निवडणुका जवळ येतील तसा आघाडीतील संघर्ष विकोपाला जाईल, असा अंदाजही कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

जनता शिवसेनेकडे चौकसपणे पाहतेय

शिवसेना प्रथम संघटना आहे, नंतर पक्ष आहे. कृती आणि कृती याच गोष्टींना सेनेत स्थान आहे. उद्धव यांचा पक्षसंघटनेत प्रवेश आंदोलनातून झाला नाही. साहजिकच उद्धव यांच्या नेतृत्वाचा बाज दरबारी आहे. त्याचे संघटनेवर परिणाम दिसतात. उद्धवनी आपली कार्यशैली बदलण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिवसेनेचा हा पहिला असा वर्धापन दिन आहे, संघटनेचा नेता राज्यातील सर्वोच्च सत्तास्थानी आहे. त्यामुळे शिवसेनेकडे जनता चौकसपणे बघत असल्याचे कुलकर्णी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...