आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अण्णा नक्की कोणाच्या बाजूने?:​​​​​​​राळेगणात बसून भाजप पुढाऱ्यांबरोबर सोंगटय़ा खेळण्यात आता हशील नाही, अण्णांनी उपोषण मागे घेतल्यानंतर शिवसेनेचे भाष्य

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अण्णा हजारे यांचे उपोषण शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी होते काय हे स्पष्ट झालेले नाही

जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी दिल्लीत कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाण मांडून बसले आहेत. प्रजासत्ताक दिनापासून दिल्लीतील परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. आंदोलन स्थळावर प्रचंड गदारोळ झाला. यासोबतच शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारही केला आहे. दरम्यान कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची इशारा दिला होता. मात्र, शुक्रवारी त्यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. अण्णांच्या या भूमिकेवर अनेकांनी शंका उपस्थित केली होती. आता शिवसेनेनेही अण्णा हजारे यांना काही सवाल केले आहेत.

'अण्णा यांनी उघडपणे भूमिका घेण्याची गरज आहे. 90-95 वर्षांचे शेतकरी गाझियाबादच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. अशा वयोवृद्ध शेतकऱयांना नैतिक बळ देण्यासाठी आता अण्णांनी उभे राहायला हवे. राळेगणात बसून भाजप पुढाऱ्यांबरोबर सोंगटय़ा खेळण्यात आता हशील नाही. प्रसंग युद्धाचाच आहे व अशा युद्धाचा अनुभव अण्णांनी यापूर्वी घेतला आहे. युद्ध आता गावातून व मंदिरातून होणार नाही. मैदानात उतरावे लागेल.' असा सल्ला शिवसेनेने अण्णांना दिला आहे.

'लोकशाही, शेतकऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांचा स्वाभिमान याबाबत अण्णांना भूमिका घ्यावीच लागेल. राळेगणात बसून भाजपच्या नेत्यांसोबत प्रस्ताव आणि चर्चेच्या फेऱ्या करून काय उपयोग? अण्णांनी आधी उपोषण जाहीर केले आणि आता केंद्र सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून ते स्थगित केले. हे सगळे ठीक आहे, पण शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करणाऱ्या कृषी कायद्यांबाबत त्यांची भूमिका काय आहे? या कायद्यांविरोधात सिंघू बॉर्डरवर मरमिटण्यास तयार असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अण्णांचा पाठिंबा आहे का? अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या सर्व प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या!' असा सवालही शिवसेनेने सामना अग्रलेखातून उपस्थित केला आहे.

सामना अग्रलेखात नेमके काय?

  • भाजप नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे अण्णांचे समाधान झाले असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मूळ प्रश्न आहे तो सध्या शेतकऱयांच्या बाबतीत जे दमनचक्र सुरू आहे, कृषी कायद्यांची जी दहशत निर्माण झाली आहे त्याचा. यासंदर्भात एक निर्णायक भूमिका अण्णा घेत आहेत आणि त्यादृष्टीनेच उपोषण करीत आहेत असे एक चित्र निर्माण झाले होते. मात्र अण्णांनी उपोषण मागे घेतले आहे. त्यामुळे कृषी कायद्यांबाबत त्यांची नेमकी भूमिका काय हे तूर्त तरी अस्पष्टच आहे.
  • शेतकऱयांचा विषय राष्ट्रीय आहे. लाखो शेतकरी सिंघू बॉर्डरवर साठ दिवसांपासून सरकारशी संघर्ष करीत आहेत. सरकार आता त्यांचे आंदोलन चिरडायला निघाले आहे. गाझीपूर बॉर्डरवर सरकारने शेतकऱयांची कोंडी केली आहे. वीज, पाणी, अन्नधान्याची रसद कापली आहे. शेतकरी हे जणू आंतरराष्ट्रीय भगोडे आहेत, अमली पदार्थांचे आर्थिक गुन्हेगार आहेत असे ठरवून त्यांना ‘लुकआऊट’ नोटीस बजाविण्यात आली आहे.
  • अण्णा हजारे यांचे या घडामोडींवर नेमके काय मत आहे? मुळात अण्णा हजारे जे उपोषण करू इच्छित होते, त्यामागचा नेमका हेतू काय आहे? कृषी कायदे रद्द करावेत असे आंदोलक शेतकऱयांचे म्हणणे आहे. अण्णा हजारे यांचे उपोषण शेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी होते काय हे स्पष्ट झालेले नाही. अण्णांचे उपोषण त्यासाठी असते तर अण्णांना मोदी सरकारविरोधात उघड भूमिका घ्यावी लागली असती. राळेगणमध्ये जे भाजपचे पुढारी मनधरणी वगैरे करण्यासाठी आले त्यांना तसे स्पष्ट शब्दांत सांगावे लागले असते.
  • मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अण्णा दोन वेळा दिल्लीत आले व त्यांनी जंगी आंदोलन केले. या आंदोलनाच्या मशालींवर तेल ओतण्याचे काम तेव्हा भाजप करीत होता, पण गेल्या सात वर्षांत मोदी राज्यात नोटाबंदीपासून लॉक डाऊनपर्यंत अनेक निर्णयांमुळे जनता बेजार झाली, पण अण्णांनी कूसही बदलली नाही असा आरोप होत राहिला. म्हणजे आंदोलने फक्त काँग्रेस राजवटीतच करायची काय? बाकी आता रामराज्य अवतरले आहे काय?
  • अण्णा माजी सैनिक आहेत. देशाच्या बॉर्डरवर सैनिकांची स्थिती आज नक्की कशी आहे? चिनी सैन्याने हिंदुस्थानची जमीन बळकावली आहे. हा विषय अण्णांसारख्या समाजधुरिणांनी सरकारला जाब विचारावा असाच आहे, पण अण्णा आज एकाकी पडले आहेत. राजकीय पक्षांनी त्यांना वेळोवेळी वापरून घेतले. त्यात अण्णांच्या शरीराची प्रचंड झीज झाली. उपोषण करणे व ती पुढे रेटणे ही साधी गोष्ट नाही. पुन्हा अण्णांचे वय पाहता त्यांनी जिवाचा धोका पत्करू नये. मागच्या उपोषणाचे परिणाम अण्णांच्या शरीराच्या अनेक अंगांना भोगावे लागत आहेत. पण अण्णांनी एखादे आंदोलन छेडणे यास आजही महत्त्व आहेच. म्हणून तर भाजपच्या राज्यापासून दिल्लीपर्यंतच्या मंडळींची धावाधाव झाली.
  • देशातील शेतकरी कृषी कायद्याविरोधात उभा ठाकला आहे व त्यांना अण्णांचे पाठबळ मिळाले असते तर शेतकऱ्यांच्या हातातील दांडय़ास बळ मिळाले असते. सरकारने आधी कट रचला व प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर गोंधळ घडवून शेतकऱयांचे आंदोलन बदनाम केले. आता आंदोलनात पोलीस घुसवून दहशत निर्माण केली जात आहे.