आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्येवरून ‘रामायण’:राम मंदिर मुद्द्यावरून ​​​​​​​शिवसेनेची टीका; भाजप कार्यकर्ते-शिवसैनिकांमध्ये उडाली धुमश्चक्री

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दादरमधील शिवसेना भवनासमोर लठ्ठालठ्ठी

अयोध्येतील रामजन्मभूमी ट्रस्टच्या जमीन खरेदीतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून बुधवारी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. शिवसेनेच्या टीकेमुळे संतापलेले भाजप कार्यकर्ते शिवसेना भवनावर मोर्चा घेऊन गेले. जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. भाजपचा ‘फटकार मोर्चा’ श्रद्धास्थान असलेल्या शिवसेना भवनावर येत असल्याचे समजताच शिवसैनिक संतप्त झाले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना रोखले. या वेळी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. दगडविटा घेऊन शिवसेना भवनाकडे निघालेल्या भाजप कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला.

रामजन्मभूमी जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. दोन कोटी रुपयांची जमीन आठ मिनिटांत १८ कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टवर होत आहे. त्यामुळे कामात पारदर्शकता असावी अशी शिवसेनेची भूमिका आहे. मात्र शिवसेनेच्या या भूमिकेला विरोध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली फटकार मोर्चा नेतृत्वाखाली शिवसेना भवनावर मोर्चा काढण्यात आला.

पोलिसांनी हा मोर्चा राजा बढे चौकाजवळ अडवला. या मोर्चात सहभागी झालेल्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांच्या हातात सोनिया सेना असे बॅनर्स होते. पोलिसांनी मोर्चा अडवला तरीही शिवसेना भवनापर्यंत मोर्चा नेण्याचा अट्टहास भाजपच्या कार्यकर्त्यांनी कायम ठेवला आणि रस्त्यातच ठिय्या मारला आणि भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा शिवसेना भवनावर येत असल्याचे समजताच शिवसैनिक संतप्त झाले. हा मोर्चा रोखण्यासाठी शिवसेना विभागाप्रमुख व आमदार सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भवनातून शिवसैनिक खाली उतरले. भाजयुमोच्या मोर्चामध्ये महिलाही सहभागी झाल्याचे समजताच शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिणीही रस्त्यावर उतरल्या.

काही काळासाठी शिवसैनिक व भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले तेव्हा घोषणाबाजी सुरू झाली. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीने प्रत्युत्तर दिले. कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. संपूर्ण परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती. शिवसैनिकांची संख्या वाढत होती. तेव्हा पोलिसांनी अधिकची कुमक मागवली.

दादरमधील शिवसेना भवनासमोर लठ्ठालठ्ठी
दादरच्या शिवसेना भवनासमोर शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री सुरू झाली तेव्हा पोलिसांनाही आवर घालणे मुश्कील झाले.

बातम्या आणखी आहेत...