आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभा निवडणूक:फडणवीस यांच्या बेरजेमुळे शिवसेनेची वजाबाकी; सरकारला पाठिंबा देणारे 5 अपक्ष भाजपबरोबर

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टीम देवेंद्रने छोट्या पक्षांचे 13 सदस्य वळवले

२४ वर्षांनंतर राज्यात पार पडलेल्या राज्यसभेच्या ६ जागांच्या अत्यंत चुरशीच्या मतदानात भाजपने बाजी मारत तिसरी जागा खेचून आणली तसेच मविआला खासकरून शिवसेनेला धोबीपछाड देत जाेरदार अस्मान दाखवले. उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय चातुर्य सिद्ध झाले तसेच शिवसेना ही बेरजेच्या सारीपाटात फार कच्ची असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

शुक्रवारी (१० जून) सकाळी ९ वाजता मतदान सुरू झाले. ४ वाजेपर्यंत सर्व २८५ पात्र आमदारांनी मतदान केले. मात्र दोन्ही बाजूंकडून तीन-तीन मतांवर आक्षेप घेतले गेल्याने मतमोजणी ८ तास विलंबाने म्हणजे मध्यरात्री १ वाजून ५० मिनिटांनी सुरू झाली. शनिवारी पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी लागलेल्या धक्कादायक निकालात भाजपचे ३ आणि मविआचे ३ उमेदवार विजयी झाले. मविआचे विधानसभेत पात्र संख्याबळ १४९ असून अपक्ष व छोट्या पक्षांची मिळून आघाडीला १६१ मते मिळाली, तर भाजपचे विधानसभेतील संख्याबळ १०६ असून छोट्या व अपक्षांची मिळून १२३ मते पडली.

यामुळे भाजपची काठावरची तिसरी जागा निवडून आली. शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निकालाने शिवसेनेचे संसदीय राजकारणातील कच्चे दुवे पुन्हा स्पष्ट झाले. शिवसेनेकडून नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अपक्षांच्या जुळवाजुळवीची जबाबदारी होती, तर परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर मतदानाच्या रणनीतीची जबाबदारी होती. या दोन्ही नेत्यांना पक्षनेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवण्यात अपयश आले. पक्षनेतृत्व या नात्याने संसदीय डावपेचांत उद्धव ठाकरे कमालीचे अडाणी असल्याचे या निकालाने सिद्ध झाले.

भाजपची सारी धुरा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळली. अपक्षांनची जुळवाजुळव करण्याचे काम गिरीश महाजन, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी सांभाळले. अपक्ष व छोट्या पक्षांचे १७ उमेदवार गळाला लावण्यात फडणवीस यशस्वी झाले. शिवसेनेचा सर्व भर पहिल्या पसंतीची ४२ मते घेऊन दोन्ही संजयांना विजयी करण्यावर होता. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी निष्क्रिय राहिली. त्याचा फटका शिवसेनेला बसला.

फडणवीसांनी अपक्षांना जवळ केले : शरद पवार

राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मते फुटली नाहीत. मात्र, विरोधकांना मिळालेली अतिरिक्त मते कुठून आली याची कल्पना असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी झाली असून त्यांनी निकाल लांबवून रडीचा डाव खेळला असल्याचाही आरोप केला.

पवार म्हणाले, सहावी जागा धनंजय महाडिक यांच्या रूपाने भाजपने जिंकली, हे पाहून धक्का बसला नाही. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस यांच्या कोट्यातील कोणतीही मते फुटलेली नाहीत. प्रफुल्ल पटेल यांना एक मत जादा पडले. मात्र, ते आघाडीतून पडले नसून दुसऱ्या बाजूने पडलेले आहे. आमच्याकडे पुरेसे बहुमत सातव्या जागेसाठी नव्हते. तसेच ते भाजपकडेही नव्हते. मात्र, अपक्षांची भूमिका यात निर्णायक होती. अपक्ष प्रामुख्याने भाजपकडे झुकलेले होते. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गांनी माणसे आपलीशी करण्याचा डाव यशस्वी करता आला.

तिन्ही पक्षांत योग्य समन्वय : सरकार चालवताना कोणत्याही प्रकारे बहुमताला धक्का बसलेला नाही. तिन्ही पक्षांमध्ये योग्य प्रकारे समन्वय होता. निवडणुकीच्या राजकारणात २-४ मते कमी-जास्त होतात. मी फारसे या निवडणुकीत लक्ष घातले नाही. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या मतात फरक पडलेला नाही. मात्र, अपक्ष मतांमध्ये घोळ झाला आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

अमिताभ बच्चन एकच असतो; सुप्रियांचा विरोधकांना टोला
राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिसऱ्या उमेदवाराने निवडून येण्यासाठी आवश्यक कोटा नसतानाही विजय मिळवला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, निवडणुकांत काही वेळा जिंकणे असते तर काही वेळा हरणे असते. ज्या वेळेस एखादा उमेदवार विजयी होतो त्या वेळेस तोच फॉर्म्युला योग्य असे सर्वांना वाटते आणि जेव्हा अपयश येते, त्या वेळेस लोकांना यांचे काहीतरी नियोजन चुकले असे वाटते. मात्र, अमिताभ बच्चनचे चित्रपटही कधी-कधी अपयशी ठरतात. मात्र, त्यानंतरही अमिताभ बच्चन हा बच्चनच असतो, असा टोला त्यांनी लगावला आहे.

“ये तो बस झांकी है, पुणे पालिका बाकी है : पाटील
राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय झाला. यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. त्यामुळे “ये तो बस झांकी है, पुणे महापालिका बाकी है!’ चा नारा भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिला. भाजप कोथरूड मंडलच्या वतीने विजयी जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाटील म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार कोल्हापूरचे पैलवान धनंजय महाडिक यांनी जो डाव टाकला, त्यामुळे संजय राऊतांनाही चीतपट व्हावे लागले. “ये तो बस झाकी है, पुणे महापालिका बाकी है!’ हे आपल्याला दाखवायचे असल्याचे ते म्हणाले.

मुंबईत जल्लोष
मुंबईतील भाजप कार्यालयात विजयाचे जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज असल्याचे सांगत आमच्या काळात सुरू झालेले सर्व प्रकल्प थांबवून महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केल्याचा आरोप त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.

बातम्या आणखी आहेत...