आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधान परिषदेतील ठाकरे गटाचे आमदार नरेंद्र दराडे यांची विधान परिषदेत बुधवारी (२१ डिसेंबर) मोठी तारांबळ उडाली. तालिका सभापती म्हणून प्रश्नोत्तराचा तास चालवताना दराडे यांना दोन्ही बाजूंकडून बोलणी खावी लागली. नवख्या सदस्यास तालिका सभापती नेमल्याने ठाकरे गटाचे आज सभागृहात हसे झाले.
विधान परिषदेला सध्या सभापती नाहीत. उपसभापती नीलम गोऱ्हे सभागृहाचे मुख्य कामकाज चालवतात. आज प्रश्नोत्तराच्या तासाला शेवटच्या दहा मिनिटांत ठाकरे गटाचे नरेंद्र दराडे यांच्याकडे सभागृहाची कमान सोपवली गेली. शेवटचा प्रश्न चालू होता. सेनेच्या अनिल परब यांच्या प्रश्नााला उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई उत्तर देत होते. वेळ संपताच प्रश्नोत्तराचा तास संपल्याचे दराडे यांनी जाहीर केले. मात्र परब यांनी मंत्र्यांच्या उत्तराने आपले समाधान झाले नसल्याचे सांगितले. अनिल परब ठरले दराडेंचे स्वपक्षीय. त्यामुळे दराडे पेचात पडले. त्यांनी मंत्री महोदयांना हुकूम सोडला, सदस्याचे समाधान होईपर्यंत उत्तर द्या. काही सदस्य म्हणाले, प्रश्नोत्तराचा तास तर संपला आहे. मंत्री देसाई उभे राहिले अन् कुत्सितपणे म्हणाले, सभापती महोदय, तुम्ही तास संपला म्हटले म्हणून बसलो. आता म्हणता सदस्याचे समाधान होईस्तोवर उत्तर द्या. आता कसे उत्तर द्यायचे, याचे मला कृपया मला मार्गदर्शन करा. यावर सभागृहात एकच हशा पिकला.
दराडेंना अनुभव नाही, पहिलीच टर्म दराडे यांची ही पहिली टर्म आहे. ते जेव्हा पहिल्यांदा सभागृहात आले तेव्हा ते सभापती आणि सदस्य यांना क्राॅस झाले होते. तेव्हा उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांना झापले होते. दराडे नाशिक जिल्ह्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आमदार झाले आहेत. तालिका सभापती शक्यतो अनुभवी म्हणजे दोन तीन टर्म काम केलेल्या सदस्यांना केले जाते. पण या सभागृहात ठाकरे गटाचे केवळ ८ आमदार आहेत. अनिल परब सोडले तर सर्वांची पहिली टर्म आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.