आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:भाजपकडून येत्या लोकसभेला शिवसेनाच लक्ष्य; नियोजन सुरू, शिवसेनेचे दहा गड जिंकून घेण्याची भाजपची रणनीती

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाने गुरुवारी (१६ जून) २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी ‘मिशन ४५’ हाती घेतले. शिवसेनेचे १० लोकसभा मतदारसंघ खेचून घेण्याचे भाजपने नियोजन केले असून आगामी लोकसभेला शिवसेनाच लक्ष्य असल्याचे संकेत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होती. राज्यात भाजपने २३, तर शिवसेनेने १८ जागा लोकसभा जिंकल्या होत्या. २०२४ मध्ये राज्यात ४५ जागा जिंकण्याचे भाजपचे नियोजन आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विरोधकांचे १६ मतदारसंघ निवडले आहेत. पैकी १० मतदारसंघ एकट्या शिवसेनेचे आहेत. लोकसभा निवडणूक २०२४ साठीच्या तयारीसाठी आज राज्य भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक प्रदेश कार्यालयात पार पडली. बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी नेते उपस्थित होते.

भाजपच्या मिशन ४५ चे केंद्रातून विनोद तावडे, तर राज्यात चंद्रशेखर बावनकुळे समन्वय ठेवणार आहेत. निवडलेल्या १६ मतदारसंघांत मोदी सरकारच्या ८ वर्षांतील लोककल्याणकारी योजना पोहोचवल्या जाणार आहेत. तसेच या १६ मतदारसंघांत केंद्रीय मंत्र्यांचे दौरेही आयोजित केले जाणार आहेत. २०१९ च्या लोकसभेला आम्ही २०१७ मध्ये प्रारंभ केला होता. आम्ही २०२४ च्या लोकसभेची आता तयारी सुरू करत आहोत. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ महिन्यांपूर्वी तयारीला प्रारंभ केला आहे, असे भाजपतील सूत्रांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. त्याची रंगीत तालीम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत दिसेल.

आठ जागांवर जोर : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी मिशन-४५ हाती घेतले आहे. नव्याने ज्या १६ जागा जिंकायच्या आहेत, त्यावर अधिक लक्ष देणार आहोत. तसेच प्रदेशने विरोधकांच्या आठ मतदारसंघात जोर देण्याचे ठरवले आहे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

भाजपने २०२४ च्या लोकसभेचे मिशन-४५, आखले नियोजन

जबाबदारी दिलेले शिलेदार
बुलडाणा - अनिल बोंडे, हिंगोली - राणा जगजितसिंग, पालघर - नरेंद्र पवार, कल्याण - संजय केळकर, दक्षिण मध्य मुंबई - प्रसाद लाड, दक्षिण मुंबई - संजय उपाध्याय, शिर्डी - राहुल आहेर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग - आशिष शेलार, कोल्हापूर - सुरेश हळवणकर, हातकणंगले - गोपीचंद पडळकर. औरंगाबाद - प्रशांत बंब
शिवसेना : बुलडाणा, हिंगोली, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले.
राष्ट्रवादी : बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा. काँग्रेस : चंद्रपूर.
एमआयएम : औरंगाबाद.
भाजपचे या मतदारसंघांवर लक्ष; औरंगाबादचा समावेश
अंधेरीत मुरजी पटेल उमेदवार
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदाराच्या निधनाने येथे लवकरच पोटनिवडणूक लागणार आहे. तेथे भाजपचे स्थानिक नगरसेवक मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली जाणार आहे. या मतदारसंघाची जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...