आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ५० जागा लढवण्याची मागणी बिहारमधील शिवसेना नेत्यांनी पक्षनेतृत्वाकडे केली आहे. परंतु अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणामुळे शिवसेनेची बिहारमध्ये चांगलीच कोंडी झाली असून शिवसेना नेतृत्व बिहारमध्ये या वेळी निवडणुका लढवण्यास इच्छुक नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) शिवसेना दोन दशके सामील होती, तरी उत्तरेतील निवडणुका स्वतंत्रपणे लढत होती. बिहारच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा नुकतीच झाली आहे. बिहारचे शिवसेना नेते हौसलेंद्र शर्मा मुंबईत दोन दिवसांपासून तळ ठाेकून आहेत. किमान ५० जागा लढवण्यास पक्षाने संमती द्यावी, अशी शर्मा यांची मागणी आहे.
शिवसेना बिहारमध्ये इतर राज्यातील पक्ष म्हणून गणला जातो. सेनेला बिहारमध्ये धनुष्यबाण चिन्ह नाही. कारण झारखंड मुक्ती मोर्चाने तिथे धनुष्यबाण पूर्वीच निवडणूक चिन्ह मिळवलेले आहे.त्यामुळे सेनेला प्रत्येकवेळी वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागते आहे. मुळात बिहारमध्ये या वेळी राष्ट्रीय जनता दलाचे लालू यादव हे नितीशकुमारांसोबत नाहीत. तसेच नितीशकुमार यांच्या उमेदवारांसमोर लोकजनशक्तीच्या चिराग पासवान यांना भाजपने फूस दिलेली आहे. त्यामुळे पासवान हे भाजपचा मित्र पक्ष असलेल्या युनायटेड जनता दलासमोर आव्हान उभे करणार आहेत. शिवसेनेच्या उमेदवारांमुळे हिंदू मतांत विभागणी होईल, अशी तिथे भाजपला जराही भीती नाही. बिहारमध्ये निवडणुका लढण्याबाबत अजून शिवसेना नेतृत्वाने निर्णय घेतलेला नाही आणि उद्धव ठाकरे या वेळी न लढण्याचा निर्णय घेतील, असे सेनेतील सूत्रांचे म्हणणे आहे.
फडणवीस-राऊत चर्चेत बिहारचा मुद्दा
बिहारचे भाजप प्रभारी म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या हाती निवडणुकीची सूत्रे आहेत. अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण बिहार विधानसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा असणार आहे. त्यामुळे प्रचारात शिवसेनेला टार्गेट केले जाऊ शकते. मध्यंतरी शिवसेना खासदार संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाली होती. तीत बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात दोघांत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
२०१५ मध्ये सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
शिवसेनेच्या मतांची टक्केवारी ०.५५ टक्के होती. सर्व ७३ उमेदवारांची अनामत जप्त झाली होती.
> २०१५ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ४१ उमेदवार दिले होते व ०.४९% मते मिळवली होती.
> २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ७३ उमेदवार दिले होते. त्यांना २ लाख ११ हजार मते मिळाली होती.
> २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने बिहारमध्ये १४ उमेदवार उभे केले होते. त्यांना ६४ हजार मते मिळाली.
यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा व्हर्च्युअल
मुंबई | शिवसेनेचा यंदाचा पारंपरिक दसरा मेळावा व्हर्च्युअल पद्धतीने होण्याची शक्यता आहे. मुंबईतील वाढत्या कोरोना संसर्गामुळे दादरच्या शिवाजी पार्कवरची जाहीर सभा घेण्याची शिवसेनेची ५३ वर्षांची परंपरा यंदा खंडित होणार आहे.शिवसेनेची स्थापना सन १९६६ मध्ये झाली तेव्हापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रत्येक दसऱ्याला भव्य जाहीर सभा घेत आले. उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख या नात्याने धुरा सांभाळल्यानंतर ते दसरा मेळाव्याला मार्गदर्शन करतात. मात्र, ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यात राजकीय कार्यक्रमांवर निर्बंध आहेत. त्यामुळे ओघानेच शिवसेनेला दसरा मेळावा घेता येणार नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.