आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअयोध्येत महाराष्ट्र भवनाची जागा देण्याचे मान्य करून योगी महाराजांनी मुंबईतून 5 लाख कोटी नेले. म्हणजे महाराष्ट्राच्या हाती आवळा देऊन कोहळा काढण्याचाच हा प्रकार. पण सत्तेवर दुर्बळ, लाचार, बधिर सरकार असल्यावर दुसरे काय व्हायचे? मुख्यमंत्र्यांना फक्त चाळीस आमदारांच्या खोक्यांची काळजी. माणसाला त्याच्या लायकीपेक्षा वरचे पद मिळाले की हे असे घडायचेच. असे म्हणत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचण्यात आले आहे.
सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलय?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे स्वप्न घेऊन मुंबईत आले. मुंबई निवासी बडया उद्योगपतींना उत्तर प्रदेशात येण्याचे निमंत्रण दिले. योगींच्या मुंबई भेटीत मुकेश अंबानी, कुमार मंगलम बिर्ला अशा अनेक बडया उद्योगपतींच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या. पंतप्रधानांच्या पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईतील उद्योगपतींनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
आपले मुख्यमंत्री कुठे होते?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुंबईत येऊन उद्योगपतींशी चर्चा करीत होते. येथील गुंतवणूकदारांना लखनौला येण्यासाठी निमंत्रित करीत होते, तेव्हा आपले मुख्यमंत्री नाशकातील पालापाचोळा कचरा गोळा करून ठाकऱ्यांची शिवसेना फोडण्याचा आव आणीत होते व त्या पालापाचोळयासमोर दंड ठोकून भाषण करीत होते.
दावोसला बर्फात खेळण्यासाठी जाणार
उत्तर प्रदेश-बिहारचे राज्यकर्ते मुंबईत येऊन येथील गुंतवणुकीची लूट करीत आहेत व मुख्यमंत्री शिवसेना पडण्याच्या कामात रमले आहेत. माणसाला त्याच्या लायकीपेक्षा वरचे पद ...मिळाले की हे असे घडायचेच. योगी मुंबईतून उत्तर प्रदेशात गुंतवणूक नेत आहेत व मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस व त्यांचे बिरहाड पुढील महिन्यात गुंतवणूक आणण्यासाठी जर्मनीतील दावोसला बर्फात खेळण्यासाठी, बर्फ उडवण्यासाठी चालले आहेत. योगींनी येथील उद्योगपतींना सांगितले, "उत्तर प्रदेशात तुम्ही आणि तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील याची हमी देतो.” महाराष्ट्र सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. महाराष्ट्रातून गेल्या पाच महिन्यांत वेदांत फॉक्सकॉन, ड्रग्ज पार्क, एअर बससारखे प्रकल्प बाहेर गेले.
गुजरातला पुढे नेण्याचे धोरण
सध्याच्या सरकारवर विश्वास नसल्यामुळेच हे झाले. योगी उत्तर प्रदेशातील सिनेसृष्टीच्या प्रकल्पावर जोर देत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशासमोर ठेवलेल्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी देशातील प्रमुख राज्यांत स्पर्धा लागली आहे, पण 'मॅचफिक्सिंग' करुन फक्त गुजरातलाच पुढे नेण्याचे धोरण दिसते.
रोड शो काढून राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोड शो काढून राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. तर गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अशा रोड शो ची गरज आहे का? या माध्यमातून भाजप मुंबईत शक्तीप्रदर्शन आणि राजकारण करू पाहत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. तर योगीजी तुम्हाला उद्या दिल्लीत झेप घ्यायची आहे, तेव्हाही इंधन लागेलच असा सल्ला देण्यात आला आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.