आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 फुटीरांचे कमळाबाईला टेन्शन:शिवसेनेने भाजपला पुन्हा डिवचले , ED सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेने भाजपला कमळाबाईची उपमा देत पुन्हा डिवचले आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये म्हटले आहे की, 40 फुटीरांसह 10 अपक्ष आमदारांनी मंत्रीपदासाठी तगादा लावल्याने भाजप अर्थात कमळाबाईचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे अडचणीत येऊन ‘ईडी’ सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याची दाट शक्यता आहे.

​​​​शिवसेनेने म्हटले आहे की, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वजनदार आणि मलईदार खाती मिळतील, अशी अपेक्षा शिंदे गटाच्या आमदारांना होती. मात्र मविआ सरकारमध्ये असलेल्या मंत्रीपदाचा त्याग करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ दिल्यावरही महत्त्वाचे खाते न मिळाल्याने शिंदे समर्थकांत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे ‘ईडी’ सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावरून धुसफूस सुरू झाली आहे.

विस्तार दिवाळीपर्यंत लांबणीवर?

राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास दीड महिन्याने 18 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मंत्रिमंडळाचा दुसऱया टप्प्यातील विस्तारासाठी गणेशोत्सवाचा मुहूर्त काढण्यात आला होता. मंत्रीपदासाठी सुरू असलेली रस्सीखेच पाहता मंत्रिमंडळ विस्तार दिवाळीपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यताही शिवसेनेने वर्तवली आहे.

चार बंडखोर फुटले तरी शिंदे गट अडचणीत

शिवसेनेने म्हटले आहे की, शिवसेनेशी गद्दारी करून 40 आमदार शिंदेंसोबत गेले आहेत आणि 10 अपक्ष आमदारही शिंदे-फडणवीस सरकारसोबत आहेत. मंत्रीपदे मिळाली नाहीत तर नाराज झालेले काही बंडखोर आमदार शिंदे गटातून फुटण्याची शक्यता आहे. या 40 आमदारांपैकी चार आमदार जरी बाहेर पडले तर शिंदे गट अडचणीत येऊ शकतो. कारण त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्रतेची कारवाई होऊ शकते.

फुटीरांना सांभाळण्याचे आवाहन

शिवसेनेने म्हटले आहे की, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यावर लगेचच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे गाजर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीची साथ सोडून आलेल्या फुटीर आमदारांना दाखवले होते. अधिवेशन संपून आठवडा झाला तरी विस्ताराबाबत कोणतीच हालचाल दिसत नसल्याने बंडखोर आमदारांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. बंडखोर आमदारांनी शिंदे गटाची साथ सोडल्यास पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत मुख्यमंत्री शिंदे अडचणीत येऊन ‘ईडी’ सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपपुढे फुटीर आमदारांना सांभाळण्याचे फार मोठे आव्हान येऊन ठेपले आहे.

शिंदे गटाला 6 ते 7 मंत्रिपदे मिळतील

शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या खातेवाटपावरून शिंदे गटाच्या वाटय़ाला आणखी सहा ते सात मंत्रीपदे येणार हे स्पष्ट झाले असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. त्यामुळे मविआतून फुटून बाहेर पडलेल्या सर्वांनाच मंत्रीपदे मिळणार नसल्याने बंडखोर आमदारांमधील अस्वस्थता वाढत आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे. मागील सरकारमध्ये अपक्ष बच्चू कडू व राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. पहिल्या टप्प्यातील विस्तारात बच्चू कडू यांना सामावून न घेतल्यामुळे त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मंत्रिमंडळ विस्तारात जास्तीत जास्त आणखी 23 आमदारांचा समावेश केला जाऊ शकतो. यापैकी शिंदे गटाच्या वाटय़ाला सहा ते सात मंत्रीपदे येण्याची शक्यता आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...