आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची भाजपवर बोचरी टीका:राहुल गांधींनी महागडा शर्ट घातला काय किंवा उघडे फिरले काय, फरक फडत नाही; तुम्ही मात्र उघडे पडताय

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते कश्मीर अशा ‘भारत जोडो’ यात्रेने भाजपची पोटदुखी वाढू लागली आहे. त्यामुळेच त्यांच्या शर्टांच्या किंमती बाहेर काढून अनावश्यक वाद निर्माण केले जात आहेत. मात्र, राहुल गांधींनी पाच हजाराचे टी शर्ट घातले काय किंवा ते उघडे फिरले काय, फरक पडत नाही, अशी टीका शिवसेनेने भाजपवर केली आहे. तसेच, राहुल गांधींवरील टीका भाजपलाच उघडे पाडीत आहे, असेही शिवसेनेने सुनावले आहे.

तोंडावाटे किडे सोडण्याचा प्रकार

शिवसेनेचे मुखपत्र सामनात आज म्हटले आहे की, राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते कश्मीर अशा भारत जोडो यात्रेने भाजपची पोटदुखी वाढू लागली आहे. डोकेदुखी नैसर्गिक आहे. राजकीय पोटदुखी ही एक प्रकारच्या विकृत मानसिकतेतून जन्मास येते. पोटात व डोक्यात वळवळणारे किडे तोंडातून म्हणजे शब्दांतून बाहेर पडतात. भाजप प्रवक्त्यांनी असे किडे तोंडावाटे सोडायला सुरुवात केली आहे.

भारत जोडोचे स्वागत व्हायला हवे

शिवसेनेने म्हटले आहे की, राहुल गांधी हे ‘भारत जोडो’ पदयात्रेत जे ‘टी शर्ट’ वापरत आहेत त्याची किंमत 41 हजार रुपये असल्याची माहिती भाजप प्रवक्त्यांनी जाहीर केली. या अशा वक्तव्यांनी काय साध्य होणार? राहुल गांधी व त्यांचा काँग्रेस पक्ष त्यांचे काम करीत आहे. ‘भारत जोडो’ ही एक चांगली संकल्पना आहे. हिंदुस्थानात कुठे काही मतभेद असतील, मने दुभंगली असतील, कुठे फुटीरतेची बिजे पसरली असतील तर त्यास जोडण्याची जिद्द घेऊन राहुल गांधी बाहेर पडले आहेत. देशभरात मैलोन् मैल ते चालणार आहेत. लोकांशी संवाद साधणार आहेत. याचे स्वागतच व्हायला हवे.

भाजपचे लोक गांधींप्रमाणे पंचा नेसतात का?

भारतीय जनता पक्षाने राहुल यांच्या ‘टी शर्ट’ची किंमत जाहीर केली. मग भारतीय जनता पक्षाचे लोक गांधीजींप्रमाणे फक्त पंचा नेसून उघडे फिरून राजकारण करतात काय?, असा खोचक सवाल शिवसेनेने केला आहे. शिवसेनेने म्हटले आहे की, मंत्रिमंडळात रोज चरख्यावर बसून सूत कताई करून त्याची वस्त्र शिवून हे लोक अंग झाकतात काय? की प्रखर हिंदुत्ववादी वगैरे असल्याने ऋषीमुनींप्रमाणे फक्त वल्कले नेसून मंत्रालयात अथवा पक्ष कार्यालयात जातात? आता राहुल गांधींच्या ‘टी शर्ट’ची किंमत जाहीर करताच जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदी यांचा दहा लाखांचा सूट व सव्वा लाखाचा चष्मा काढला. आणखी बरेच काही बाहेर निघेल.

बेरोजगारी, आर्थिक प्रश्नांवर भाजपचे मौन

शिवसेनेने म्हटले आहे की, देश आतापर्यंत सर्वात अधिक आर्थिक संकटात आहे. देशात मोठया प्रमाणात बेरोजगारी वाढत असून शेतकरी, मजूर आणि छोटे-मध्यम उद्योग अडचणीत आल्याची टीका राहुल गांधी करतात व ‘भारत जोडो’ यात्रा अशा भूमिका घेऊन पुढे सरकत आहे. राहुल गांधी यांनी मांडलेल्या राष्ट्रीय प्रश्नांवर खुलासा करायचे सोडून ते कोणते कपडे घालतात, काय खातात वगैरे पांचट विषय भाजपकडून समोर आणले जात आहेत. म्हणजेच राहुल यांनी विचारलेल्या प्रश्नांत ताकद आहे व भाजपवाल्यांची तोंडे बंद पडली आहेत.

आधी तुमच्या कमरेवरचे सुटेल

देशात वर्षभरात 10 हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे सरकारी संस्थांचे आकडे आहेत. राहुल किंवा ममता बॅनर्जी यांचे नाहीत. भाजपने यावर चर्चा करावी. इतरांच्या अंतर्वस्त्रास हात घालाल तर सगळय़ात आधी तुमच्या कमरेवरचे सुटेल, अशी घणाघाती टीका शिवसेनेने केली आहे. तसेच, लोकांत जागृती करण्याचे काम ही यात्रा करीत आहे व तेच भाजपच्या पोटदुखीचे कारण व आजार आहे. आज देशात स्वातंत्र्य राहिलेले नाही. घराणेशाही परवडली असे वाटावे इतका एकाधिकारशाही व हुकूमशाहीचा कहर सुरू आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...