आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गद्दारीचे दुसरे नाव खोकेवाले:शिवसेनेची बंडखोरांवर जळजळीत टीका, महाराष्ट्रावर कलंक लावल्याचा घणाघात

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गद्दारीचे दुसरे नाव खोकेवाले पडले आहे. महाराष्ट्राला हा कलंकच लागला आहे. जगाच्या पाठीवर 'बोको हराम' नावाची एक बदनाम संघटना आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात 'खोके हराम' नावाची संघटना उदयास आली आहे, अशी जळजळीत टीका शिवसेनेने बंडखोरांवर केली आहे.

बंडखोरांचे अस्तित्व टिकणार नाही

शिवसेनेने आपले मुखपत्र सामनातून पुन्हा बंडखोरांवर तोफ डागली आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी जाहीरपणे सांगितले की, ‘महाराष्ट्रातील खोक्यांचा फॉर्म्युला वापरून ‘आप’चे आमदार विकत घेण्याचा प्रकार सुरू झाला आहे.’ म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसलेल्या खोकेवाल्यांचा उद्धार झालाच. बिहारात राजद-जदयुचे नेते जाहीरपणे बोलत आहेत, ‘महाराष्ट्र में जो खोकेवाली राजनीती हुई, वो बिहार में फेल हो गयी!’ महाराष्ट्रात ‘खोके हराम’ नावाची संघटना उदयास आली आहे. हरामखोरी हाच त्यांचा धर्म आहे. ‘खोके हरामां’चे अस्तित्व फार काळ राहणार नाही, हे मात्र नक्की.

‘खोकेवाले’ ही उपाधी लागेल

शिवसेनेने म्हटले आहे की, अधिवेशनात विरोधकांनी मागणी करूनही सरकार ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाही. कारण येथे सर्व सत्ताभोगी असून जनहिताच्या बाबतीत त्यांच्या अकलेचाच दुष्काळ पडला आहे. हा अकलेचा दुष्काळ शेवटचे दोन दिवस सभागृहातून विधानसभेच्या पायऱ्यांवर आला. पण खोकेछाप शिंदे गटाचा खरा चेहरा उघड झाला. पूर्वी तालेवार लोकांना रावसाहेब, रावबहादूर वगैरे उपाध्या लावल्या जात. पण, शिंदे गटाच्या लोकांपुढे म्हणजे त्यांनी चोरलेले जे आमदार वगैरे मंडळी आहेत, त्यांच्या आडनावापुढे यापुढे वंशपरंपरेने ‘खोकेवाले’ ही उपाधी लागेल. ‘दिवार’ चित्रपटात अमिताभ बच्चन याच्या हातावर कोरले होते, ‘मेरा बाप चोर है!’ त्याच पद्धतीने या चोरांच्या पुढच्या पिढीच्या कपाळावर कोरले जाईल, ‘मेरा बाप, भाई, आजोबा खोकेवाला था! आणि त्याने महाराष्ट्राशी, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केली!’ हा शिक्का पुसता येणे कठीण आहे.

बंडखोरांमुळे महाराष्ट्र बदनाम

अग्रलेखात म्हटले आहे की, अधिवेशनात दोन दिवस शिंदे गटाचे आमदार सभागृह सोडून विधानसभेच्या पायऱ्यांवर बसले व आम्ही ‘खोकेवाले नाही. आम्हाला खोकेवाले म्हणू नका’ असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत राहिले. महाराष्ट्राची जेवढी बदनामी या खोके प्रकरणाने केली तेवढी आतापर्यंत कोणीच केली नसेल. शिंदे गटातील सर्व खोक्यांच्या नादी लागले. पण नाव महाराष्ट्राचे बदनाम झाले. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खोकेवाले आमदार पुन्हा विधानसभेच्या पायऱ्यांवर बसले. त्यांनी अंगावर चित्रविचित्र पोस्टर्सचे कपडे घालून होळीची सोंगं आणली. त्यांचे वर्तन आणि हावभाव अत्यंत विचित्र व उबग आणणारे होते. फक्त पाठीमागे शेपटी लावून माकडउडया मारायचेच काय ते बाकी होते. आपण आता सत्ताधारी बाकांवर आहोत व विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या ‘खोका’ पक्षाचे महनीय सदस्य आहोत. सत्ताधारी बाकांवर बसून आपणास लोकहिताची, राज्याच्या कल्याणाची कामे पुढे रेटायची आहेत हे खरे म्हणजे त्यांच्या लक्षात राहायला हवे. मात्र त्याचाच विसर या मंडळींना पडावा, हे त्यांच्या चारित्र्यास साजेसे आहे.

महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचे मातेरे

विधानसभेतील बंडखोरांच्या घोषणांवरून शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. शिवसेनेने म्हटले आहे की, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसलेल्या खोका आमदारांचे हे विचित्र चाळे मुख्यमंत्री स्वतः पाहत होते व त्यांनी या आमदारांना भल्याच्या चार गोष्टी सांगितल्या नाहीत. कारण आडातच नाही तेथे पोहोऱ्यात कोठून येणार? का आमदारांचा माकडखेळ पाहत आपले मुख्यमंत्री उभे राहिले. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. पावसाने राज्यात हाहाकार माजला आहे. दहीहंडीच्या खोकेवाले पुरस्कृत खेळाने अनेक गोविंदांचा मृत्यू झाला आहे, पण सत्ताधारी पक्षाचे ‘खोकेवाले गोविंदा’ विधानसभेच्या पायरीवर बसून हाणामारी करीत राहिले. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचे व स्वाभिमानाचे हे असे मातेरे झाले.

बातम्या आणखी आहेत...