आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना विरुद्ध भाजप:महागाई वाढवणाऱ्या केंद्र सरकारशी दोन हात करावे लागतील, शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर टीका

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुढीपाडव्यानिमित्त लिहिलेल्या अग्रलेखात शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. राज्यातील आणि देशातील कोरोनाचे सर्व निर्बंध आता संपले आहेत. केवळ मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हे दोन नियम पाळायचे आहेत. मात्र आता जनतेने जसे कोरोनाच्या राक्षसाला हरवले आहे. तसेच महागाईच्या राक्षसाला हरवण्यासाठी संघर्ष करणे गरजेचे आहे. असा टोला शिवसेनेच्या मुखपत्रातून लगावण्यात आला आहे.

सामना आग्रलेखात नेमके काय म्हटले आहे?

लागोपाठ दोन वर्षे गुढीपाडव्याचा सण कोरोनाच्या सावटाखाली गेल्यानंतर यंदाच्या हिंदू व मराठी नववर्षाची सुरुवात उत्तम झाली आहे. गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केली. कोरोनाचे संक्रमण आणि या प्राणघातक विषाणूची दहशत कमी झाल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध दूर केल्यामुळे महाराष्ट्राने व तमाम मराठी जनतेने तब्बल दोन वर्षांनंतर सुटकेचा मोकळा श्वास घेतला आहे.

गुढीपाडवा हे विजयाचे आणि नवनिर्मितीचे प्रतीक मानले जाते. जगभरात हाहाकार उडविणाऱ्या कोरोनासारख्या महामारीचा महाराष्ट्रातील जनतेने समर्थपणे मुकाबला केला आणि या भयंकर आपत्तीवर विजय मिळवला म्हणून यंदाच्या गुढीपाडव्याला नक्कीच विशेष महत्त्व आहे. भूतकाळात जे झाले, ते घडून गेले. कोरोनासारख्या संकटाने दोन वर्षांत सगळ्या जगाची घडी विस्कटून टाकली. अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले. असंख्य कुटुंबांतील कर्तेधर्ते कोरोनाने हिरावून नेले. प्रचंड मनुष्यहानी झाली आणि आर्थिक नुकसानीची तर मोजदादच नाही. मात्र, अखेर मनुष्य जिंकला आणि कोरोना पराभूत झाला. कोरोनाचे अरिष्ट हे मानवनिर्मित होते की नैसर्गिक याचा छडा लागायचा तेव्हा लागेल.

महाराष्ट्रातील आणि देशातील जनताही कोरोनाचा विनाश करून भयमुक्त आणि संकटमुक्त झाली आहे. त्यात आपत्ती व्यवस्थापन आणि साथ प्रतिबंधक कायद्याने कोरोना काळात जे निर्बंध लावण्यात आले होते, ते उठवून राज्यातील आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेला पाडवा भेटच दिली. जुने विसरून नवीन कार्याचा प्रारंभ करणारा दिवस म्हणून आपण गुढीपाडव्याकडे पाहतो. या दिवसापासूनच वसंत ऋतूचे आगमन होते. निसर्गचक्रानुसार शिशिरातील पानगळ संपून वृक्षवल्लींना नवी पालवी फुटू लागते. जीवसृष्टीत होणारा हा महत्त्वाचा बदल गुढीपाडव्याचे महत्त्व आहे.

अधोरेखित करण्यास पुरेसा महाराष्ट्र आणि देशातील जनतेने कोरोनाच्या विषाणूवर विजय मिळवून आयुष्याच्या नवीन वाटचालीचा श्रीगणेशा सुरू केला हे खरे असले तरी महागाईच्या सरकारनिर्मित विषाणूला तोंड कसे द्यायचे याचे मात्र कुठलेही उत्तर जनतेला सापडताना दिसत नाही. निवडणुकीपुरती स्वस्ताईची गुढी उभारून निवडणुका संपल्यावर महागाईची काठी उगारणाऱ्या केंद्रीय सरकारशी नवीन वर्षात जनतेला दोन हात करावे लागतील असे दिसते. कोरोनाचा राक्षस गाडून जनतेने एक युद्ध जिंकले आहे. आता जनतेला नवनिर्मितीबरोबरच महागाईला गाडण्यासाठी संघर्षाचीही गुढी उभारावीच लागेल.

बातम्या आणखी आहेत...