आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची भाजपवर रोखठोक टीका:तुमचा चेहरा उघडा पडला; अमित शहा आपण असेच बोलत राहा, मऱ्हाठा नक्की उठेल!

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमित शहा आपण असेच बोलत राहा, मऱ्हाठा नक्की उठेल, असा सल्ला शिवसेनेने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते.

त्यादरम्यान त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जामीन दाखवण्याची भाषा केल्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. “शिवसेनेला गाडण्याची व उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्याची भाषा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. आता मुंबईवर ताबा मिळवायचाच. आता नाही तर कधीच नाही, असेही ते म्हणाले. शिवसेना फोडली कशासाठी? त्या विषालाच यानिमित्ताने उकळी फुटली. भाजपमध्ये एखादा चिंतामणराव देशमुख निर्माण होणे नाही, पण शिंदे गटाने तर सुंताच करून घेतली! मात्र अमित शहा यांनी हे असे बोलत राहावे. मऱ्हाठा नक्की उठेल!”, असे म्हणत शिवसेनेने टीका केली आहे.

धडा शिकवावा लागेल

अमित शहा पाच सप्टेंबर रोजी मुंबईतल्या लालबाग राजाच्या दर्शनासाठी आले होते. त्यादरम्यान त्यांनी भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यात त्यांना संबोधित करताना ते म्हणाले होते की, उद्धव ठाकरे यांनी धोका दिला त्यांना आता धडा शिकवावा लागेल. मुंबई पालिका निवडणूकीत 150 पेक्षा जास्त जागा जिंकणाऱ्या विश्वास देखील शहांनी व्यक्त केला होता. त्यावर देखील शिवसेनेने समाचार घेतला आहे.

विषाला उकळी फुटली

"केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गणपती दर्शनासाठी मुंबईत आले व त्यांनी शिवसेना द्वेषाचे प्रदर्शन केले. ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतील कार्यकर्त्यांसमोर त्यांनी बंद दाराआड भाषण केले. ते सार्वजनिक झाले. विषाला उकळी फुटावी असे त्यांचे वक्तव्य आहे. मुख्य म्हणजे त्यांचे भाषण हे कृतघ्नतेचे टोक आहे. अशी टीका शिवसेनेने केली आहे.

भाजप चेहरा उघडा पडला

अमित शहा व भाजपचे ‘मिशन मुंबई’ काय आहे त्याचा भयंकर चेहरा उघडा पडला. अमित शहा व त्यांच्या लोकांनी अशा प्रकारची भाषणे पुनःपुन्हा करीत राहिली पाहिजेत. त्यातूनच जनमनाचा उद्रेक होईल. शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आणि राज ठाकरे यांना चुचकारून त्यांनी मुंबईवर नियंत्रण मिळविण्याचे ठरवले आहे, असे म्हणत भाजपवर शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

समान सत्तावाटपाचे काय?

पुढे शिवसेनेने म्हटले आहे की, अमित शहा म्हणतात, महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता. हा खुलासा त्यांनी अडीच वर्षांनंतर केला, पण समान सत्तावाटपाचे ठरलेच होते. तो शब्द कोणी फिरवला? अर्थात हातात ईडी, सीबीआय व इतर संस्था आहेत म्हणून सत्य बोलणाऱ्यांच्या बाबतीत ‘पटक देंगे’ची भाषा सहज वापरली जाते. ‘शिंदे गट म्हणजेच शिवसेना’ असे बोलण्यापर्यंत मजल जाते, परंतु नियती रोज नवनवे डाव खेळत असते व राजकारणाचे चक्र हे खाली-वर होतच असते.

आज पुन्हा महाराष्ट्राचे राजकारण अशा सीमेवर उभे आहे की, या राज्याच्या राजकारणामुळे देशाच्या राजकारणाला कलाटणी मिळू शकेल. शिंदे गट हा साबणाचा बुडबुडा आहे. शेवटी जेथे ठाकरे तिकडे शिवसेना हेच लोक मान्य करतील. आज सत्तापदे, मुख्यमंत्रिपद आहे म्हणून मुंगळे व माश्या गुळाभोवती आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे, दिल्लीच्या आक्रमणाविरुद्ध एकत्र येऊन लढण्याचे ‘मिशन’ राखले तर महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेत मोठा चमत्कार होईल. नितीश कुमार व यादवांनी उत्तरेचे राजकारण यशस्वी करावे, महाराष्ट्रात ठाकरे-पवारांनी लक्ष द्यावे. ते यशस्वी झाले तर बरेच साध्य होईल. भाजपचे ‘मिशन बारामती’चे प्रयोग अनेक वर्षांपासून चाललेच आहेत. ठाकरे-पवारांचे नेतृत्व राहूच नये यासाठी ही धडपड आहे. हा कृतघ्नपणाच आहे.

महाराष्ट्राविषयीचा द्वेष

अमित शहा हे वारंवार शिवसेनेच्या बाबतीत ही अशी भाषा वापरतात. हा त्यांच्या मनातील महाराष्ट्राविषयीचा द्वेष आहे. खरं तर त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांविषयी सदैव कृतज्ञ राहायला हवे. केंद्रातले ‘यूपीए’ सरकार मोदी व अमित शहांच्या मागे हात धुऊन लागले असताना मोदी व पवारांतील सुसंवादामुळेच अमित शहा यांना गोध्रा हत्याकांडातील एका प्रकरणात जामिनावर मुक्त होण्यास मदत झाली. हा गौप्यस्फोट नसून सत्य आहे.

आणखी एका प्रकरणात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ‘सरकार’ पद्धतीने भूमिका करून अमित शहा यांना त्या काळात मदत होईल अशी व्यवस्था केली. या दोन्ही प्रसंगांवर स्वतंत्र लिखाण संजय राऊतच करू शकतील. शरद पवार आणि उद्धव ठाकरे बोलू शकतील; पण त्याच ठाकरे-पवारांविरुद्ध टोकाचे मिशन आज अमित शहा व त्यांचे लोक चालवीत आहेत. राजकारणात व लोकशाहीत मतभेदांना जागा आहे.

भाजपाला इशारा

निवडणुकीच्या माध्यमांतून पराभव करणे व तसे बोलणे हे चुकीचे नाही, पण भाजपास शिवसेना फुटल्याबद्दल आनंदाचे भरते आले आहे. शिंदे गटास बेकायदेशीरपणे राजसिंहासनावर बसवून त्यांनी ईप्सित साध्य केले. त्यांचे हास्य विकट आहे. उद्धव ठाकरे व शिवसेनेस गाडण्याची भाषा महाराष्ट्रविरोधी आहे. बाळासाहेब ठाकरेंशी व त्यांच्या विचारांशी बेइमानी आहे.

अमित शहा मुंबईत येऊन अशा विषाची पेरणी करतात व भाजपमधील ‘मराठे’ त्यावर टाळ्या वाजवतात. भाजपमध्ये एखादा चिंतामणराव देशमुख निर्माण होण्याची शक्यता नाही. मात्र अमित शहांनी शिवसेना गाडण्याची व ठाकऱ्यांना धडा शिकविण्याची भाषा सतत करीत राहावे. त्यातूनच नव्या दमाचे वीर, योद्धे निर्माण होतील. स्वतःस शिंदे गट म्हणवून घेणाऱ्यांनी तर स्वाभिमानाची सुंताच करून घेतली आहे! ते निद्रिस्त आहेत. पण ‘मऱ्हाठा’ नक्की उठेल!, असा थेठ इशारा शिवसेनेने भाजपला दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...