आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा मेळावा:शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात फुंकणार महापालिका निवडणुकीचा बिगुल

मुंबई / अशाेक अडसूळ11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या शुक्रवारी (ता. १५) माटुंग्यातील सभागृहात होणाऱ्या दसरा मेळाव्यात मुंबई-ठाणे महापालिका निवडणुकीच्या तयारीचा बिगुल फुंकला जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मेळाव्यात विकासकामांचे सादरीकरण करणार आहेत. आश्चर्य म्हणजे यंदाच्या प्रत्यक्ष मेळाव्याला अडथळा ठरणाऱ्या कोरोना प्रतिबंधक नियमांत सरकारने नुकतेच बदलही करून घेतले आहेत. दसऱ्याला दादरच्या शिवाजी पार्कवर शिवसेनेचा जंगी मेळावा असतो. कोरोना निर्बंधामुळे गेल्या वर्षी तो आभासी पद्धतीने झाला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (२७ जिल्हा परिषद+ १० महानगरपालिका) अगदी चार महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. दसरा मेळाव्याला मुंबई, ठाणे शहरातील बहुतांश शिवसैनिक उपस्थिती लावत असतात. मोठ्या अर्थसंकल्पाच्या या दोन्ही महापालिका शिवसेना पक्षाच्या मुख्य कणा समजल्या जातात. दसरा मेळाव्यात आजपर्यंत कधीही सादरीकरण झालेले नाही.

यंदा प्रथमच सादरीकरण होत आहे. पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सादरीकरण करणार आहेत. त्यामध्ये गेल्या दोन वर्षांत राज्य सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती सादर केली जाणार आहे. राज्यात दसऱ्याला एकूण चार मेळावे होतात. पीआरपी पक्षाचा नागपूर येथील अशोका विजयादशमी मेळावा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूरचा विजयादशमी मेळावा, मुंडे परिवाराचा अहमदनगर जिल्ह्यातील भगवानगड मेळावा आणि शिवसेनेचा मुंबईतला दसरा मेळावा. दसरा मेळावा प्रशासनाच्या लेखी राजकीय कार्यक्रम गणला जात नसल्याचे एका सनदी अधिकाऱ्याने दिव्य मराठीला सांगितले.

ईडी, एनसीबी केंद्रावर काय बोलणार?
केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवर महाविकास आघाडीकडून सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. ईडी, सीबीआय, एनसीबी, आयकर आदी संस्थांच्या कारभारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्याच्या दसरा मेळाव्यात काय बोलतात याची उत्सुकता आहे. ८ आॅक्टोबर रोजी राज्य सरकारने २०० संख्येची अट रद्द केली. माटुंगा येथे षण्मुखानंद सभागृहात उद्याचा दसरा मेळावा होणार असून या सभागृहाची क्षमता २७०० आहे. ५० टक्के क्षमतेत उद्याचा दसरा मेळावा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...