आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेला डिवचणारे नेस्तनाबूत:अमित शहांच्या दौऱ्यावर अंबादास दानवेंची टीका, महाराष्ट्राच्या ठेचा-भाकरीची चव शहांना माहिती आहे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या 50-55 वर्षांत शिवसेनेला अनेकांनी डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र, या डिवचणाऱ्यांना नेस्तनाबूत करून महाराष्ट्रात शिवसेनेने भगवा झेंडा फडकवत ठेवला आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावर केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज 'मिशन मुंबई पालिके'चा शुभारंभ करणार आहेत. यावर अंबादास दानवे म्हणाले, भाजपचे मुंबईवरील प्रेम म्हणजे पुतणा-मावशीच्या प्रेमासारखे आहे. मुंबईचे महत्त्व कमी करून गुजरातचे महत्त्व वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अमित शहा यांना महाराष्ट्राच्या ठेचा-भाकरीची चव माहिती आहे. त्यामुळे अमित शहा यांचे आम्ही स्वागत करतो, असा टोला दानवेंनी लगावला.

मुंबईला कमकुवत करण्याचा प्रयत्न

अंबादास दानवे म्हणाले, भाजपकडे देशाची सत्ता असताना त्यांना मुंबई ताब्यात कशासाठी हवी, हे समजत नाही. मुंबईला सतत कमकुवत करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. त्यामुळेच मुंबईत प्रमुख व्यापारी केंद्र गुजरातला हलवली जात आहे. मुंबई-दिल्ली बुलेट ट्रेनऐवजी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू केली जात आहे. काही दिवसांपुर्वीच कर्नाटकच्या भाजप मंत्र्याने महाराष्ट्राचे मुंबई, विदर्भ व महाराष्ट्र असे तीन तुकडे करण्याची भाषा केली. भाजपचा खरा चेहरा त्यातून समोर आला.

बैठकांमधून काही होत नाही

आज अमित शहा यांच्या उपस्थित मुंबईत भाजप कोअर कमिटीची बैठक होत आहे. यावर दानवे म्हणाले, मुंबईवर बेगडी प्रेम दाखवत अशा बैठका घेतल्याने काही होत नाही. भाजपची ताकद अपुरी आहे. त्यांना स्वबळावर सत्ता मिळत नसल्यानेच आमचे 40 बंडखोर त्यांनी फोडले. ताकद अपुरी असल्यानेच ते मनसेच्या मागे लागले आहेत. मात्र, त्याचा काहीही परिणाम होणार नाही. मुंबईच नव्हे तर महाराष्ट्राची जनता शिवसेनेच्याच मागे उभे राहील.

राज ठाकरेंचा डुप्लीकेटपणा

अमित शहा आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. त्यावर अंबादास दानवे म्हणाले, याच राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत व्हिडिओ लावून भाजपची लक्तरे वेशीवर टांगली. उत्तर प्रदेशातील लोकांविषयीही त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. या भूमिकांचा विचार करता राज ठाकरे आता भाजपमध्ये गेल्यास ते किती डुप्लीकेटपणा करतात, हे सिद्ध होईल. राज ठाकरेंची भेट म्हणजे शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न आहे. मात्र, अशा डिवचणाऱ्यांना नेस्तनाबूत करून शिवसेनेने आपला झेंडा महाराष्ट्रात फडकवत ठेवला आहे.

बातम्या आणखी आहेत...