आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल परबांचे स्पष्टीकरण:राणा दाम्पत्याच्या राजद्रोहप्रकरणी कोर्टाचे केवळ निरीक्षण, तो निकाल नाही; आणखी सबळ पुरावे सादर करू

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याविरोधात लावलेले राजद्रोहाचे कलम चुकीचे आहे, असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला राजद्रोहप्रकरणी दाखल गुन्ह्यात दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. न्यायालयाचे निरीक्षण आणि जजमेंट यात फरक असतो. न्यायालयाने मागणी केल्यास राणा दाम्पत्याविरोधात कोर्टात सबळ पुरावे दाखल करू, असे अनिल परब यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले अनिल परब म्हणाले?
राणा दाम्पत्यावर दाखल राजद्रोहाच्या गुन्ह्याबाबत मुंबई सत्र न्यायालयाने केवळ निरीक्षण नोंदवले आहे. तो निकाल नाही. तरीदेखील न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवले आहे, त्याचा आम्ही व्यवस्थित अभ्यास करू. एखाद्या बाबतीत आम्हाला खुलासा करायचा असल्यास त्याबाबतही विचार करू, असे अनिल परब यांनी सांगितले आहे. तसेच, गरज पडल्यास कोर्टात काही पुरावे सादर करायचे असल्यास योग्यवेळी राज्य सरकारकडून पुरावेही सादर केले जातील, असे अनिल परब म्हणाले.

हनुमान चालिसा स्वत:च्या घरी म्हणावी!
राज्यात हनुमान चालिसा म्हणण्यासाठी बंदी नाही. राणा दाम्पत्यांनी आता हनुमान चालिसा आपल्या घरात, वाहनात, कार्यालयात म्हणावी. त्यांना कोणीही रोखणार नाही व आमचीही त्याबाबत काहीही तक्रार नाही. मात्र, त्यावरून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही अनिल परब यांनी दिला.

काय आहे मुंबई सत्र न्यायालयाचे निरीक्षण?
राणा दाम्पत्याविरोधात लावण्यात आलेले राजद्रोहाचे कलम चुकीचे आहे, असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच, यावरून मुंबई पोलिसांनाही न्यायालयाने फटकारले आहे. नवनीत राणा व रवी राणा यांच्यावर लावण्यात आलेला राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे राजद्रोहप्रकरणी राणा दाम्पत्याला दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. मात्र, अनिल परब यांनी असे काहीही होणार नसल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...