आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेकडून भाजपच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर:मनीषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे जुने फोटो केले ट्विट

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एआयएमआयए पक्षाने महाविकास आघाडीला आघाडी करण्याचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षांकडून ही शक्यता फेटाळली आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून मात्र महाविकास आघाडी आणि विशेषत: शिवसेनेवर जोरदार टीका होऊ लागली आहे. एमआयएमनं महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलं आहे, असे म्हणत शिवसेनेला लक्ष्य केले होते. यावर भाजपा नेत्यांना शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. मनीषा कायंदे यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना फोटो टि्वट करत काही प्रश्न विचारले आहेत.

मनीषा कायंदे यांनी टि्वट केलेल्या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस दर्गामध्ये चादर चढवताना दिसून येत आहेत. तर दुसऱ्या कोनशिलेचा फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, गोपाळ शेट्टी, किरीट सोमय्या यांच्या नावापुढं जनाब लिहिण्यात आलेले दिसून येत आहे.

मनीषा कायंदे यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे, की जनाब, देवेंद्र फडणवीस जी, तेव्हा तुम्ही #जनाब शब्दाबद्दल आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. चादर चढवतांना आपला स्वाभिमान वाकला/झुकला नाही का? आताच का या शब्दाबद्दल एवढा राग? अरे हो, 105 आमदार निवडूनही महाराष्ट्रात भाजप सत्तेत नाही, यामुळे तुमची अस्वस्थता आहे. नाही का?, असा खोचक सवाल मनीषा कायंदे यांनी विचारला आहे.

शिवसेनेच्या एमआयएमशी युतीवर स्पष्टीकरण -
शिवसेना एमआयएमशी युती करणार का असा प्रश्न विचारला जात असताना शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. मनिषा कायंदे यांनी स्पष्टीकरण देत शिवसना एमआयएमशी युती करणार नाही असं म्हटलं. राष्ट्रवादी हे पक्ष शिवसेनेचे सत्तेतील घटक पक्ष आहेत. किमान समान कार्यक्रमावर आमची सहमती आहे आणि त्याचप्रमाणे राज्यात कारभार सुरू आहे. आमचे तिघा पक्षांचे ठरले आहे, आता त्यात एमआयएमसारख्या पक्षाला आमच्यात स्थान नाही. मुळात एमआयएम हा भाजपची बी टीम म्हणूनच काम करत आला आहे आणि हे मुस्लिम जनतेलाही समजून चुकले आहे, असं त्या म्हणाल्या.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याची तयारी दर्शवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेला अनेक टोले लगावले होते. 'कुणी कुणासोबत युती करो आम्हाला काही फरक पडत नाही. जनता मोदीसोबत आहे. शिवसेनेने हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नाही तर जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारले आहे, राज्यात सध्या अजानची स्पर्धाही त्यांनी घेतलेली आहे. त्याचा परिणाम आहे का बघू. शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्र येतात ते पाहू', असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला होता.

बातम्या आणखी आहेत...