आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांना दिलासा नाहीच:पत्राचाळ घोटाळाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना आजही न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 31 जुलै रोजी ईडीने त्यांना अटक केली होती.

संजय राऊत यांची आज न्यायालयीन कोठडी संपत असल्याने त्यांना विशेष न्यायालयात (PMLA) हजर करण्यात आले. यावेळी ईडीने पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांची आणखी चौकशी करायची आहे. त्यामुळे त्यांची पुन्हा न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने ही विनंती मान्य केली.

35 दिवसांपासून तुरुंगात

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने 31 जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. सुरुवातीचे 8 दिवस ते ईडी कोठडीत व त्यानंतर न्यायालयीन कोठडीत आहेत. सुरुवातीला 8 दिवसांची ईडी कोठडी, त्यानंतर 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी, नंतर पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी व आजदेखील या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली. त्यामुळे जवळपास 35 दिवसांपासून संजय राऊत कोठडीत आहेत.

जामिनासाठी अर्ज नाही

आज संजय राऊत यांना न्यायालयात हजर केले तेव्हा त्यांच्या आई आणि पत्नीदेखील न्यायालयात हजर होत्या. राऊत यांचे काही समर्थकही न्यायालयात आले होते. सुनावणीदरम्यान, संजय राऊत यांनी अद्याप जामिनासाठी अर्ज केलेला नाही, अशी माहिती राऊत यांच्या वकिलांनी दिली. तर, ईडीतर्फे राऊतांच्या कोठडीत वाढ करावी, असा अर्ज सादर करण्यात आला. त्यामुळे न्यायालयाने ईडीच्या अर्जाला मान्यता दिली. दरम्यान, संजय राऊत यांनी जामिनासाठी अर्ज का केला नाही, यावर आश्चर्य व्यक्त होत आहे.

काय आहे पत्राचाळ प्रकरण?

गोरेगावमध्ये गुरुआशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते. कंपनीशी संबंधित प्रवीण राऊत यांनी या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थनगर भागातील या झोपडपट्टीचे काम न करताच परस्पर काही वर्षांपूर्वी येथील एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला. यात जवळपास 1 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. तसेच, प्रवीण राऊत यांनी 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात ट्रान्सफर केल्याचेही समोर आले आहे. या पैशांचा स्त्रोत काय, याचा शोधही ईडी घेत आहे. या संपूर्ण घोटाळ्यात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे ई़डीचे म्हण्णे आहे.

बातम्या आणखी आहेत...