आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारांना कोंडले म्हणणारे मूर्ख:संजय राऊतांचे प्रत्युत्तर - मतदानाची प्रक्रिया समजावण्यासाठी हॉटेलमध्ये ठेवल्याचा दावा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आमदारांना कोंडले म्हणणारे मूर्ख आहेत. मतदानाची प्रक्रिया समजावण्यासाठी त्यांना हॉटेलमध्ये ठेवले आहे, असा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपमध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता असल्याने शिवसेनेच्या आमदारांना मालाडमधील रिट्रीट हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवण्यात आले आहे. त्यावरून विरोधकांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांना आपल्या आमदारांवर विश्वास नाही का, असा सवाल विरोधकांनी केला. त्यावर आज राऊतांनी प्रत्युत्तर दिले.

त्यांनीही हॉटेलमध्ये ठेवले

संजय राऊत म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीची प्रक्रिया ही तांत्रिक असते. त्यासंदर्भात आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, त्यावरून शिवसेनेने आमदारांना कोंडले, असे म्हणणारे मूर्ख आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भाजपनेदेखील आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. त्यावर प्रश्नचिन्ह का उपस्थित केला जात नाही, असा सवालही त्यांनी केला.

सेनेच्या दोन्ही जागा निवडून येतील
राऊत म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आपल्या पक्षातील आमदारांवर पूर्ण विश्वास आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दोन्ही जागा निवडून येतील. तसेच, महाविकास आघाडीच्या चारही जागा निवडून येतील. राज्यसभेची निवडणूक 10 जूनरोजी होत आहे. त्यादिवशी रात्री 8 वाजता निकाल स्पष्ट होईल. त्यात मविआच्याच उमेदवारांना यश मिळाल्याचे दिसेल, असा दावा त्यांनी केला.

क्रॉस व्होटिंग होणार नाही

राऊत म्हणाले, राज्यसभा निवडणुकीसाठी आमदारांना गुप्त मतदान करता येत नाही. आपण कोणाला मतदान करतोय, हे दाखवूनच त्यांना मतदान करावे लागते. त्यामुळे या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होणार नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व आमदार मविआच्या उमेदवारांना जिंकून आणतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशाला प्रथमच माफी मागावी लागली

राऊत म्हणाले, मोहंमद पैगंबरांवर भाजप प्रवक्त्याने वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल यूएई, जॉर्डन आणि इंडोनेशियाने या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भाजप प्रवक्त्यांचे आपल्या भाषेवरील नियंत्रण सुटले आहे. मात्र, हे प्रकरण आता भाजपच्याच अंगलट आले आहे. यामुळे देशाला प्रथमच माफी मागावी लागली आहे. अशा राजकारणामुळे भाजपकडून देशाचे नुकसान होत असून जागतिक पातळीवरही देशाची प्रतिमा मलिन होत आहे, अशी टीका त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...