आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी राऊतांचा इशारा:म्हणाले - विरोधकांच्या पोटदुखीवर आजच्या सभेत योग्य उपचार होतील

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजच्या सभेत विरोधकांच्या पोटदुखीवर योग्य उपचार होतील, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. आज सकाळी ते माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांची आज मुंबईतील बेकेसीमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी शिवसेनेला व ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. त्यामुळे या सभेत उद्धव ठाकरे विरोधकांनी काय उत्तर देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

अर्थात हे राज्य, हा पक्ष हा पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच आणि बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेने चाललेला आहे. काही लोक हे राज्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक प्रश्न निर्माण केलेत, काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही जी पोटदुखी आहे, ही जी काही लोकांची जळजळ आहे. त्यावर मला असं वाटतं आजच्या सभेने योग्य उपचार केले जातील, असे म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली.

महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न -
संजय राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील, देशातील राजकीय वातावरण आणि या वातावरणावर आलेला एक मळभ, धुकं, गढूळपणा हे आजच्या सभेने खासकरून उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने पूर्णपणे दूर होईल आणि महाराष्ट्राचे आकाश निरभ्र होईल. फक्त इथे भगव्या रंगाचाच धनुष्य या आकाशात तुम्हाला दिसेल. महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना उद्धव ठाकरे करारा जबाव देतील.

बाळासाहेब ठाकरे हेच हिंदुहृदयसम्राट -
शिवसेना आणि गर्दी यांचे एक नाते आहे. आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही. लोक आपोआप जमतात. आजची सभा ही क्रांतीकारी सभा असेल, आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप अशी ही आजची सभा असणार आहे. या सभेतून सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील, असेही संजय राऊत यांनी म्हटले. तसेच बाळासाहेब ठाकरे हेच हिंदुहृदयसम्राट होते आणि यासंदर्भात प्रश्नच उपस्थित होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

शायरी ट्विट करत निशाणा -

यापूर्वी संजय राऊतांनी आज सकाळीच एक शायरी ट्वीट केली आहे. 'लगता है फिरसे उतरना पडेगा मैदान में दुबारा, कुछ लोग भूल गये है अंदाज हमारा!', अशी शायरी ट्विट करत अप्रत्यक्षरित्या विरोधकांवर निशाणा साधला आहे. तसंच, शायरीच्या शेवटी जय महाराष्ट्र असेही म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...