आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेचा आज 56 वा वर्धापन दिन आहे. अब तक 56 और भी आगे जाएंगे, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेचा 56 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. हा सोहळा पवईच्या एका हॉटेलच्या सभागृहात निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा झाला.
संजय राऊत म्हणाले की, 56 वर्षांपूर्वी शिवसेनेच्या स्थापनेवेळी बाळासाहेबांवर प्रांतीयवादी शिक्का मारण्यात आला. पण बाळासाहेबांनी प्रादेशिक पक्षांची जी मुहूर्तमेढ रोवली, त्यानंतर देशभरात प्रादेशिक पक्ष निर्माण झाले. प्रादेशिक पक्षांच्या करंगळीवरच देशाचे राजकारण उभे आहे. एक प्रादेशिक पक्ष काय करु शकतो हे शिवसेनेने दाखवून दिले. शिवसेना आज दिल्लीच्या तख्तापर्यंत राजकारण करत आहे.
काँग्रेसच्या उमेदवाराला मत देण्यास शिवसेना आमदारांचा विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबद्दल संजय राऊत म्हणाले की, आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या संपर्कात असून भाजपाकडून अफवा पसरवल्या जात आहे. भाजप निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक या अफवा पसरवत आहे. अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडीतील नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. कोणी कोणाला मतदान करायचे, यासंदर्भातही निर्णय झाले आहेत.
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्वीट करण्यात आले आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, 56 वर्षे जनसेवेची, प्रखर हिंदुत्वाच्या तेजाने, तळपत्या शिवसेनेची. पक्षनिष्ठा आणि आपुलकीने पक्षाला भक्कम करणाऱ्या तमाम निष्ठावंत शिवसैनिकांना 56 व्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. याशिवाय, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील शिवसेना वर्धापन दिनानिमित्त ट्वीट करत सर्व शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेना 56 वर्षाचा झंझावात असे ते म्हणाले.
वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचा टीझर
शिवसेनेने टीझर प्रदर्शित केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जुन्या भाषणातील, 'भगवा फडकवण्यासाठी सज्ज असलेल्या शिवसैनिकांना मानाचा मुजरा,' या वाक्याने टीझरची सुरुवात आहे. शिवसेनेचे हिंदुत्व साफ है, रघुकुल रीति सदा चली आई प्राण जाय पर वचन ना जाय. हृदयात राम आणि हाताला काम असे आमचं हिंदूत्व आहे,' असेही या टीझमरध्ये म्हणण्यात आलं आहे.
पक्षांकडून खबरदारी
सोमवारी विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे सहा उमेदवार तर भाजपचे पाच उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. आमदारांचा घोडेबाजार होऊ नये यासाठी सर्व पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे. राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर पराभव झाल्यानंतर आता महाविकास आघाडीनं विधान परिषद निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. मतांची फोडाफोड टाळण्यासाठी सारेच पक्ष दक्ष आहेत. शिवसेनेचे आमदार पवईतील वेस्ट इन हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. तर राष्ट्रवादीचे आमदार ट्रायडंटमध्ये थांबले आहेत. काँग्रेसने आपल्या आमदारांचा मुक्काम फोर सीझन्समध्ये ठेवला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.