आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना आमदाराचा लेटरबॉम्ब:तुटण्याआधीच भाजपशी जुळवून घ्या; आ. सरनाईकांचे उद्धव ठाकरेंना पत्र; राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडतोय शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्रास नेमका आहे तरी कोणता? : संजय राऊत

ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपशी जुळवून घेण्यासाठी पत्रातून साकडे घातले आहे. सरनाईक यांच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात सत्तांतराची चर्चा सुरू झाली आहे, तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरनाईक यांच्या पत्रातील मुद्द्यावर बोट ठेवत केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला आहे.

राज्यात युती तुटली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा तसाच आहे. ते पूर्ण तुटण्याआधी जुळवून घेतलेले बरे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेतल्यास त्याचा फायदा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला भविष्यात होईल, असे सरनाईक पत्रात म्हणतात. गेल्या काही महिन्यांपासून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीचा ससेमिरा सरनाईक यांच्या मागे लागला आहे हे येथे उल्लेखनीय होय. सरनाईक यांचे ९ जून रोजीचे हे पत्र रविवारी सोशल मीडियातून व्हायरल झाले.

महाविकास आघाडी ५ वर्षांसाठीच
राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी कायमस्वरूपी नाही. तिन्ही पक्ष यापूर्वीही स्वबळावरच लढलेले आहेत. राज्यात सध्या असलेली ही आघाडी केवळ ५ वर्षांसाठीच आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी म्हटले, तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सरनाईकांच्या भूमिकेचे स्वागत केले.

नाहक त्रास
भाजपशी जुळवून घेतले तर निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर यांचा व त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल, अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना असल्याचे प्रताप सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.

त्रास नेमका आहे तरी कोणता? : संजय राऊत
आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे, असे पत्रात नमूद आहे. हा गंभीर आरोप आहे. आता या राजकारणात कोण कुणाला विनाकारण त्रास देत आहे? तो त्रास नेमका आहे कोणता? याचा शोध घेणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

...तर सेना-राष्ट्रवादी एकत्र लढेल : जयंत पाटील
आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. काँग्रेस स्वबळाचे बोलत असली तरी आम्ही सर्व एकत्र लढू असे वाटते. काँग्रेसने स्वबळाचा नारा धरला तर सेना व राष्ट्रवादी एकत्र निवडणुकांना सामोरे जातील, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितले.

आम्ही हेच घसा फोडून सांगत होतो : चंद्रकांत पाटील
सरनाईक सांगतात तेच आम्ही घसा फोडून सांगत होतो. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सेनेने जाऊ नये हेच आमचे म्हणणे होते, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. सरनाईक सेनेचे आमदार आहेत. उद्धवजींनी विचार केला तर आमचे नेतेही विचार करतील, असे पाटील म्हणाले.

चौकशीची धास्ती
महाविकास आघाडीतील काही मंत्री आणि काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षाशी आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करत असल्याचा सरनाईकांचा आरोप.

फोडाफोडीची धास्ती
शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणार हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना दिलेले वचन पूर्ण झाले आहे. सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी आपलेच कार्यकर्ते फोडत असतील तर पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे.
पत्रात असे मुद्दे अन् त्याची अशी कारणे

कोण आहेत प्रताप सरनाईक?
प्रताप सरनाईक यांचा ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक म्हणून दबदबा आहे. २००८ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला. २००९, २०१४, २०१९ असे तीन वेळा ते ओवळा-माजिवडा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. भाजपचे विदर्भातील नेते रणजित पाटील यांचे ते व्याही आहेत.

बातम्या आणखी आहेत...