आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाविकास आघाडी सरकारचा मेळ आपल्या चातुर्याने जमवून आणणारे शिवसेनेचे संकटमोचक व खासदार संजय राऊत यांचे पक्षनेतृत्वाने पंख छाटले आहेत. राऊत यांना समांतर असे पक्षात मुख्य प्रवक्तेपद निर्माण करून ते खासदार अरविंद सावंत यांच्याकडे देण्यात आले आहे. राऊत यांनी पक्षनेतृत्वावर केलेली टीका भोवल्याचे पक्षातून सांगण्यात येते. मंगळवारी शिवसेनेने आपल्या १६ प्रवक्त्यांची यादी प्रसिद्ध केली. त्यात १४ प्रवक्ते असून प्रथमच दोन मुख्य प्रवक्ते नेमण्यात आले. सप्टेंबर २०२० मध्ये शिवसेनेने प्रथमच मुख्य प्रवक्तेपद निर्माण केले आणि ते राऊत यांच्याकडे दिले. राऊत त्यापूर्वी मुख्य प्रवक्तेपदासारखी भूमिका निभावत असले तरी ते केवळ प्रवक्ते होते.
‘अँटिलिया प्रकरणानंतर डॅमेज कंट्रोलची यंत्रणा सरकारकडे नव्हती. आयपीएस अधिकाऱ्यांची सरकारविरोधी कृत्ये माहीत होऊनही त्यांना मोक्याच्या जागी कसे काय ठेवले?’ असे प्रश्न राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरात केले होते. त्यांचा संपूर्ण रोख सरकारचे नेतृत्व या नात्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे होता. अनिल देशमुख हे गृहमंत्री म्हणून अपयशी ठरल्याची टीका राऊत यांनी केली होती. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हरकत घेतली होती. शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीसंदर्भात राऊत यांनी खुलाशाचे केलेले ट्वीट पक्षनेतृत्वाला आवडले नव्हते. ‘शरद पवार यांना यूपीएचे प्रमुख करा,’ अशी मागणी राऊतांनी केली होती. काँग्रेस नेत्यांनी उद्धव यांच्याकडे तक्रारीही केल्या होत्या.
सावंतांची निष्ठा कामी : संजय राऊत यांची खासदारकीची ही तिसरी टर्म आहे. मुख्य प्रवक्तेपदी वर्णी लागलेले अरविंद सावंत यांनी भाजपबरोबरची युती तोडण्यासाठी केंद्रीय मंत्रिपदावर तेव्हा पाणी सोडले. त्याची भरपाई म्हणून सावंत यांना शिवसेनेच्या कामगार आघाडीचे प्रमुख करण्यात आले होते. तसेच खासदारांच्या समितीचे प्रमुख नेमून राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला होता. ‘संजय राऊत यांचा अतिरेक होत होता. त्यांनी तो करायला नको होता,’ अशी शिवसेना नेत्यांची भावना आहे. सध्या १४ प्रवक्ते नेमले आहेत. त्यात परिवहनमंत्री अनिल परब या एकमेव मंत्र्याचा समावेश आहे. परब हे सध्या उद्धव यांच्या सर्वाधिक जवळचे मानले जातात.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कार्यशैली आहे वेगळी
उद्धव यांना टीका सहन होत नाही. शिवसेनेत वेगळे मत चालेल, पण त्याची जाहीर वाच्यता चालत नाही. पक्षनेतृत्वाने आग्रहाने घेतलेल्या निर्णयाविरोधात बोलायचे नाही, असा शिवसेनेत प्रघात आहे. सेनेत कुणी खासगीतही विरोधी मते बोलली तरी त्याचे अनेक वर्षे परिणाम भोगावे लागतात.
औरंगाबाचे आमदार अंबादास दानवेंचा समावेश
यात उपनेते सचिन आहेर, आमदार सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, भास्कर जाधव, अंबादास दानवे, मनीषा कायंदे, किशोरी पेडणेकर, शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ, किशोर कान्हेरे, संजना घाडी आणि आनंद दुबे यांचा समावेश आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.