आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना संसदेत आवाज उठवणार:ईडीच्या कारभाराची चौकशी करण्याबाबत चर्चा व्हावी, राज्यसभा सभापतींना दिले पत्र

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय राऊत यांच्यावरील कारवाईविरोधात शिवसेना संसदेत आवाज उठवणार आहे. 2014पासून ईडीच्या कारवाया केवळ विरोधकांवर होत आहे. ईडीचा कारभार हा संशयास्पद असल्याने त्याची संसदेत चौकशी व्हावी, अशी मागणी करणारे पत्र राज्यसभेच्या सभापतींना शिवसेनेतर्फे देण्यात आले आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या व खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी याबाबत माहिती दिली.

ईडीचा मनमानी कारभार

खा. प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, शिवसेना खासदार अनिल देसाई आणि मी राज्यसभा सभापतींना पत्र दिले आहे. त्यात ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारभाराची चौकशी व्हावी, यासाठी संसदेत चर्चा करण्याची मागणी केली आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार आहेत. संसदेत अधिवेशन तसेच राष्ट्रपती निवडणुकीमुळे त्यांनी चौकशीस हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला होता. मात्र, ईडीने त्यांना नकार दिला. आता कोणतीची सूचना न देताच त्यांना अटक करण्यात आली. ईडीच्या या मनमानी कारभाराचा जाब आम्ही संसदेत विचारणार आहोत.

ईडी भाजपचीच संस्था

ईडी ही आता एक्सटेन्डेड डिपार्टमेंट ऑफ बीजेपी झाली आहे, अशी टीका चतुर्वेदी यांनी केली. चतुर्वेदी म्हणाल्या, ईडीला स्वायत्त तपास यंत्रणा म्हणणे चुकीचे आहे. ही संस्था आता केवळ भाजपच्या इशाऱ्यावर काम करते. भाजपने दिलेल्या स्क्रिप्टनुसार ईडीचा कारभार चालतो. 2014 पासून विरोधकांना चुप करण्याचे काम भाजप ईडीतर्फे करत आहे. केवळ विरोधकांनाच समन्स कसा काय बजावले जातात, यावर आता चर्चा होण्याची आवश्यकता आहे.

इतिहास दखल घेईल

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने केंद्र सरकारसमोर कसे गुडघे टेकले आहेत याची नोंद इतिहास घेईल. ईडीने देशासाठी प्रामाणिकपणे गेल्या काही वर्षांत एकही कारवाई केलेली नाही. सर्व कारवायाचा भाजपच्या इशाऱ्यावर व राजकारणाने प्रेरीत आहेत. एकप्रकारे ईडीने देशाशीच बेईमानी केली आहे.

बंडखोरांचा हात

संजय राऊत यांच्या कारवाईमागे केवळ भाजप नसून शिवसेनेतून गेलेले बंडखोर आमदारांचाही यात हात असल्याचा आरोप प्रियंका चतुर्वेदी यांनी केला. चतुर्वेदी म्हणाल्या, ईडीला घाबरुनच बंडखोर शिंदे गटासोबत गेले आहेत. ते आता भाजपचे प्रवक्ते बनले आहेत. भाजपच्या सेवेत हे बंडखोर आमदार आता मश्गुल आहेत. त्यांच्याच इशाऱ्याने ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे शिवसैनिक आहेत. ईडीच्या या कारवाईविरोधात आम्ही लढत राहू.

बातम्या आणखी आहेत...