आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछातीवर नाही तर पाठीवर वार झालाय साहेब… या आधी जेव्हा असं झालं होतं तेव्हा गद्दारांना क्षमा नाही …हे तुम्हीच बोलला होता ना साहेब ... आणि आज हे दुसऱ्यांदा झालंय ...पण तुम्ही नाही आहात ...मग ह्यांना कसं माफ करायचं आम्ही... तुम्ही असता तर काय केलं असतं? असा सवाल शिवसेना खासदार राजन विचारे यांनी केलाय. कै. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने राजन विचारे यांनी भावूक पत्र लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहे.
काय म्हटलंय पत्रात.....
प्रति,
गुरवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब जय महाराष्ट्र…
साहेब पत्रास कारण की आज तुम्हाला जाऊन 21 वर्ष उलटून गेली. पण असा एकही दिवस नाही की तुमची आठवण आली नाही. आज जरा जास्त आठवण येतेय साहेब...
वयाच्या 16व्या वर्षापासून आम्ही तुमच्यासोबत काम करत आलो. लढलो, धडपडलो. या सगळय़ा प्रवासात तुम्ही माझ्यासोबत होतात. अजूनही अंधारात वाट दाखवत सोबतच आहात. अगदी धगधगत्या दिव्यासारखे.
पण साहेब आज मी जितका अस्वस्थ आहे .. तितका कधीच नव्हतो. कारण आज एक अशी घटना घडलीये ज्या घटनेमुळे फक्त मीच नाही, फक्त शिवसैनिकच नाही तर एक शिवसेना बघितलेला सर्व सामान्य मराठी माणूस सुध्दा अस्वस्थ झालाय... आता तुम्हाला कुठल्या तोंडाने सांगू, घात झाला दिघे साहेब घात झालाय, तो पण आपल्याच लोकांकडून म्हणून आज तुमची आठवण येतेय साहेब.
शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या इतिहासात विजयाची नांदी आपल्या ठाण्यात झाली होती ना साहेब.... तेव्हा तुमची ५६ इंचाची छाती अभिमानाने भरलेली पाहिली होती आम्ही साहेब ज्या ठाण्यावर तुम्हाला अभिमान होता... महाराष्ट्रात ज्या ठाण्याने आपल्याला पहिल्यांदा सत्ता दिली आज त्याच ठाण्यावर गद्दारीचा शिक्का बसलाय. छातीवर नाही तर पाठीवर वार झालाय साहेब... ह्या आधी जेव्हा असं झालं होतं तेव्हा गदारांना क्षमा नाही..हे तुम्हीच बोलला होता ना साहेब. आणि आज हे दुस-यांदा झालय...पण तुम्ही नाही आहात. ह्यांना कसं माफ करायचं, तुम्ही असता तर काय केलं असतं, म्हणून आज तुमची आठवण येतेय साहेब.
साहेब आज आनंदश्रमाकडे पाहिलं अन् चटकन डोळ्यात पाणी आलं ह्याच मंदिरात आम्हा सगळ्यांना शिवबंधन बांधलं होतं ना तुम्ही साहेब आज तेच बंधन तुटताना होणाऱ्या वेदना आम्हालाही होतायेत- पण रडायचं नाही लढायचं. हा विचार घेऊन पुढे जाणारी संघटना आहे आपली
साहेब शेवटच्या श्वासापर्यंत संघटनेसाठी काम करताना पाहिलंय तुम्हाला - म्हणून आज तुमची आठवण येतेय साहेब ... पण साहेब काळजी नसावी ...
कोणत्याही पदापेक्षा.. वैयक्तिक स्वायपिक्षा संघटना महत्वाची ..पक्ष महत्वाचा.. तुमची ही शिकवण मानाने मिरवत पुढे घेऊन जाणारा तुमचा राजन आणि तुमचे सगळे सच्चे शिवसैनिक आहेत आपली संघटना उभारण्यासाठी... कितीही जण गेले तरी तुमचे आणि बाळासाहेबांचे विचार आहेत आमच्या सोबत .. साहेब आम्ही जीवाची बाजी लावू पण शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना.. हे ब्रीदवाक्य पुसू देणार नाही आम्ही... पुन्हा एकदा तुमचा सैनिक ह्या वादळात पहाडासारखा उभा राहणार आहे.. कारण तुम्ही दिलेली ताकद आजही मनगटात शाबूत आहे आमच्या . पुन्हा एकदा प्रवास खडतर असला तरी ह्या प्रवासात तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत असु द्या ...
फक्त लढ म्हणा.....!
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात बदल झाले आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर शिवसेनेची नव्याने बांधणी करण्याचे आव्हान आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर राजन विचारे यांनी पत्रातून बंडखोरी केलेल्या आमदार, खासदारांना इशारा दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.