ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राऊतांनी मांडला 2020 चा हिशोब:...तर राज्ये फुटतील, 'या' स्थितीत आपल्या पंतप्रधानांना शांत झोप लागत असेल तर त्यांचे कौतुक; राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा
- देशाचे भवितव्य उज्ज्वल करणे किंवा अधोगतीला नेणे हे दोन-चार माणसांच्या हाती जाणे ही भारतीय समाज जीवनाची शोकांतिका
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मावळत्या 2020 या वर्षाचा हिशोब मांडत मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. 2020 चा हिशोब मांडत संजय राऊतांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. यामध्ये नवीन संसद भवन, राम मंदिर वर्गणी, चीनची घुसखोरी, विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांना केंद्राकडून दिली जाणारी वागणूक, मोजक्या उद्योगपतींना दिले जाणारे प्राधान्य अशा अनेक विषयांवर राऊतांनी मोदींचा खरपूस समाचार घेतला आहे.
'मावळत्या वर्षाने महागाई, बेरोजगारी, आर्थिक डबघाई, निराशा, वैफल्याचे ओझे उगवत्या वर्षावर टाकले आहे. सरकारकडे पैसा नाही, पण निवडणुका जिंकण्यासाठी, सरकारे पाडण्या-बनवण्यासाठी पैसे आहेत. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा कर्ज अधिक या स्थितीत आपण चाललो आहोत. या स्थितीत आपल्या पंतप्रधानांना शांत झोप लागत असेल तर त्यांचे कौतुक करायला हवे.' असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या 'रोखठोक' सदरातून मोदी सरकारला लगावला आहे.
सामना अग्रलेखात नेमके काय?
- बिहारात निवडणूक झाल्या. तेथे तेजस्वी यादव यांनी मोदी यांच्याशी टक्करच घेतली. बिहारचे नितीशकुमार व भाजपची सत्ता प्रामाणिक मार्गाने आली नाही. मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी विशेष प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट भाजपचेच नेते विजय वर्गीय यांनी केला. राज्यांची सरकारे अस्थिर करण्यात आपले पंतप्रधान विशेष रस घेत असतील तर कसे व्हायचे?
- पंतप्रधान देशाचे आहेत. संघराज्य बनून देश उभा आहे. ज्या राज्यांत भाजपची सरकारे नाहीत ती राज्येही राष्ट्राशीच नाते सांगतात, हा विचार मारला जात आहे. मध्य प्रदेशात काँग्रेस फोडून भाजपने सरकार बनवलं. बिहारात तेजस्वी यादव या तरुणाने आव्हान उभे केले. कश्मीर खोऱ्य़ात अस्थिरता कायम आहे. लडाखमध्ये चीन घुसलेलाच आहे. पंजाबच्या शेतकऱ्य़ांवर जोरजबरदस्तीचे प्रयोग सुरू आहेत. पंगना राणावत व अर्णब गोस्वामीला वाचविण्यासाठी केंद्रीय सरकार जमिनीवर उतरले. मुंबईची ‘मेट्रो’ राजकीय अहंकारासाठी अडवून ठेवली. राजकीय साठमारीत आपण जनतेचे नुकसान करतो याचे भान केंद्रातील सत्तेने ठेवले नाही तर रशियातील राज्ये फुटली तसे आपल्या देशात घडायला वेळ लागणार नाही.
- केंद्र सरकारच्या क्षमतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे वर्ष म्हणून 2020कडे पाहावे लागेल. राज्य व केंद्राचे संबंध बिघडत आहे. सर्वोच्च न्यायालय अनेक प्रकरणांत आपले कर्तव्य विसरून गेले. देशाचे भवितव्य उज्ज्वल करणे किंवा अधोगतीला नेणे हे दोन-चार माणसांच्या हाती जाणे ही भारतीय समाज जीवनाची शोकांतिका आहे. ही शोकांतिका सध्या सुरू आहे.
- कोरोना आणि लॉक डाऊन असले तरी सर्व स्तरांवरील भ्रष्टाचाराचा विषाणू कायम आहे. अंबानी, अदानी यांची संपत्ती मावळत्या वर्षातही वाढत गेली, पण जनतेने मोठ्या प्रमाणात नोकऱ्य़ा गमावल्या. त्यामुळे नवीन वर्षाचे आगमन नोकरदारांना काय देणार?
- 2020 मावळत आहे. मावळते वर्ष काहीच चांगले पेरून गेले नाही. त्यामुळे नवीन वर्षात कोणती फळे मिळतील त्याचा भरवसा नाही. लोकांनी एकच करावे, आपले कुटुंब कसे वाचवता येईल ते पाहावे. बाकी देश सांभाळायला मोदी व त्यांचे दोन-चार लोक आहेत.
- अमेरिकेने आर्थिक अरिष्टात सापडलेल्या त्यांच्या नागरिकांना चांगले पॅकेज दिले. प्रत्येक अमेरिकन नागरिकाच्या बँक खात्यावर महिन्याला 85 हजार रुपये जमा होतील असे हे पॅकेज आहे. ब्राझील, युरोपातील देशांतही हे झाले, पण मावळत्या वर्षात हिंदुस्थानी जनतेची झोळी रिकामीच राहिली.
- लोकशाहीचा आत्मा मावळत्या वर्षात देशाने जे आघात सहन केले त्यांत कोरोनाचा हल्ला मोठा. लाखो लोकांनी प्राण गमावले. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे ‘संसद’ म्हणजे लोकशाहीचा आत्मा. तो आत्माच नष्ट झाला. शेतकऱ्य़ांचे आंदोलन ज्या तीन कृषी विधेयकांविरुद्ध सुरू आहे ती तीनही विधेयके बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतली गेली. आता त्या विधेयकांविरोधात शेतकरी आज रस्त्यावर उतरला आहे. अयोध्येच्या राममंदिरासारखे भावनिक विषय उभे केले जातात, पण शेतकऱ्य़ांच्या भावनेचा विचार सरकार करीत नाही.
- हिंदुस्थानात लोकशाही राजवट असल्याचे आपण मानतो, परंतु चार-पाच उद्योगपती, दोन – चार राजकारणी व्यक्ती आपल्या महत्त्वाकांक्षा, वैर, राग लोभ, अहंकार यांच्यासाठी देशाला कसे वेठीस धरतात याचे चित्र मावळत्या वर्षात दिसले. देशहिताचा विचार आता संपुचित ठरत आहे. पक्षहित व व्यक्तिपूजा म्हणजेच देशहित. राजकारणात फक्त स्वार्थ, कपटीपणा आणि शेवटी हिंसा इतकेच शिल्लक राहिले काय, असा प्रश्न पं. बंगालमधील सध्याचे वातावरण पाहून पडतो.