आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना काळात शनिवारी मोठ्या उत्साहात देशभरात दिवाळी साजरी करण्यात आली. दरम्यान शिवसेनेचे मुखपत्र दैनिक 'सामना'तील रोखठोक सदरात राऊत यांनी दिवाळीची महती सांगताना वर्तमान परिस्थिती सांगितली आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीवरही निशाणा साधला आहे.
'अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन झालेच आहे. बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी प्रथमच ‘जय श्रीराम’चे नारे दिले, पण रामाचे राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही' असे म्हणत शिवसेनेचे आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
दरम्यान अन्वय नाईक प्रकरणावरून रिपब्लिक टीव्ही भारतचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक करण्यात आली होती. मुंबई हायकोर्टाने जामीन नाकारल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन अर्णब गोस्वामी यांनी जामीन मिळवला. अर्णब गोस्वामींच्या सुटकेवर संजय राऊतांनी भाष्य केले. ते म्हणाले की, 'सुख किंवा दुःख देणारे दुसरे कोणी नसते. इतर कोणामुळे तरी आपल्यावर दुःख कोसळले असे समजणे चुकीचे आहे. ‘अमके तमके मी करीन’ हा अहंकार, अभिमानही फालतू आहे. तुमचे कर्मच तुम्हाला तळोजाच्या तुरुंगात घेऊन जाते,' असा खोचक टोला संजय राऊतांनी गोस्वामीला लगावला आहे.
पुढे राऊत म्हणाले की, मला हेसुद्धा फारसे पटत नाही. ज्ञान, बुद्धी, विचार कमवावे लागतात. हे कमवणे आता कमी झाले आहे. एका वृत्तवाहिनीचा प्रमुख गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्याबद्दल तुरुंगात गेला. केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे तो सुटून तुरुंगातून बाहेर पडला तेव्हा ‘भारतमाता की जय’ वगैरे घोषणा देऊ लागला. येथे भारतमातेचा काय संबंध? ज्या न्यायमूर्ती महाशयांनी व्यक्तिस्वातंत्र्याच्या सबबीखाली त्याची सुटका केली, त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा देणे हे समजण्यासारखे आहे. येथे भारतमाता, राष्ट्रभक्ती वगैरेचा संबंध काय? असा सवालही संजय राऊतांनी केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.