आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजपच्या महिला मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सरचिटणीस दिप्ती रावत भारद्वाज यांनी संजय राऊत यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. महिलांचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर कलम 500 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी वापरलेल्या शब्दाचा अर्थ मूर्ख असा होतो. तसेच माझ्या पक्षाची बदमानी करण्यासाठी ही कारवाई केली असल्याचे देखील राऊत म्हणाले आहेत.
या कारवाईविषयी माध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, 'मी जो शब्द वापरलेला आहे त्याचा अर्थ मूर्ख असा होतो. देशातील सर्व शब्दकोशांमध्ये त्याचा अर्थ असा दिलेला आहे. अशा शब्दकोशांना सरकारची मान्यता आहे. मोठ्या मोठ्या लोकांनी त्या शब्दावर आपले मत व्यक्त केलेले आहेत. मात्र आता यावरुन माझ्याविरुद्ध दिल्लीमध्ये तक्रार दाखलकरण्यात आले. फक्त तक्रार नाही तर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र सूडाच्या भावनेने माझा आवाज दाबण्यासाठी हे केले जात आहे. सीबीआय, ईडी आतापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत कारण मी सरळ माणूस आहे. बदल्याच्या भावनेतून मला त्रास देण्यासाठी आणि माझ्या पक्षाची बदनामी करण्यासाठी ही तक्रार केलेली आहे.'
नेमके काय आहे प्रकरण?
संजय राऊतांनी माध्यमांसमोर वापरलेल्या अपशब्दांमुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. संजय राऊतांचा शरद पवारांसोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता. यानंतर भाजपकडून त्यांना ट्रोल करण्यात आले होते. यावर माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर राऊत संतापले होते. राऊत म्हणाले होते की, मी लालकृष्ण अडवाणी जरी असते तरी देखील खुर्ची दिली असती. महाराष्ट्रातल्या एका पितृतुल्य व्यक्तीला मी खुर्ची आणून दिली. ही गोष्ट जर कुणाला आवडली नसेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नाही तर ही विकृती आहे. असे म्हणत राऊतांनी संताप व्यक्त केला होता आणि अपशब्दांचा वापर केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.