आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांचे भाष्य:महाराष्ट्र सरकारला त्या संदर्भात पाऊल टाकावे वाटत नसेल तर हे दुर्दैव, बेळगावच्या मुद्द्यावर संजय राऊतांचे स्पष्ट मत

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र सरकार पाऊल उचलत नसेल तर हे दुर्दैव

कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी भाषिकांविषयी सतत अन्यायाची भूमिका घेत आहे. आता कर्नाटक सरकारने केलेल्या भाषिक जनगणनेत मराठी भाषिकांची संख्या कमी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बेळगावमध्ये केवळ 15 टक्के मराठी भाषिक आहेत असा अजब निष्कर्ष कर्नाटक सरकारकडून काढण्यात आला आहे. यावर आता संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक सरकारचा हा संपूर्ण रिपोर्ट खोटा आहे. त्यावर महाराष्ट्र सरकार भूमिका का घेत नाही? राज्य सरकार गप्प का? असा संतप्त सवाल देखील संजय राऊतांनी केला आहे.

संजय राऊत यांनी बेळगावच्या या विषयावर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी कर्नाटक सरकारवर निशाणा साधला. राऊत म्हणाले की, 'बेळगावमध्ये 60 टक्के ते 65 टक्के मराठी बांधव आहेत. आज देखील ती संख्या तेवढीत आहे. केवळ कर्नाटकने राजकीय स्वार्थासाठी त्या संपूर्ण भागाचे कानडीकरण केले आहे आणि मराठी टक्का कमी करण्याचा प्रयत्न केलाय. असे असले तरीही सीमाभागातील बहुमत हे मराठी आहे. बेळगाव महापालिकेमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झालेला आहे. मात्र तरीही मराठी उमेदवारांना पडलेली मते ही भाजपपेक्षा जास्त आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेला भाजप सत्तेमध्ये आलेला आहे. मराठी भाषिक अल्पसंख्याक असे ते म्हणत असतील तर हे अत्यंत खोटे आहे. यामागे त्यांचा काहीतरी डाव आहे.'

महाराष्ट्र सरकार पाऊल उचलत नसेल तर हे दुर्दैव
संजय राऊत यांनी बेळगाव मुद्द्यावर बोलत असताना ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे. याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'महाराष्ट्र सरकारने बेळगावमधील मराठी भाषिकांच्या टक्केवारीविषयी केलेल्या निष्कर्षावर भूमिका घ्यायला हवी. याविषयी राज्य सरकार गप्प का? असा सवाल देखील राऊतांनी केला. तसेच राज्य सरकारने सीमाभागासाठी दोन मंत्री नेमले आहेत. या दोन्ही मंत्र्यांनी तात्काळ तिथे जाऊन चर्चा करायला हवी. महाराष्ट्र सरकारला त्या संदर्भात पाऊल टाकावे वाटत नसेल तर हे दुर्दैव आहे. मी मुख्यमंत्र्यांशी याविषयावर चर्चा करेल' असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...