आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा"तानाजी सावंतांची काय लायकी आहे, कोण तानाजी सांवत, तुझी काय लायकी, तुला हे विचारायचा काय अधिकार आहे, आयत्या बिळात नागोबा होणारा तानाजी सावंत असून त्यांनी शिवसेनेच्या भानगडीत पडू नये, काय शिवसेनेची ताकद आहे हे तुला नक्कीच कळेल" असे प्रत्युत्तर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी तानाजी सावंतांना दिले आहे. शिंदे गटाचे आमदार तानाजी सांवत यांनी आज सकाळी आदित्य ठाकरे यांचा एकेरी शब्दात "कोण आदित्य" असा उल्लेख केला होता, त्यावर प्रत्युत्तर देताना विनायक राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली. ते आज मुंबई प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "ही गद्दारांची कीड आहे, त्यांना भारतीय जनता पार्टी पोसत आहे. त्यांचा तालावर नाचणारे हे लोकं आहेत, त्यांना आता स्वत:चा आवाज राहिलेला नाही." शिवसेनेच्या जनसंवाद यात्रेला उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळत असून, हजारोंच्या संख्येंने लोक आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात सहभाग घेत असून, त्यांना पाठिंबा देत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मनात आदर आहे. ते या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून दिसून येत आहे.
शिवसेना संपवू शकत नाही
भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारे शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न केले असून, जेपी नड्डा यांच्या तोंडातून सत्य बाहरे पडले, पण दुर्दैवाने नड्डा यांच्या कटकारस्थानमध्ये एकनाथ शिंदे आणि सहभागी झालेले 40 गद्दार याचे वाटेकरी ठरणार आहेत. मात्र, शिवसेनेला संपवणारी औलाद आतापर्यंत जन्माला आलेली नाही, असा खोचक टीकाही विनायक राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर केली.
महाराष्ट्र फोडायचा डाव
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी छोटे-छोटे पक्ष येत्या काही काळात नष्ट होतील, असे वक्तव्य केले त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, "भाजपला शिवसेना नको आहे त्यांना शिवसेना संपवायची आहे. शिवसेना संपवायची म्हणजे त्यांना महाराष्ट्र संपवायचा आहे, ही त्यांची राक्षसी इच्छा आहे. शिवसेना संपली की भाजप महाराष्ट्र फोडायला मोकळे होईल. कोल्हापूर, कोकण हे कर्नाटकला देऊन टाकायचे. विर्दभ मध्यप्रदेशला देऊन टाकायचे, असे त्यांचे प्रयत्न आहे. ऑपरेशन लोटस करत असताना भाजपचा डोळा हा मुंबईवर आहे. मुंबई त्यांना गुजरातला जोडायची असून, त्यांना ती केंद्रशासित करायची आहे. या पद्धतीचा कुटीला डाव हे भारतीय जनता पक्ष खेळते आहे.
राऊतांना जामीन मिळेल
पुढे विनायक राऊत यानी संजय राऊत यांच्या अटकेबाबत बोलताना सांगितले की, "संजय राऊत यांना अटक झाली ही अतिशय दुर्दैवाची घटना आहे. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांचा काडीचाही संबंध नाही, ते शिवसेनेची ढाल म्हणून लढतायेत. विरोधकांना तोंड देत असून भारतीय जनता पार्टी विरोधात त्यांनी जी आघाडी उघडली होती, त्याचा सूड म्हणून संजय राऊतांनी पकडण्याचा काम केले आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची कोठडी दिली असून, आम्हाला विश्वास आहे की, त्यांना जामीन मिळेल. शिवसेना पुन्हा एकदा नव्या जोराने उभी राहणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना पून्हा एका सत्तेत येणार, असा विश्वास देखील राऊतांना व्यक्त केला.
काय म्हणाले होते सावंत?
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे देखील पुणे दौऱ्यावर आहेत. शिंदेंच्या पुणे दौऱ्यादरम्यान अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. त्यामध्ये शिंदे समर्थक आमदार तानाजी सावंत यांच्या घरी देखील एकनाथ शिंदे जाणार आहेत. तानाजी सांवत यांच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आदित्य ठाकरे यांची सभा होणार असून, त्यावर प्रतिक्रिया देताना तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे यांच्या एकेरी शब्दात उल्लेख केला. "कोण आदित्य ठाकरे, त्याचा काय संबंध, तो एक आमदार आहे, यापेक्षा मी फारसं महत्व देत नाही" आदित्य ठाकरे किंवा आणखी कुणी असेल त्या गोष्टींना मी फारसा महत्व देत नाही." असा एकेरी उल्लेख सावंतांनी केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.