आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची फडणवीसांवर टोलेबाजी:चिनी सैन्याने माघार घेतली, पण सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस व त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत, शिवसेनेची फटकेबाजी 

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लढाईत लहानसहान फुसकुल्या सोडून वातावरणात दुर्गंधी आणण्याचे काम कोणी करू नये.
  • देवेंद्र फडणवीस यांची गाडी विरोधी पक्षनेता म्हणून रुळावर येताना दिसत आहे. महाराष्ट्रातील राजकीय वास्तव त्यांचे मन अशांत करणारे असले तरी त्यांनी ते अखेर स्वीकारले हे बरे झाले.

विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस हे त्यांची भूमिका पार पडत आहे. यावेळी ते महाराविकास आघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दरम्यान आता शिवसेनेने त्यांच्यावर तुफान फटकेबाजी केली आहे.  चिनी सैन्याने गलवान खोऱ्यात माघार घेतली, पण सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस व त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत. हे विचित्र आहे. सरकारमधील एक प्रमुख घटक पक्ष काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात सांगत आहेत की, ‘सरकारमध्ये कोणताही अंतर्विरोध नाही. चर्चा होऊन प्रश्न सुटतात. विरोधकांनी स्वप्ने पाहू नयेत.’ श्री. शरद पवारांसारखे नेते सरकार पाच वर्षे चालवू याची ग्वाही देत आहेत. तरीही विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजविण्याचे धंदे सुरूच आहेत. ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का? असे म्हणत शिवसेनेने सामना अग्रलेखातून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे नगरसेवक फोडले. यानंतर कल्याण पंचायत समितीमध्ये शिवसेनेनं भाजपची साथ घेत सत्ता स्थापन केली. तसेच पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द करण्याचा निर्णय अशा अनेक घडामोडींमुळे महाविकास आघाडीत कुरबुरी सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. विरोधी पक्ष भाजपकडून या विषयावर जास्त जोर दिला जात आहे. हे सरकार आम्ही पाडणार नाही. ते अंतर्विरोधातून पडेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. आता विरोधकांच्या या वक्तव्यांवर 'सामना'च्या अग्रलेखातून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. 

अग्रलेखात काय?

  • सध्या पावसाची रिपरिप सुरूच असते तशी बातम्यांची रिपरिप सुरू आहे. रिपरिप म्हणजे फक्त शिडकावा, वादळ वगैरे नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद आहेत. वादाचे रूपांतर वादळात होईल अशी रिपरिप गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू आहे. बातम्यांची रिपरिप अशीही सुरू आहे की, सरकारमधील तीन प्रमुख पक्षांचे अजिबात पटत नाही व अनेक निर्णयांवर मतभेद आहेत. त्यामुळे श्री. शरद पवार हे शिष्टाई करण्यासाठी ‘मातोश्री’वर गेले. तीन पक्षांत समन्वयाचा अभाव असून पडद्यामागे बरेच काही सुरू असल्याचे बोलले जात आहे. या सगळय़ा रिपरिप बातम्यांत काडीमात्र तथ्य नाही.
  • आनंदाची बाब अशी की, देवेंद्र फडणवीस यांची गाडी विरोधी पक्षनेता म्हणून रुळावर येताना दिसत आहे. महाराष्ट्रातील राजकीय वास्तव त्यांचे मन अशांत करणारे असले तरी त्यांनी ते अखेर स्वीकारले हे बरे झाले. श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, आम्हाला राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याची कोणतीही घाई नाही आणि हे सरकार आम्ही कधीही पाडणार नाही. हे सरकार अंतर्गत विरोधातूनच पडेल, असे विरोधी पक्षनेते सांगतात. विरोधी पक्षनेत्यांचे म्हणणे गांभीर्याने घेतले तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की, सरकार पाडण्याची घाई नाही, पण सरकार अंतर्गत विरोधातून पडेल असा गोंधळी विचार त्यांनी मांडला आहे. चिनी सैन्याने गलवान खोऱयात माघार घेतली, पण सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस व त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत. हे विचित्र आहे.
  • सरकारमधील एक प्रमुख घटक पक्ष काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात सांगत आहेत की, ‘सरकारमध्ये कोणताही अंतर्विरोध नाही. चर्चा होऊन प्रश्न सुटतात. विरोधकांनी स्वप्ने पाहू नयेत.’ श्री. शरद पवारांसारखे नेते सरकार पाच वर्षे चालवू याची ग्वाही देत आहेत. तरीही विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजविण्याचे धंदे सुरूच आहेत. ही चिपळय़ा वाजवायची वेळ आहे का?
  • देशात व राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. चीनने तात्पुरती माघार घेतली असली तरी कोरोनाची पीछेहाट झालेली नाही. कोरोना हे देशावरील संकट आहे. त्यामुळे या लढाईत लहानसहान फुसकुल्या सोडून वातावरणात दुर्गंधी आणण्याचे काम कोणी करू नये. विरोधकांच्या नजरेत जो गोंधळ किंवा अंतर्विरोध वाटतो, ते प्रत्यक्षात सरकारातील जिवंतपणाचे लक्षण असू शकते.
बातम्या आणखी आहेत...