आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेबाबत पंजाबमध्ये घडलेल्या प्रकारानंतर सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात या विषयावर भाष्य केले आहे. या लेखातून पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयी काळजी व्यक्त केली आहेच मात्र काही दाखले देत टोले देखील लगावण्यात आले आहेत.
सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, देशाचे नेतृत्व करणाऱ्या अनेकांना कधी ना कधी धोकादायक प्रसंगांना सामोरे जावे लागलेच आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबाबतीत पंजाबात जे घडले ते चिंताजनक, तितकेच धक्कादायक आहे. देवाच्या कृपेने मोदी सुखरूप परत आले म्हणून देवांचे आभार. तरीही पंजाबातील सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायलाच हवी.
आम्ही तर म्हणतो, विषय देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीचा असल्यामुळे संयुक्त संसदीय समिती स्थापन करुन या प्रकाराची चौकशी व्हायला हवी. म्हणजे ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. पुलवामा ते पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी हा चिंतेचाच विषय आहे. आम्ही मोदी यांना निरोगी दीर्घायुष्य चिंतितो, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या कारणावरून देशात गोंधळाचे, तितकेच गमतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी, कार्यकर्त्यांनी जागोजागी पूजाअर्चा, महामृत्युंजय जप, यज्ञ, महाआरत्यांचे आयोजन सुरू केले आहे. लोकांनी घरात व बाहेर धूप, आरत्या वगैरे करून पंतप्रधानांच्या सुरक्षित दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या आहेत. मोदी यांना सुरक्षित जीवन लाभावे यासाठी उत्तर प्रदेश, आसामचे मुख्यमंत्री मंदिरात पूजेला बसल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले.
एकंदरीत संपूर्ण देशच अशा पद्धतीने ईश्वरपूजेत मग्न झाल्याने आपण सगळेच अध्यात्माच्या शेवटच्या बिंदूला पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व कशासाठी, तर पंजाबात पंतप्रधान मोदी यांच्या जिवावरच बेतले होते, पण देवाच्या कृपेने ते वाचले म्हणून. मोदी यांच्याभोवती असलेले अभेद्य सुरक्षा कवच, प्रशिक्षित एसपीजी कमांडो, प्रचंड सुरक्षा दल, अत्याधुनिक बुलेटप्रूफ कवच असलेल्या गाडय़ा-घोडे यामुळे नव्हे, तर देवकृपेने आपले पंतप्रधान वाचले व पंजाबातून सुखरूप दिल्लीस परत आले. त्यामुळे नवीन वर्षात त्यांच्या सुरक्षेवरून देवदिवाळी सुरू केली आहे, पण मुळात घडले काय, घडले कसे व जे घडले त्यास जबाबदार कोण याचा थांगपत्ता लागणे आवश्यक आहे. पुढे अग्रलेखात म्हटले आहे की, पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या बाबतीत साप समजून भुई धोपटणे हा प्रकार योग्य नाही व त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेतील फटी व चिरा कधीच बुजवता येणार नाहीत. पंतप्रधान मोदी दोन दिवसांपूर्वी पंजाबमधील फिरोजपूर येथे विविध प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यासाठी आले, पण त्यांचा ताफा रस्त्यावरील उड्डाणपुलावर शेतकऱयांच्या एका गटाने अडवल्याने मोदी अचानक दौरा सोडून माघारी परतले हे उपकथानक समोर आले आहे. उड्डाणपुलावर पंतप्रधानांचा ताफा पंधरा-वीस मिनिटे थांबला. निदर्शकांनी रस्ता रोखल्यामुळे हे घडले असे सांगितले गेले. पंतप्रधानांच्या सुरक्षेत या त्रुटी आहेत असे केंद्रीय गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे.
या विषयावर आता भलतेच राजकारण सुरू झाले आहे व त्यात देवादिकांनाही ओढण्यात आले आहे. आपल्या पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे नाही हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. जगातील दहा सर्वोच्च नेत्यांच्या तोडीची सुरक्षा व्यवस्था पंतप्रधान मोदी यांना लाभली आहे. सुरक्षेसाठी एसपीजी कमांडोंचे कवच आहेच, पण नुकतीच 12 कोटींची मेबॅक-बुलेटप्रूफ गाडीही त्यांच्या ताफ्यात सामील झाली आहे. त्यामुळे आपल्या पंतप्रधानांचा बालही बाका होणार नाही, असे लेखात म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.