आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राऊतांचा मोदी सरकारवर हल्ला:'सरकारने शेतकऱ्यांविरोधात ‘सेलिब्रिटीज्’ना उतरवले', संजय राऊतांचा केंद्र सरकारवर 'रोखठोक' निशाणा

मुंबई18 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • सातासमुद्रापलीकडून शेतकरी आंदोलनास पाठिंबा देताच येथे अनेकांना मिरच्या झोंबल्या
 • शीख विरुद्ध जाट अशी सरळ फूट सरकारने पाडली
 • ...पण पोलादी इराद्याच्या आंदोलकांशी सरकार कोणत्या हत्याराने लढणार?

दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून कृषी कायदे रद्द करावे यासाठी पंजाबचा शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसला आहे. दरम्यान सरकार त्यांच्या मागण्या मान्य करण्यास तयार नाही. शेतकऱ्यांना जगभरातील दिग्गजांकडून समर्थन मिळत आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास तयार नाही. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

लोकशाहीच्या गप्पा पॉपस्टार रिहाना हिने सातासमुद्रापलीकडून शेतकरी आंदोलनास पाठिंबा देताच येथे अनेकांना मिरच्या झोंबल्या. परदेशातील लोकांनी येथील कलाकारांचे कौतुक केलेले चालते. पण लढणाऱया शेतकऱयांचे कौतुक केले हा आपल्या देशातील हस्तक्षेप वाटतो. आता रिहानाच्या समर्थनासाठी जे उभे राहतील त्यांना ‘देशद्रोही’ ठरवले जाईल. देशद्रोहाचा कायदा आपल्या देशात कमालीचा स्वस्त झाला आहे, पण गाझीपूरच्या सीमेवर प्रत्येक तंबूवर तिरंगा फडकतो आहे. देशभक्तीची गाणी लागली आहेत. सरकारच्या पगडीलाच शेतकऱयांनी हात घातला. म्हणजे त्यांनी देशद्रोहच केला! लोकशाही व नीतिमत्तेच्या गप्पा आता फक्त तोंडी लावायला. प्रत्यक्षात दिल्लीच्या दिव्याखाली अंधार आहे. असे म्हणत संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

रोखठोकमध्ये नेमके काय?

 • दिल्लीच्या सीमेवरील गाझीपूरला शेतकऱयांचे आंदोलन पेटले आहे. जगभरातून त्यांना पाठिंबा मिळतोय. हा आपल्या देशात हस्तक्षेप असल्याचा अपप्रचार सुरू झालाय. गाझीपूरचे आंदोलन हे बंडखोर किंवा देशद्रोह्यांचे नाही. ते आपल्या हाडामांसाचे शेतकरी आहेत. ते ‘जयहिंद’चा नारा देत लढत आहेत.
 • जगभरातून शेतकरी आंदोलनास पाठिंबा मिळत आहे. पॉपस्टार रिहाना हिने दिल्लीतील शेतकऱयांच्या आंदोलनास पाठिंबा देताच पंतप्रधान मोदी यांच्या भक्तांत एकच खळबळ उडाली. स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस या उघडपणे शेतकऱयांच्या समर्थनासाठी उतरताच अक्षय कुमार, कंगना राणावत, सचिन तेंडुलकरपासून ते लता मंगेशकरपर्यंत सर्व ‘सेलिब्रिटीं’नी अचानक आपली मते समाजमाध्यमांवर व्यक्त केली.
 • ‘शेतकरी आंदोलन हा आमचा देशांतर्गत विषय आहे त्यात विदेशी हस्तक्षेप नको,’ असा साक्षात्कार या प्रमुख मंडळींना झाला. पण गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी एकाकी झुंज देतोय त्यावर साध्या संवेदनाही या प्रमुख मंडळींनी व्यक्त केल्या नाहीत. म्हणजेच आंतरराष्ट्रीय पाठिंबा शेतकऱयांना मिळू लागताच, सरकारने त्यांच्या विरोधात या ‘सेलिब्रिटीज्’ना उतरवले.
 • शेतकऱयांचा लढा हा माणुसकी व न्याय्य हक्काचा लढा आहे. जगभरातून अशा प्रत्येक लढय़ास मानवतावादी पाठिंबा देतच असतात. शेतकरी देशात बंडाळी करू इच्छित नाहीत व ते देश तोडायला निघाले नाहीत. अमेरिकेच्या संसदेवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला होता. तेव्हा पंतप्रधान मोदींपासून अनेक हिंदुस्थानी नेत्यांनी त्या हल्ल्याचा निषेध करून बायडन या उगवत्या सूर्यास नमस्कार केला होता. ट्रम्प यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी अमेरिकेत व अहमदाबादेत प्रचार सभा घेतल्या. तोसुद्धा त्यांच्या देशातला हस्तक्षेप होता. त्यामुळे रिहानाचा विषय हा स्वतंत्र आहे. गाझीपूरच्या सीमेवरील शेतकऱयांना जागतिक पाठिंबा मिळत असेल तर त्याचा विचार सरकारने करायला हवा. चीन आणि पाकिस्तानशी चर्चा होते, पण शेतकऱयांना ती संधी नाही.
 • मी गाझीपुरातील एका तंबूत असताना, हरयाणातील एक महिला त्या तंबूत आपल्या पतीस भेटण्यासाठी पोहोचली होती. पती-पतीची भेट 56 दिवसांनी होत होती व 70 वर्षांच्या त्या महिलेच्या डोळ्यांतून पतीला पाहून फक्त अश्रुधारा वाहात होत्या. “आपण ठीक आहात ना? घरची चिंता करू नका.’’ इतकेच सांगून ती गृहिणी निघाली. असे अस्वस्थ करणारे प्रसंग प्रत्येक तंबूत घडत आहेत. पण लोक मागे हटायला तयार नाहीत. अशा पोलादी इराद्याच्या आंदोलकांशी सरकार कोणत्या हत्याराने लढणार?
 • बळाचा वापर पोलीस दलाचा आणि लष्कराचा उपयोग नागरी जीवनाच्या क्षेत्रात इतका होत नव्हता. गाझीपुरात तो यापुढे होईल असे दिसते. गाझीपुरात जे दिसले ते राज्यकर्त्यांच्या हृदयशून्यतेचे दर्शन आहे. सरकारने भ्रम निर्माण करून सिंघू बॉर्डरवरील पंजाबी नेत्यांना आंदोलनातून बाहेर काढले. सिंघू बॉर्डरवरील आंदोलनाचे नेतृत्व गुरुनामसिंह चढुनी हे किसान नेते करीत होते. हे महाशय सीमेवर होते तोपर्यंत आंदोलनास आर्थिक रसद मोठय़ा प्रमाणात मिळत होती. कारण पंजाबच्या शेतकऱयांनी ही सीमा ताब्यात घेतली होती. आता हा रस्ता मोकळा केला आहे. शीख विरुद्ध जाट अशी सरळ फूट सरकारने पाडली, पण गाझीपूरला राकेश टिकैत मांड ठोकून उभे आहेत.
 • गाझीपूरच्या बॉर्डरवर खाण्याचे ‘लंगर’ सुरू आहेत व महिला मोठय़ा प्रमाणावर तेथे आहेत. टिकैत यांना सोडून जाणार नाही असा त्यांचा पण आहे. त्यामुळे सरकारने रस्त्यावर खिळेच ठोकले. यावर टिकैत म्हणाले, ‘‘त्यांनी दिल्लीला जाणाऱया रस्त्यांवर खिळे ठोकले, पण आम्हाला दिल्लीला जायचे नाही. कृषी कायदे रद्द करा इतकीच आमची मागणी आहे.’’ पंतप्रधान म्हणतात, ‘‘आंदोलक व शेतकरी यांच्यात एका फोन कॉलचे अंतर आहे!’’ यावर मिस्कील जाट टिकैत म्हणाले, ‘‘मग वेळ कशाला? मला त्यांचा नंबर द्या. मीच फोन करतो!’’ गाझीपूर सीमेवरचा हा खेळ सुरूच आहे.