आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Shivsena Sanjay Raut Press Conference | Marathi News | Crowd Of Leaders And Demonstration Of Strength Of Shiv Sainiks At The Press Conference | Marathi News

दिव्य मराठी विश्लेषण:एक ना साडेतीन, बाण दिशाहीन! पत्रकार परिषदेला सेना नेत्यांची गर्दी अन् शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाआयटीमध्ये तब्बल २५ हजार कोटींचा महाघोटाळा झाला असून आघाडीचे सरकार पाडण्याची भाजपची ऑफर ठोकरल्याने माझ्यामागे ईडीचे शुक्लकाष्ठ लावले. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानशी किरीट सोमय्या व त्यांच्या मुलाची भागीदारी आहे. फडणवीसांच्या मर्जीतील मोहित कंबोजने पत्राचाळीची १२०० कोटींची जमीन १०० कोटींत विकत घेतली, असे गंभीर आरोप शिवसेना खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मंगळवारी (१५ फेब्रुवारी) केले. दादरच्या शिवसेना भवनात झालेल्या या पत्रकार परिषदेप्रसंगी शक्तिप्रदर्शनाच्या हेतूने राज्यभरातून सेना पदाधिकारी जमले हाेते.

सोमय्या इतरांवर आराेप करतात, पण त्यांनीच देवेंद्र लडाणी नामक व्यक्तीला पुढे करून वसईतील ४०० काेटींची जमीन साडेचार काेटीत लाटली. याबाबत ईडीला मी तीन वेळा कागदपत्रे पाठवली, पण काही झाले नाही. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना याबाबत तक्रार करणार आहे. तसेच या प्रकल्पाला हरित लवादाची परवानगी नसल्याने २०० काेटींचा दंड हाेऊ शकताे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना यावर कारवाई करायचे आवाहन करणार आहे. अलिबागमध्ये ठाकरे कुटुंबीयांचे कथित १९ बंगले सोमय्यांनी दाखवल्यास मी राजकारण साेडेन, असेही राऊत म्हणाले.

‘संजय उवाच’ का?
महाविकास आघाडीच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावल्यापासून आणि देशभरातील भाजपविरोधी राजकारणात सक्रिय झाल्यामुळे संजय राऊत हे भाजपसाठी डोकेदुखी बनले आहेत. राऊतांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत यांची अटक आणि राऊतांच्या नातलगांवर झालेल्या धाडसत्रानंतर ईडीच्या कारवाईचा फास राऊतांच्या गळ्यापर्यंत पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर, स्वत:च्या बचावासाठी भाजपवर प्रतिआक्रमण करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या दृष्टीने सकाळपासून वातावरणनिर्मिती, शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन, भावनिक साद आणि मराठी अस्मितेची हाक याची राजकीय नीती होती.

भाजप विरोधकांची एकजूट
राऊत यांच्या या आरोपांनंतर महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ताेच धागा पकडून भाजप नेत्यांच्या चौकशीची मागणी सुरू केली. ईडीच्या धाडसत्राचा सर्वाधिक फटका महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांसह थेट पवार कुटुंबापर्यंत ईडीच्या कारवाईची धग पोहोचली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनी सकाळीच राऊतांचा “सिक्सर’ असेल असे जाहीर करून यात भर टाकली होती. राऊत यांनीही पत्रकार परिषदेच्या सुरुवातीस आपल्याला देशभरातील नेत्यांनी पाठिंबा दिल्याचे आवर्जून नमूद केले.

तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे
प्रश्न : ‘साडेतीन शहाणे’ गुलदस्त्यात का?
उत्तर :
याचे उत्तर उद्या देऊ असे राऊत म्हणाले, मात्र आजच्या आरोपांवरील प्रतिक्रिया पाहून पुढे पाऊल टाकण्याचा “जाणता’ सल्ला त्यामागे असावा.

प्रश्न : निशाण्यावर मोठे नेते का नाहीत?
उत्तर :
महाविकास आघाडी अद्याप परतीचे दोर पूर्णपणे कापण्याच्या मन:स्थितीत दिसत नाही, उलट पर्याय खुले ठेवले. म्हणूनच भाजपच्या मोठ्या नेत्यांवर थेट बाण सोडले नाहीत.

प्रश्न : आरोपांना पुराव्यांनी खोडण्याऐवजी भावनिक साद का?
उत्तर :
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “महाराष्ट्राची अस्मिता’ आणि “मराठी माणूस’ हे मुद्दे पुढे रेटण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न दिसतो.

प्रश्न : यातून शिवसेनेने पक्ष म्हणून काय साधले?
उत्तर :
महाविकास आघाडी शिवसेनेच्या नेतृत्वात आहे हे अधोरेखित करतानाच शिवसेना पक्ष म्हणून तसेच महाविकास आघाडी सरकार म्हणून एकसंघ असल्याचा संदेश यातून दिला गेला.

प्रश्न : मुद्द्यावरून लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न आहे का?
उत्तर :
नाही. उलट, नवे मुद्दे उपस्थित करत सेना”स्टाइल’ आक्रमकतेने बचाव करण्याची ही व्यूहरचना दिसते.

प्रश्न : पत्रकार परिषदेत शक्तिप्रदर्शन का?
उत्तर :
संदेश स्पष्ट होता. शिवसेनेत राऊत एकटे नाहीत, महाविकास आघाडीत शिवसेना एकटी नाही आणि देशात भाजपविरोधातील लढाईत महाविकास आघाडी एकटी नाही हे दाखवले गेले.

बातम्या आणखी आहेत...